Share market today : जागतिक बाजारपेठेतील सकारात्मक संकेतांमुळे गुरुवारी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात तेजीसह झाली. निफ्टी ५० आणि सेन्सेक्स या दोन्ही निर्देशांकांनी आज वाढीसह व्यवहार सुरू केला आहे. अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करार होण्याची शक्यता निर्माण झाल्याने जागतिक बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. याचे सकारात्मक पडसाद भारतीय शेअर बाजारावरही उमटले आहेत. विशेष करुन वाहन क्षेत्राने यात आघाडी घेतली आहे.

निर्देशांकांची आजची स्थिती

निफ्टी ५० निर्देशांक ८८ अंशाच्या (०.३६%) वाढीसह २४,४१८ वर उघडला. तर सेन्सेक्स २६६ अंशाच्या (०.३४%) उसळीसह ७८,२२५ वर उघडला. हे दोन्ही निर्देशांक त्यांच्या सर्वकालीन उच्चांकापेक्षा अजूनही खूप खाली आहेत. युद्धजन्य परिस्थिती निवळण्याचे संकेत मिळाल्याने आता बाजार वर जाण्याचा अंदाज तज्ज्ञांनी दिला आहे.

जागतिक बाजारपेठेतील कल

बुधवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानंतर जगभरातील शेअर बाजारांमध्ये तेजी पाहायला मिळाली. आशियातील जपानच्या निक्केई २२५ निर्देशांकाने ऐतिहासिक ६२,००० ची पातळी गाठली असून त्यात ५% हून अधिक वाढ झाली आहे. तर दक्षिण कोरियाचा कोस्पी १.१७% ने वधारला आहे. तिकडे अमेरिका आणि इराणमधील युद्ध संपण्याच्या आशेने वॉल स्ट्रीटवर बुधवारी मोठी तेजी पाहायला मिळाली. एसअँडपी ५०० आणि नॅस्डॅक या दोन्ही निर्देशांकांनी नवीन विक्रम प्रस्थापित केले आहेत.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत २.४० लाख कोटींची वाढ

६ मे २०२६ रोजी, बीएसईवर सूचीबद्ध असलेल्या सर्व शेअर्सचे एकूण बाजार भांडवल ४,७२,४६,९३६.३४ कोटी होते. आज, ७ मे २०२६ रोजी, बाजारातील घडामोडींदरम्यान ते ४,७४,८७,५२५.०७ कोटींवर पोहोचले आहे. याचा अर्थ गुंतवणूकदारांच्या संपत्तीत २,४०,५८८.७३ कोटींची वाढ झाली आहे.

गुंतवणूकदारांसाठी काय महत्त्वाचे?

भारतीय शेअर बाजारातून परकीय गुंतवणूकदारांचे पलायन अजूनही सुरुच आहे. ६ मे रोजी परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी ४,८८२.१५ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली, तर देशांर्गत गुंतवणूकदारांनी ५,९३४.३८ कोटी रुपयांची खरेदी केली. क्षेत्रीय कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर बुधवारी ट्रान्सपोर्ट आणि एव्हिएशन क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी वाढ दिसून आली, तर इलेक्ट्रिकल इक्विपमेंट क्षेत्रात घसरण झाली. इंडियाबुल्स ग्रुप आणि हिंदुजा ग्रुपच्या शेअर्समध्ये बुधवारी सर्वाधिक वाढ झाली होती.

शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन असते. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या नोंदणीकृत आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. वरील माहिती केवळ शैक्षणिक आणि विश्लेषणात्मक उद्देशाने दिली आहे.