Indian Stock Market Crash Reasons: शुक्रवारी भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक घसरणीसह उघडले. बाजार सुरू होताना सेन्सेक्समध्ये ७०० हून अधिक अंशांची, तर निफ्टीमध्ये २०० अंशांची घसरण दिसून आली. यामुळे बीएसई सेन्सेक्समधील सर्व कंपन्यांचे एकूण मूल्य २ लाख रुपयांनी घसरून ४,७७,६०,९०८ रुपयांवरून ४,७५,६५,७०८ रुपयांवर आले.
ॲक्सेंचरने (Accenture) कमाईची आकडेवारी जाहीर केली आहे. जी अपेक्षेपेक्षा खूप कमी असल्याने बाजारात ही कमजोरी दिसून आली. याचा आयटी क्षेत्रातील शेअर्सवर मोठा परिणाम झाला. आयटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या ॲक्सेंचरने त्रैमासिक विक्रीचा अंदाज वॉल स्ट्रीटच्या अपेक्षांपेक्षा कमी वर्तवल्यामुळे, शुक्रवारी निफ्टी आयटी निर्देशांकात ५.८ टक्क्यांची घसरण झाली.
दरम्यान, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ५ पैशांनी कमकुवत होऊन ९४.३८ या पातळीवर उघडला, गुरुवारी रुपया ९४.३३ या पातळीवर बंद झाला होता.
१) आयटी शेअर्समधील विक्री:
भारतीय आयटी शेअर्समध्ये आज मोठ्या प्रमाणावर विक्रीचा दबाव दिसून आला, ज्यामुळे निफ्टी आयटी निर्देशांकात ६ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. ॲक्सेंचरने आपल्या महसूल वाढीचा अंदाज कमी केल्याने आणि मागणीतील कमकुवतपणा अधोरेखित केल्याने ही परिस्थिती उद्भवली. या घडामोडींमुळे या क्षेत्राच्या भविष्याबाबत चिंता निर्माण झाली आहे.
२) इंडिया VIX मध्ये वाढ:
बाजारातील अस्थिरता दर्शवणारा निर्देशांक (ज्याला ‘फिअर गेज’ किंवा ‘व्होलॅटिलिटी इंडेक्स’ म्हटले जाते) सुमारे ६ टक्क्यांनी वाढून १३.३७ च्या पातळीवर पोहोचला.
३) FII कडून विक्री:
बुधवारी एका दिवसाच्या विश्रांतीनंतर, विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गुरुवारी १,०२५.२० कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली.
बाजारातील सध्याची परिस्थिती
सकाळी १० वाजता, सेन्सेक्स ७०८.०४ अंशांनी किंवा ०.९१ टक्क्यांनी घसरून ७६,७०१.९४ वर व्यवहार करत होता. निफ्टी १९९.६० अंशांनी किंवा ०.८३ टक्क्यांनी घसरून २३,९६८.४० वर आला.
सकाळी ११ वाजता सेन्सेक्स ८२८.१८ अंशांनी किंवा १.०७ टक्क्यांनी घसरून ७६,५८१.८० वर व्यवहार करत होता. निफ्टी २२५.१० अंशांनी किंवा ०.९३ टक्क्यांनी घसरून २३,९४२.९० वर आला.
दुपारी १२:०० वाज. सेन्सेक्स ८१९.२६ अंशांनी घसरून ७६,५९०.७२ वर, तर निफ्टी २२४.३५ अंशांनी घसरून २३,९४३.६५ वर व्यवहार करत होता. यामध्ये १८३३ शेअर्स वधारले, १७२५ शेअर्स घसरले आणि १६९ शेअर्सच्या किमतीत कोणताही बदल झाला नाही.
दुपारी १:०० वाजता, सेन्सेक्स ९०४.६६ अंशांनी घसरून ७६,५०५.३२ वर, तर निफ्टी २५३.१० अंशांनी घसरून २३,९१४.९० वर व्यवहार करत होता. यादरम्यान १,७२३ शेअर्समध्ये वाढ झाली, २,०१८ शेअर्समध्ये घसरण झाली आणि १४७ शेअर्सचे भाव स्थिर राहिले.
