Indian Stock Market Crash Donald Trump Generic Drug Tariff impact analysis: मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे कच्च्या तेलाचे भाव प्रति बॅरल ९२ डॉलर्सच्या वर गेल्याने व डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत आयात होणाऱ्या जेनेरिक औषधांवर २०० टक्के टॅरिफ लादण्याच्या योजनेची घोषणा केल्यामुळे बुधवारी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. यामुळे शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात लाखो कोटी रुपयांची घट झाली.

सकाळी १०:०० वा. सेन्सेक्स ६०० हून अधिक अंशांनी घसरून ७६,८६१ या दिवसातील नीचांकी पातळीवर आला, तर निफ्टी ५० मध्ये १५० हून अधिक अंशांची घसरण होऊन तो २४,०५० च्या पातळीच्या खाली आला.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात केल्या जाणाऱ्या जेनेरिक औषधांवर टप्प्याटप्प्याने लागू होणारी टॅरिफ योजना जाहीर केल्यानंतर, फार्मा कंपन्यांचे शेअर्सचा सर्वाधिक घसरण झालेल्या शेअर्समध्ये समावेश झाला. या योजनेअंतर्गत अधिकचे टॅरिफ लागू होण्यापूर्वी औषध उत्पादकांना दोन वर्षांची मुदत देण्यात आली आहे.

गेल्या काही सत्रांमध्ये समाधानकारक कामगिरी करणारे व्यापक बाजारातही घसरण झाली. यामध्ये ‘निफ्टी स्मॉलकॅप १००’ आणि ‘निफ्टी मिडकॅप १००’ या निर्देशांकांमध्ये ०.५ टक्क्यांपर्यंत घसरण झाली.

इंडिगो आणि सन फार्माच्या शेअर्समध्ये २-३% घसरण झाल्याने सेन्सेक्सला मोठा फटका बसला. टेक महिंद्रा आणि इन्फोसिसचे शेअर्स प्रत्येकी १% पेक्षा जास्त घसरले, तर एसबीआय, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, ॲक्सिस बँक, टीसीएस, एचसीएल टेक आणि कोटक महिंद्रा बँकेचे शेअर्स प्रत्येकी जवळपास १% ने घसरले. दुसरीकडे मारुती सुझुकी, टायटन, हिंदुस्थान युनिलिव्हर, एशियन पेंट्स, इटरनल, एम अँड एम आणि बजाज फायनान्सचे शेअर्स किरकोळ वाढीसह तेजीत होते.

बाजारातील अस्थिरता दर्शवणारा India VIX निर्देशांक अनिश्चितता वाढल्यामुळे ३ टक्क्यांनी वधारून १२.९८ वर पोहोचला आहे. क्षेत्रीय पातळीवर, ट्रम्प यांनी टॅरिफबाबत दिलेल्या नवीन धमक्यांमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीती निर्माण झाली आणि ‘निफ्टी फार्मा’मध्ये १ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. बाजाराचा एकूण कल मंदीचा राहिला, एनएसईवर १,४९६ शेअर्समध्ये घसरण झाली, तर ९०६ शेअर्स वधारले आणि १०२ शेअर्सचे भाव स्थिर राहिले.

बाजर तज्ज्ञ काय म्हणाले?

जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे मुख्य गुंतवणूक रणनीतीकार व्ही. के. विजयकुमार यांनी सांगितले की, इतर आघाड्यांवरील सकारात्मक बातम्या असूनही, अमेरिका-इराण यांच्यातील सुरू असलेला संघर्ष आणि ब्रेंट क्रूडच्या वाढत्या किमती यांचा बाजारावर दबाव कायम राहील. त्यांनी पुढे नमूद केले की, वाहन क्षेत्रातील पहिल्या तिमाहीची सुरुवातीची आकडेवारी प्रभावी आहे आणि व्यवस्थापनाची विधाने आशावाद दर्शवतात.