Indian Stock Market Crash recovery updates and detailed Morgan Stanley Report: भारतीय शेअर बाजाराच्या मूल्यांकनात झालेली अलीकडील घसरण ही संरचनात्मक नसून तात्पुरती आहे. तसेच आर्थिक विकासदरातील सुधारणेमुळे हा कल बदलण्यास आणि शेअर बाजाराच्या कामगिरीला चालना मिळण्यास मदत होऊ शकते, असे ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीच्या एका नव्या अहवालात म्हटले आहे.
या अहवालात नमूद केले आहे की, शेअर बाजाराची अलीकडील मंद कामगिरी आणि विदेशी गुंतवणूकदारांनी कमी केलेली गुंतवणूक या गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून भविष्यात भारतीय कंपन्यांच्या शेअर्ससाठी अनुकूल वातावरण निर्माण होऊ शकते.
त्यात म्हटले आहे की, “भारतीय शेअर बाजाराच्या मूल्यांकनात झालेली घसरण ही चक्रीय स्वरूपाची आहे आणि विकासदरात वाढ होण्याची शक्यता असल्याने, ही स्थिती बदलण्याची क्षमता आहे.”
मॉर्गन स्टॅनलीने असा युक्तिवाद केला आहे की, भारती शेअर बाजाराच्या मूल्यांकनातील घसरण ही रचनात्मक आहे, अशी व्यक्त केली जाणारी चिंता अतिशयोक्तीपूर्ण आहे.
अहवालातील एका युक्तिवादानुसार, प्रजनन दरात होणाऱ्या घटीमुळे भारताच्या दीर्घकालीन विकासदरात मंदावलेली स्थिती निर्माण होऊ शकते. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (AI) भारताच्या सेवा क्षेत्रातील निर्यातीवर आणि व्यापारावर विपरीत परिणाम होऊ शकतो, ही आणखी एक चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, या दोन्ही चिंता अतिशयोक्तीपूर्ण असल्याचे म्हटले आहे.
अहवालात नमूद केले आहे की, जरी प्रजनन दर कमी होत असले तरी हा बदल अचानक झालेला नाही. तसेच, यामुळे भारताचा दीर्घकालीन लोकसंख्याविषयक लाभ (डेमोग्राफिक ॲडव्हांटेज) हळूहळू कमी होऊ शकत असला, तरीही येत्या दोन दशकांत हा बदल आर्थिक विकासाला पूरक ठरेल अशी शक्यता आहे.
या अहवालात कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत असे म्हटले आहे की, देशाच्या सेवा क्षेत्रातील निर्यातीच्या गतीसमोर एआयमुळे नजीकच्या काळात आव्हान निर्माण होऊ शकते. पण, मध्यम कालावधीचा विचार करता, भारताची सध्याची तुलनेने कमी उत्पादकता पाहता, ती सुधारण्यासाठी एआय एक मोठी संधीही उपलब्ध करून देते.
मॉर्गन स्टॅनलीने पुढे असेही नमूद केले की, भारताच्या दीर्घकालीन विकासाच्या दृष्टिकोनाला अनेक रचनात्मक घटकांचा आधार आहे. यामध्ये बहुकेंद्री जागतिक अर्थव्यवस्था, वाढता ग्राहक वर्ग आणि गुंतवणुकीतील वाढ यांचा समावेश आहे.
भविष्याकडे पाहता, भारत आणि जागतिक अर्थव्यवस्था यांच्यातील विकासातील तफावतीचे गुंतवणूकदार कसे मूल्यांकन करतात, हा भारतीय बाजारांसाठी मुख्य प्रेरक घटक असेल, असे मॉर्गन स्टॅनलीने म्हटले आहे.
