After assembly election results in five states, the Indian stock market opened with a downward trend on Tuesday: पाच राज्यांतील निवडणुकांच्या निकालांनंतर निर्माण झालेल्या अल्पकालीन आशावादानंतर अवघ्या एकाच दिवसात, मंगळवारी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षात झालेली नवी वाढ आणि रुपयाने गाठलेली आतापर्यंतची नीचांकी पातळी यामुळे गुंतवणूकदार धास्तावले, परिणामी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये ०.३ टक्क्यांपर्यंतची घसरण दिसून आली.
शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स ४०० हून अधिक अंशांनी घसरला, तर निफ्टी २४,००० अंशांच्या खाली खाली घसरला. यामध्ये इंडिगो आणि टेकएम च्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली.
भाजपाच्या विजयानंतर ‘बंगाल’मधील कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी
भारतीय जनता पार्टीने पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत, सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला सत्तेवरून पायउतार केल्यानंतर, सोमवारी पश्चिम बंगालमध्ये स्थित अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ दिसून आली.
अमेरिका-इराण तणावामुळे सोन्याचे दर स्थिर
मंगळवारी सोन्याचे दर बऱ्याच अंशी स्थिर राहिले. मध्य-पूर्वेतील वाढत्या तणावाचे आर्थिक परिणाम गुंतवणूकदार पडताळून पाहत असतानाच, अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चांमधील प्रगती मात्र ठप्पच राहिली आहे.
टाटा मोटर्स कमर्शिअल व्हेईकल्सचे ७.१८ लाख शेअर्स कोणी खरेदी केले?
बीएलपी परीबास फायनान्शिअल मार्केट्सने टाटा मोटर्स कमर्शिअल व्हेईकल्सचे ७.१८ लाख शेअर्स ४०५.८० रुपये प्रति शेअर या दराने खरेदी केले, तर गोल्डमन सॅक्स बँक युरोप एसईने याच दराने ७.१८ लाख शेअर्सची विक्री केली.
मागील व्यवहाराच्या सत्रात, हा शेअर ०.७३ टक्क्यांनी (किंवा ३.०० रुपयांनी) वधारून ४१२.९५ रुपयांवर बंद झाला होता.
या शेअरने अनुक्रमे २७ फेब्रुवारी २०२६ आणि १४ नोव्हेंबर २०२५ रोजी ५२ आठवड्यांचा उच्चांक ५०८.९५ रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांक ३०६ रुपये गाठला होता. सध्या, हा शेअर त्याच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकापेक्षा १८.८६ टक्क्यांनी खाली आणि ५२ आठवड्यांच्या नीचांकापेक्षा ३४.९५ टक्क्यांनी वर व्यवहार करत आहे. या कंपनीचे बाजार भांडवल १,५२,०६१.८७ कोटी रुपये इतके आहे.
सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये काल काय घडले?
पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये भाजपाने केलेली दमदार कामगिरी, तसेच केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरीमध्ये पुन्हा सत्तेवर परतण्याचे संकेत देणाऱ्या निवडणूक कलांच्या आधारावर, देशांतर्गत शेअर बाजारांनी सोमवारी सत्राचा समारोप भक्कम स्थितीत केला.
