Indian Stock Market Crash & Shankar Sharma Toxic Market Warning: भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स, निफ्टीसह सर्वच निर्देशांकांनी अलीकडच्या काही महिन्यांमध्ये अत्यंत अस्थिरतेचा काळ अनुभवला आहे. निर्देशांकांनी सप्टेंबर २०२४ मध्ये उच्चांकी पातळी गाठल्यानंतर एकापाठोपाठ एक जागतिक धक्के बसले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लादण्याची घोषणा केल्यानंतर जागतिक गुंतवणूकदार हादरून गेले होते. त्यानंतर भारत-पाकिस्तान संघर्षाचा गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर नकारात्मक परिणाम झाला. तर पुढे पश्चिम आशियातील युद्धामुळे पुरवठा साखळीतील व्यत्यय आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे शेअर बाजाराचे मोठे नुकसान झाले.
या सर्व परिस्थितीतून प्रमुख निर्देशांक काही प्रमाणात असले, तरी अनेक विश्लेषकांचे असे मत कायम आहे की भारतीय शेअर्सचे समभागांचे मूल्य अजूनही खूप जास्त (ओव्हरव्हॅल्यूड) आहे.
या पार्श्वभूमीवर, ज्येष्ठ गुंतवणूकदार शंकर शर्मा यांनी शेअर बाजारावर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली आहे. त्यांनी आयएनडी मनीला दिलेल्या मुलाखतीमख्ये शेअर बाजाराचा उल्लेख ‘विषारी बाजार’ असा केला आहे.
शेअर बाजाराबाबत बोलताना शंकर शर्मा म्हणाले, “याला शेअर बाजार म्हणू नये, याला विषारी बाजार म्हटले पाहिजे. हे विष आहे आणि एक दिवस ते सर्वांचा जीव घेईल. जर भारतात १० वर्षांसाठी शेअर बाजार बंद ठेवला, तर भारताची खऱ्या अर्थाने प्रगती होईल.”
शंकर शर्मा यांनी त्यांना असे का वाटते यावर भाष्य केले नसले तरी, त्यातून ही चिंता दिसून येते की बाजार मूलभूत तत्त्वांऐवजी वाढत्या प्रमाणात सट्टेबाजीवर अवलंबून आहेत. गेल्या काही वर्षांत, भारतात किरकोळ गुंतवणूकदार शेअर बाजारात मोठ्या संख्येने दाखल झाले आहे. ट्रेडिंग ॲप्स, डेरिव्हेटिव्ह्ज आणि सोशल मीडिया आधारित गुंतवणुकीच्या कल्पनांच्या माध्यमातून लाखो नवख्या गुंतवणूकदारांनी बाजारात प्रवेश केला आहे. ऑप्शन्स ट्रेडिंगमधील या वेगवान वाढीमुळे सेबीने वारंवार इशारे दिले आहेत की, ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये बहुसंख्य किरकोळ ट्रेडर्स पैसे गमावतात.
शंकर शर्मांनी स्वत: शेअर बाजारातून कमावली प्रचंड संपत्ती
शंकर शर्मा यांच्या या विधानांमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण त्यांनी अशी मते व्यक्त केली असली तरी, त्यांनी स्वत: शेअर बाजारातून प्रचंड संपत्ती कमावली आहे. शर्मा यांच्या मतांशी कोणी सहमत असो वा नसो, त्यांच्या या टिप्पणीमुळे एका महत्त्वाच्या चर्चेला पुन्हा चालना मिळाली आहे आणि ती म्हणजे, बाजार अजूनही संयमी आणि दीर्घकालीन गुंतवणुकीला योग्य परतावा देत आहेत, की तो अधिकाधिक सट्टेबाजी आणि बाजारातील तेजीचा कल यांवर आधारित होत चालले आहेत?
