Indian Stock Market Crash loss of Rs 5 lakh crore in investor wealth: भारतीय शेअर बाजारात बुधवारी सकाळी मोठी घसरण झाली. अमेरिका-इराणमधील वाढता तणाव, तेलाच्या वाढत्या किमती आणि इतर घटकांमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी सेन्सेक्स आणि निफ्टी हे प्रमुख निर्देशांक सुमारे १ टक्क्यांनी घसरले.

बाजार उघडल्यानंतर, सेन्सेक्स ७५० हून अधिक अंशांनी घसरून ७६,२०० च्या खाली आला, तर निफ्टी ५० निर्देशांक २०० हून अधिक अंशांनी घसरून २३,८०० च्या पातळीखाली आला. शेअर बाजारातील या तीव्र घसरणीमुळे बाजार उघडल्यानंतर काही मिनिटांतच बीएसईच्या एकूण बाजार भांडवलातून सुमारे ५ लाख कोटी रुपये कमी झाले आणि ते ४८८ लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले.

या दरम्यान इन्फोसिसच्या शेअर्समध्ये जवळपास ३ टक्क्यांची घसरण झाली ज्यामुळे सेन्सेक्समध्ये सर्वाधिक नुकसान झाले. तर टीसीएस, एचसीएलटेक, इंडिगो आणि एम अँड एमच्या शेअर्समध्ये प्रत्येकी जवळपास २ टक्क्यांची घसरण झाली. एचडीएफसी बँक, एनटीपीसी, टेक महिंद्रा, एशियन पेंट्स, बजाज फायनान्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स (बीईएल), आयटीसी आणि अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअर्समध्ये प्रत्येकी १ टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली. दुसरीकडे सन फार्मा आणि अदाणी पोर्ट्सचे शेअर्समध्ये मात्र वाढ पाहायला मिळाली.

शेअर बाजारातील अस्थिरता मोजणारा इंडिया व्हीआयएक्स सकाळी ३ टक्क्यांपेक्षा जास्त वाढून ११.८६ वर पोहोचला. दरम्यान, निफ्टी मिडकॅप १०० आणि निफ्टी स्मॉलकॅप १०० हे निर्देशांक जवळपास १ टक्क्याने घसरले. क्षेत्रिय निर्देशांकांमध्ये, निफ्टी आयटीला सर्वाधिक फटका बसला, तो २ टक्क्यांपेक्षा जास्त कोसळला, तर निफ्टी ऑटो आणि निफ्टी रियल्टीमध्ये प्रत्येकी जवळपास २ टक्क्यांची घसरण झाली. तर निफ्टी एफएमसीजी, निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस आणि इतर अनेक क्षेत्रीय निर्देशांक १ टक्क्याने घसरले.

इराण-अमेरिका संघर्ष अधिक तीव्र

अमेरिका आणि इराण यांच्यात रात्रीच्या सुमारास पुन्हा एकदा एकमेकांवर हल्ले झाले. यामुळे खनिज तेलाने समृद्ध असलेल्या मध्य पूर्वेतील हा तीव्र संघर्ष संपुष्टात येण्याच्या आशा आणखी मावळल्या आहेत. अमेरिकेने इराणमधील काही ठिकाणांना लक्ष्य करून हवाई हल्ल्ये केल्याचे सांगितले, ज्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनेही कारवाई केली.