Nifty 50 Zero Return And Indian Stock Market Crash Reasons Explained By Kotak Securities: भारतीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक निफ्टी ५० ने गेल्या दोन वर्षांत अत्यंत निराशाजनक कामगिरी करत गुंतवणूकदारांना शून्य परतावा दिला आहे. शुक्रवारी ३ जुलै रोजी निफ्टी ५० निर्देशांक २४,२७१ अंशांवर बंद झाला होता. तर ३ जुलै २०२४ रोजी तो २४,२८६ अंशांवर होता. म्हणजेच या दोन वर्षांच्या कालावधीत निफ्टीने ०.०६ टक्क्यांची घट नोंदवली आहे.
वास्तविक पाहता, गेल्या तीन वर्षांत भारतीय शेअर बाजाराची कामगिरी बहुतांश जागतिक बाजारांच्या तुलनेत कमकुवत राहिली आहे. एकीकडे देशाच्या जीडीपीमध्ये आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ८.२%, २०२५ मध्ये ७.१% आणि २०२६ मध्ये ७.७% अशी वाढ झाली असताना, निफ्टी ५० निर्देशांकाने मात्र निराशाजनक कामगिरी केली आहे.
एआय क्षेत्रातील गुंतवणुकीचा अभाव, ऑपरेशन सिंदूरनंतरचा भारत-पाकिस्तान संघर्ष, डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेले टॅरिफ व अमेरिका-इराण यांच्यातील युद्धामुळे अलीकडच्या वर्षांत भारतीय शेअर बाजाराची कामगिरी निराशाजन झाल्याचे बोलले जात होते. मात्र, या पलीकडे पाहता, फंडामेंटल्स आणि व्हॅल्युएशन्स यांच्यातील तफावत हेच भारतीय शेअर बाजाराच्या निराशाजनक कामगिरीचे मुख्य कारण ठरले असावे, असे विश्लेषकांचे मत आहे.
कोटक सिक्युरिटीज या ब्रोकरेज फर्मच्या मते, भारतीय शेअर बाजारातील निफ्टी ५० या निर्देशांकाच्या निराशाजनक कामगिरीमागे कमाईतील वाढ आणि मूल्यांकन यांमधील तफावत, तसेच जागतिक घडामोडींना तोंड देण्याची देशांतर्गत अर्थव्यवस्थेची कुमकुवत क्षमता ही मुख्य कारणे असू शकतात.
कोटक सिक्युरिटीजने एका अहवालात म्हटले आहे की, “गेल्या दोन वर्षांतील भारतीय बाजाराच्या कमकुवत कामगिरीमागे विविध क्षेत्रांमधील कमाई आणि व्यवसाय मॉडेलच्या गुणवत्तेच्या तुलनेत असलेले उच्च मूल्यांकन, तसेच भांडवल आणि तंत्रज्ञानावरील भारताचे मोठ्या प्रमाणावरील बाह्य अवलंबित्व पाहता जागतिक घडामोडींना तोंड देण्याची अर्थव्यवस्थेची कुमकुवत क्षमता ही कारणे आहेत.”
कोटक सिक्युरिटीजने पुढे म्हटले की, एआय आणि भू-राजकारणाचे नेहमीचे युक्तिवाद वरवरचे वाटतात, कारण ते केवळ भारतापुढील रचनात्मक आणि तांत्रिक आव्हाने अधिक खोलवर अधोरेखित करतात.
शून्य परतावा मिळूनही गुंतवणूकदार गुंतवणुकीवर ठाम
कोटकने निदर्शनास आणून दिले की, गेल्या तीन वर्षांतील देशांतर्गत बाजाराच्या खराब कामगिरीनंतरही, बाजारातील विविध स्तरांतील गुंतवणूकदारांच्या मानसिकतेत कोणताही मोठा बदल झालेला दिसत नाही.
कोटक सिक्युरिटीजने म्हटले आहे की, “गेल्या २-३ वर्षांत अत्यंत कमकुवत परतावा मिळूनही, किरकोळ गुंतवणूकदार उच्च परताव्याची अपेक्षा करत आहेत आणि म्युच्युअल फंडांमध्ये व एसआयपी (SIP) मध्ये मोठा प्रमाणात गुंतवणूक करत आहेत.”
कोटकने म्हटले आहे की, “तीन वर्षांच्या कालावधीत एसआयपीचा परतावा एफडीच्या परताव्यापेक्षाही कमी आहे. देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार किरकोळ गुंतवणूकदारांचा पैसा बाजारात गुंतवत आहेत, तर दुसरीकडे इतर बाजारांमधील एआय संधींमुळे भारताचे आकर्षण आणखी कमी झाल्याने, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार फंडामेंटल्स आणि व्हॅल्यूएशनबाबत सावध राहिले आहेत.”
