Investors Earn 5 Lakh Crore 6 April 2026: भारतीय शेअर बाजार आज (सोमवार, ६ एप्रिल २०२६) सकाळची सर्व घसरण भरून काढत सकारात्मक पातळीवर बंद झाले. पाकिस्तानच्या मध्यस्थीने झालेल्या इराण-अमेरिका शस्त्रसंधी करारावरील माध्यमांतील वृत्तांमुळे आणि इतर घटकांमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढल्याने ही अचानक तेजी आली.

सेन्सेक्स ७८७ अंशांच्या वाढीसह ७४,१०७ वर बंद झाला, तर निफ्टी ५० २५५ अंशांनी (किंवा १.१२%) वधारून २२,९६८ वर बंद झाला. दलाल स्ट्रीटवरील या अचानक आलेल्या तेजीमुळे बीएसईवर सूचीबद्ध असलेल्या सर्व कंपन्यांच्या एकूण बाजार भांडवलामध्ये ५ लाख कोटींहून अधिक रुपयांची भर पडली, ज्यामुळे हे एकूण भांडवल ४२८ लाख कोटींहून अधिक पातळीवर पोहोचले.

झुडिओची मूळ कंपनी असलेल्या ट्रेन्टचे शेअर्स सेन्सेक्सवर सर्वाधिक वाढ नोंदवणारे ठरले, त्यांच्या मूल्यात जवळपास ८ टक्क्यांची वाढ झाली. त्यानंतर टायटन, एक्सिस बँक, एल अँड टी, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फिनसर्व्ह आणि इंडिगो यांचे शेअर्स २ ते ४ टक्क्यांनी वधारले. मात्र, या प्रवहाच्या अगदी उलट जात रिलायन्स इंडसट्रीजचे शेअर्स ३ टक्क्यांहून अधिक कोसळले.

एनएसईवरील बहुतांश क्षेत्रीय निर्देशांक (Sectoral Indices) तेजीत पाहायला मिळाले. यामध्ये निफ्टी कन्ज्युमर ड्यूरेबल्स निर्देशांक जवळपास ३ टक्क्यांनी वधारून आघाडीवर राहिला, तर निफ्टी पीएसयू बँक आणि निफ्टी रिअल्टी या निर्देशांकांनी प्रत्येकी २ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली. मात्र, निफ्टी ऑयल अँड गॅस निर्देशांक १ टक्क्यांहून अधिक घसरला. शेअर बाजारात एकूण २,५११ शेअर्सच्या किमती वाढल्या, तर ७४६ शेअर्स घसरले आणि ८९ शेअर्स स्थिर राहिले.

इराण आणि अमेरिकेला त्यांच्यातील संघर्ष संपवण्यासाठी एक प्रस्ताव मिळाला आहे, जो आजपासूनच लागू होऊ शकतो आणि त्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारा व्यापार पुन्हा सुरू होऊ शकतो, असे वृत्त या प्रकरणाशी संबंधित सूत्रांच्या हवाल्याने रॉयटर्सने दिले आहे. तात्काळ युद्धविराम आणि त्यानंतर सर्वसमावेशक करार अशा दोन-स्तरीय दृष्टिकोनाचा समावेश असलेला हा प्रस्ताव पाकिस्तानने तयार केला असून, तो इराण आणि अमेरिकेला पाठवण्यात आल्याचेही त्यात म्हटले आहे.