BSE Market Cap Record High 500 Lakh Crore: गेल्या आठवड्यात झालेल्या मोठ्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजारात आज सलग साहव्या दिवशी दमदार तेजी पाहायला मिळत आहे. याचबरोबर गुरुवारी बीएसई (BSE) वर सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ५०० लाख कोटी रुपये या विक्रमी उच्चांकावर पोहोचले.
कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (FII) झालेली मोठी गुंतवणूक आणि अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीच्या निकालानंतर जागतिक बाजारपेठांमध्ये दिसून आलेली तेजी, ही यामागची प्रमुख कारणे ठरली.
चालू सत्रात बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ५०१.१४ लाख कोटी रुपयांवर पोहोचले, जे मागील सत्रात ४९३.४४ लाख कोटी रुपये होते. दुपारी ०२:०० वाजता सेन्सेक्स २ हजार हून अधिक अंशांनी, तर निफ्टी ६०० हून अधिक अंशांनी वाढल्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ७.७ लाख कोटी रुपयांची भर पडली आहे.
बाजारातील तेजीचा कल कायम राहणार
अर्थव्यवस्थेसाठी अनुकूल परिस्थिती अधिक मजबूत होत असल्याने, बाजारातील तेजीचा कल कायम राहणार आहे, असे जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे मुख्य गुंतवणूक धोरणतज्ञ व्ही. के. विजयकुमार यांनी सांगितले. त्यांनी नमूद केले की, ब्रेंट क्रूडच्या किमतीत झालेली १० टक्क्यांची मोठी घसरण ही बाजारासाठी सर्वात मोठी सकारात्मक बाब असून, ती सुमारे ९४ डॉलरच्या पातळीवर आली आहे. अमेरिका-इराण संघर्षावर लवकरच तोडगा निघेल या आशेवर ही घसरण झाली आहे, कारण या संघर्षामुळे आणि परिणामी वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मध्यावधी निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाचा मोठा पराभव झाला आहे.
कच्च्या तेलाच्या किमतीतील ही घसरण अशा वेळी होत आहे, जेव्हा भारतीय अर्थव्यवस्था उत्तम लवचिकता दाखवत आहे आणि कंपन्यांच्या नफ्यात सुधारणा होत आहे, असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, यामुळे आणि आगामी अर्थसंकल्पात दीर्घकालीन भांडवली नफ्यावरील (LTCGs) कर रद्द होण्याची शक्यता या आशेमुळे, भारताप्रती परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे.
२०८३४ कोटी रुपयांची शेअर्स खरेदी
गेल्या चार ट्रेडिंग दिवसांमध्ये, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी २०८३४ कोटी रुपयांचे इक्विटी शेअर्स खरेदी केले आणि महत्त्वाचे म्हणजे, खरेदीचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. “लार्ज-कॅप्समध्ये अधिक शॉर्ट-कव्हरिंग होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे, बँकिंग क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांच्या नेतृत्वाखाली लार्ज-कॅप्समध्ये आणखी तेजी येण्याची अपेक्षा आहे. उच्च पातळीवर, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार तेजीच्या वेळी विक्री करण्याकडे कल दाखवत असल्याने प्रॉफिट बुकिंग होऊ शकते”, असे ते म्हणाले.
