Stock market rally sensex nifty surge 5 lakh crore profit: गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर अस्थिर असणारा भारतीय शेअर बाजार आज तेजीसह बंद झाला. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे आणि इतर सकारात्मक घटकांमुळे गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला, परिणामी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये १.१ टक्क्यांहून अधिक वाढ झाली.
सेन्सेक्स ९०५.०१ अंशाने वाढून ७४,१५१.०४ वर बंद झाला, तर निफ्टी ५० मध्ये सुमारे २३७.९० अंशांची वाढ होऊन तो २२,९३६.७५ वर बंद झाला. याचबरोबर व्यापक बाजारातही आज तेजी दिसून आली. निफ्टी स्मॉलकॅप १०० आणि निफ्टी मिडकॅप १०० निर्देशांकांमध्ये १ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. या जोरदार तेजीमुळे बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांच्या एकूण बाजार भांडवलात सुमारे ५ लाख कोटी रुपयांची भर पडली असून, ते ४७७ लाख कोटी रुपयांच्या वर पोहोचले आहे.
अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्ये ४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली, ज्यामुळे ते सेन्सेक्सवर सर्वाधिक वाढ नोंदवणारे शेअर्स ठरले. याव्यतिरिक्त पॉवर ग्रिड, कोटक महिंद्रा बँक, एचयूएल, एनटीपीसी, आयटीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, टायटन, टीसीएस आणि इन्फोसिसच्या शेअर्समध्ये १ ते ३ टक्क्यांची वाढ दिसून आली.
क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये, निफ्टी एफएमसीजी सुमारे २ टक्क्यांच्या वाढीसह आघाडीवर होता, तर निफ्टी पीएसयू बँक, निफ्टी आयटी आणि काही इतर निर्देशांकांमध्ये १ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. मात्र, निफ्टी ऑटो निर्देशांकात घसरण झाली. बाजाराचा एकूण कल सकारात्मक राहिला. एनएसईवर १९९५ शेअर्समध्ये वाढ झाली, तर १२२८ शेअर्समध्ये घसरण नोंदवण्यात आली. १०५ शेअर्सच्या किमतीत कोणताही बदल झाला नाही.
विश्लेषकांचे मत काय?
गेल्या काही आठवड्यांतील नुकसान बाजार काही प्रमाणात भरून काढत असला तरी, सेन्सेक्स आणि निफ्टी या वर्षी मोठ्या प्रमाणावर खालीच आहेत. पण, मोठ्या प्रमाणात झालेल्या विक्रीच्या लाटेनंतर विश्लेषकांनी आकर्षक मूल्यांकनाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने आपल्या नवीन स्ट्रॅटेजी अहवालात म्हटले आहे की, “आम्हाला बाजारात मूल्य दिसत आहे, कारण सर्व क्षेत्रांमध्ये आणि शेअर्समध्ये मूल्यांकनात मोठी घट झाली आहे. बाजाराचे मल्टिपल्स वाजवी आहेत, तरीही आम्ही टॉप-डाउन इंडेक्स व्हॅल्युएशनवर कमी लक्ष केंद्रित करतो.”
