Indian Stock Market Rally Sensex Nifty And LTCG Tax: भारतीय शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या दिवशी जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घट, दीर्घकालीन भांडवली नफा करात (LTCG Tax) संभाव्य बदलांबाबतची चर्चा आणि इतर घटकांमुळे गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला, परिणामी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये १ टक्क्यांपर्यंत वाढ झाली.

या तेजीमुळे बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांच्या एकूण बाजार भांडवलात सुमारे ४ लाख कोटी रुपयांची भर पडली असून, ते ४८६ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तर, कालही बीएसईवरील कंपन्यांचे बाजार भाडवल सुमारे ६ लाख कोटी रुपयांनी वाढले होते. या दोन दिवसांच्या तेजीमुळे गुंतवणूकदारांना एकत्रितपणे तब्बल दहा लाख कोटी रुपयांचा नफा झाला आहे.

सकाळी ११:०० वाजता सेन्सेक्स ८१५.०६ अंशांनी वाढून ७६५०७.८४ वर पोहोचला, तर निफ्टी २२२.८५ अंशांनी वाढून २३६६३.६५ वर व्यवहार करत होता. बाजारात २५९४ शेअर्समध्ये वाढ झाली, १०९३ शेअर्समध्ये घसरण झाली, तर १८४ शेअर्सच्या किमतीत कोणताही बदल झाला नाही.

इंडिगो आणि एचडीएफसीकडे तेजीचे नेतृत्त्व

सेन्सेक्समधील इंडिगो आणि एचडीएफसी बँकेच्या शेअर्सनी या तेजीचे नेतृत्त्व केले. दोन्ही शेअर्समध्ये प्रत्येकी सुमारे ३ टक्क्यांची वाढ झाली.

याव्यतिरिक्त अल्ट्राटेक सिमेंट, एचयूएल, एशियन पेंट्स, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह आणि इन्फोसिसच्या शेअर्समध्ये प्रत्येकी सुमारे २ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. या कलाच्या अगदी उलट, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये १ टक्क्यांपेक्षा थोडी अधिक घसरण झाली. विशेष म्हणजे काल रिलायन्सच्या शेअर्समध्ये १२ टक्क्यांची ऐतिहासिक तेजी नोंदवण्यात आली होती.

क्षेत्रीय निर्देशांक

क्षेत्रीय निर्देशांकांचा विचार करता निफ्टी ऑटो, निफ्टी फायनान्शिअल सर्व्हिसेस, निफ्टी एफएमसीजी, निफ्टी आयटी, निफ्टी प्रायव्हेट बँक आणि इतर अनेक निर्देशांकांमध्ये प्रत्येकी १ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली. मात्र निफ्टी फार्मा निर्देशांकात घसरण दिसून आली.

एनएसईवर २४०६ शेअर्स वधारले

व्यापक बाजारपेठेतही तेजी कायम राहिली. निफ्टी स्मॉलकॅप २५० आणि निफ्टी मिडकॅप १०० निर्देशांकांमध्ये ०.६ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. बाजाराचा एकूण कल तेजीच्या बाजूने राहिला. एनएसईवर २४०६ शेअर्स वधारले, तर ६७३ शेअर्समध्ये घसरण झाली. ८९ शेअर्सच्या किमतीत कोणताही बदल झाला नाही.

दीर्घकालीन भांडवली नफा कराच्या रचनेत बदलाची अपेक्षा

परकीय गुंतवणूकदारांनी इक्विटी भांडवली नफ्यावर आकारल्या जाणाऱ्या करांच्या रचनेचा पुनर्विचार करावा, अशी विनंती केली आहे. या विनंतीवर केंद्र सरकार “विचार” करेल, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी सांगितले. एका कार्यक्रमात बोलताना त्या म्हणाल्या, “परिस्थिती बदलली आहे, त्यामुळेच चिंतेचे सूर अधिक तीव्र झाले आहेत.”

परकीय गुंतवणूकदारांकडून दीर्घकालीन भांडवली नफा कराच्या (LTCG) रचनेत बदल करण्याबाबतच्या सूचना सरकारला मिळाल्या आहेत, अशा बातम्यांच्या संदर्भात त्यांनी हे भाष्य केले. त्या पुढे म्हणाल्या, “मी या गोष्टीची पूर्ण दखल घेते. त्यामुळे, मी या सर्व बाबींचा नक्कीच विचार करेन. आपला आर्थिक विकास अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्या क्षेत्रात लोक आपली सर्वोत्तम गुंतवणूक करत आहेत, तिथे आपल्याला सातत्याने ७ टक्क्यांहून अधिक विकासदर पाहायला मिळत आहे.”