Indian Stock Market Rally Sensex Nifty Rise And Market Cap Surge: गेल्या काही आठवड्यांपासून अस्थिर कामगिरी करत असलेल्या भारतीय शेअर बाजारात आज (२ नोव्हेंबर, २०२६) मोठी तेजी पाहायला मिळत आहे. या तेजीमुळे बाजार सुरू झाल्यानंतर अवघ्या एका तासाच्या आत बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांच्या एकूण बाजार भांडवलात ६ लाख कोटी रुपयांहून अधिक भर पडली आणि ते ४८० लाख कोटी रुपयांवर पोहोचले.

सकाळी ११:०० वाजता सेन्सेक्स ९९१.२१ अंशांनी वाढून ७५,४५०.७४ वर पोहोचला, तर निफ्टी २७८.४० अंशांनी वाढून २३,३३१.५० वर व्यवहार करत होता. बाजारात २५५२ शेअर्समध्ये वाढ झाली, ११९४ शेअर्समध्ये घसरण झाली, तर २१४ शेअर्सच्या किमतीत कोणताही बदल झाला नाही.

दुपारी ०१:०१ वाजता सेन्सेक्स ९६६ अंशांच्या वाढीसह ७५४२५ अंशांवर, तर निफ्टी २७४ अंशांच्या वाढीसह २३३२७ अंशांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी ५० निर्देशांक २१०.३५ अंशांच्या वाढीसह २३२५२.८० अंशांवर व्यवहार करत होता.

दिवसभरातील तेजीच्या जोरावर आज सेन्सेक्स १२३३.२५ अंशांनी वाढून वाढून ७५६९२.७८ वर आणि निफ्टी ३८७.७० अंशांच्या वाढीसह २३४४०.८० वर बंद झाला.

शेअर बाजार वधारण्याची कारणे

कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण, रिलायन्स इंडस्ट्रीजसारख्या दिग्गज कंपन्यांचे दमदार निकाल आणि इतर सकारात्मक घटकांमुळे बाजाराबाबतचा गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला, परिणामी सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांत १ टक्क्यांहून अधिक वाढ झाली.

सेन्सेक्स वाढीत रिलायन्सचा सिंहाचा वाटा

आज रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आणि याचा सेन्सेक्सच्या तेजीला मोठा हातभार लागला, तर टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये ४ टक्क्यांची वाढ झाली. एनटीपीसी, मारुती सुझुकी, बीईएल, पॉवर ग्रिड, एसबीआय, एशियन पेंट्स, टीसीएस, एम अँड एम, अल्ट्राटेक सिमेंट, एचयूएल, एल अँड टी, भारती एअरटेल आणि अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्ये १ ते ३ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. दुसरीकडे, सन फार्माच्या शेअर्समध्ये २ टक्क्यांची घसरण झाली.

क्षेत्रिय निर्देशांकांमध्ये, निफ्टी ऑइल अँड गॅसमध्ये जवळपास ३ टक्क्यांची वाढ झाली, तर निफ्टी मेटल, निफ्टी पीएसयू बँक आणि निफ्टी कंझ्युमर ड्युरेबल्स या प्रत्येक निर्देशांकात १ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली. पण, निफ्टी फार्मा, निफ्टी प्रायव्हेट बँक आणि इतर काही निर्देशांक घसरले.

एआय क्षेत्रातील मंदीचा भारताना लाभ

इराण युद्ध संपवण्यासाठीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर, कच्च्या तेलाच्या किमती सहा महिन्यांच्या उच्चांकावरून घसरून प्रति बॅरल ११० अमेरिकन डॉलरवर आल्या.

“कच्च्या तेलाच्या किमती गेल्या आठवड्यातील ११८ अमेरिकन डॉलरच्या उच्चांकावरून आता ११० अमेरिकन डॉलरपर्यंत किंचित कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे. तितकेच महत्त्वाचे म्हणजे अमेरिकेच्या १०-वर्षीय बाँड यील्डमध्ये ४.९३ टक्क्यांपर्यंत झालेली घट. पण कदाचित या बाह्य अनुकूल घटकांपेक्षाही अधिक महत्त्वाचे म्हणजे एआय उद्योगात झालेली तीव्र घसरण, ज्यामुळे गेल्या शुक्रवारी नॅसडॅक २.८ टक्क्यांनी खाली आला होता. एआय व्यवसायातील घसरणीचा कल भारतासाठी फायदेशीर आहे, ज्याला मोठ्या प्रमाणावर एआयला टक्कर देणारा देश मानले जाते”, असे जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे मुख्य गुंतवणूक धोरणतज्ञ व्ही. के. विजयकुमार म्हणाले.