Ingersoll Rand Stock Crash : सोमवार १ जून २०२६ हा दिवस सर्वसामान्यांपासून गुंतवणूकदारांमध्ये एकामागून एक धक्क्यांचा ठरला आहे. सकाळी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती वाढण्याची बातमी आली, तर लगेच सोन्याचे दर ३००० रुपयांनी वधारल्याचे समोर आले. अशा परिस्थितीत शेअर बाजार याला अपवाद ठरला असता तर नवलं झालं असतं. औद्योगिक उपकरणे आणि इंजिनिअरिंग सोल्यूशन्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘इंजर्सोल रँड इंडिया’च्या शेअरमध्ये आज सकाळी प्रचंड घसरण पाहायला मिळाली. कमकुवत तिमाही निकालांमुळे धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी बाजारात या शेअरच्या विक्रीचा सपाटा लावला. परिणामी काही तासांतच हा शेअर ११ टक्क्यांपर्यंत तुटला.
बाजार उघडताच १५० रुपयांची घसरण
गेल्या सत्रात (शुक्रवारी) हा शेअर ४,३५२ रुपयांवर बंद झाला होता. मात्र, आज सोमवारी सकाळी बाजार उघडताच तो ४,२०० रुपयांवर खुला झाला. म्हणजेच ओपनिंगलाच शेअरमध्ये १५० रुपयांपेक्षा जास्त घसरण झाली होती. त्यानंतर विक्रीचा दबाव इतका वाढला की, काही वेळातच हा शेअर ३,८२० रुपयांच्या खाली घसरला. सकाळी १०.४० वाजेपर्यंत शेअर सुमारे ११ टक्क्यांनी घसरला होता.
का झाली मोठी घसरण?
कंपनीने २९ मे २०२६ रोजी आपले चौथ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते, ज्यामध्ये उत्पन्न आणि नफा दोन्हीवर मोठा दबाव दिसून आला. कंपनीचे उत्पन्न घसरून २९९ कोटी रुपयांवर आले आहे, जे गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत ७.०५ टक्के कमी आहे. कोणत्याही मॅन्युफॅक्चरिंग आणि इंडस्ट्रियल कंपनीच्या उत्पन्नातील घसरण ही बाजारात मागणी घटल्याचे किंवा नवीन ऑर्डर्स कमी झाल्याचे संकेत मानले जाते. या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा ६४ कोटी रुपये राहिला. कंपनी नफ्यात असली, तरी तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत नफ्याचा आलेख घसरला आहे.
मोठ्या गुंतवणूकदारांची पाठ
आजच्या घसरणीमध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शेअर्सचा झालेला प्रचंड व्यवहार. आज सकाळच्या सत्रातच ७० हजारांहून अधिक शेअर्सची खरेदी-विक्री झाली. सामान्य दिवसांत या शेअरचा सरासरी दैनंदिन व्हॉल्युम फक्त ६९ हजार शेअर्स असतो. याचा अर्थ, सुरुवातीच्या काही तासांतच दिवसभराच्या सरासरीपेक्षा जास्त ट्रेडिंग झाले. जेव्हा एखाद्या शेअरमध्ये मोठ्या घसरणीसोबत व्हॉल्युम वाढतो, तेव्हा संस्थात्मक किंवा मोठे गुंतवणूकदार एकाच वेळी बाहेर पडत असल्याचे ते लक्षण मानले जाते.
ऑल टाईम हाय आणि ऐतिहासिक परतावा
या घसरणीनंतर हा शेअर आपल्या ५,००० रुपयांच्या ऑल टाईम हाय पातळीपासून बराच खाली आला आहे. गेल्या एका वर्षाचा विचार केला तर या शेअरने फारसा परतावा दिलेला नाही. उलट तो ५ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. पण, दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी या कंपनीचा ट्रॅक रेकॉर्ड अत्यंत मजबूत राहिला आहे. या शेअरचा ऑल टाईम लो अवघा ९२.३० रुपये आहे. तिथून विचार केल्यास कंपनीने गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे.
कंपनी नेमका काय व्यवसाय करते?
इंजर्सोल रँड इंडिया ही प्रामुख्याने एअर कॉम्प्रेसर, व्हॅक्यूम सिस्टीम, फ्लुइड मॅनेजमेंट आणि इतर औद्योगिक उत्पादनांच्या क्षेत्रात काम करते. कंपनीचे उत्पन्न प्रामुख्याने देशातील औद्योगिक उपक्रम आणि कंपन्यांच्या ‘कॅपेक्स’वर अवलंबून असते. त्यामुळे जेव्हा औद्योगिक मागणी मंदावते, तेव्हा त्याचा थेट परिणाम कंपनीच्या आर्थिक ताळेबंदावर होतो.
