US Stock Market Profit Transfer To India: अलिकडील काळात भारतात बसून अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूक करणे शक्य झाले आहे. विविध अॅप्स आणि वित्तीय संस्थांच्या माध्यमातून भारतीय रहिवासी अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूक करू शकतात. दरम्यान, रेडिट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका युजरने अमेरिकी शेअर बाजारात मिळवलेला नफा योग्य आणि कायदेशीर मार्गाने भारतात कसा आणायचा याबाबत सल्ला विचारला होता.
मला ५ हजार टक्के नफा झाला
आपल्या पोस्टमध्ये हा युजर म्हणाला, “अमेरिकी शेअर बाजारातील गुंतवणुकीतील मोठ्या नफ्यावर सर्वात कर-कार्यक्षम (टॅक्स-इफिशियंट) पद्धतीने कसा व्यवहार करावा, याबाबत मला सल्ल्याची गरज आहे. एप्रिल २०२५ मध्ये, मी सॅनडिस्क (SanDisk) चे २०० शेअर्स प्रति शेअर साधारण ३२ डॉलर्स या किमतीला खरेदी केले होते. या शेअरने माझ्या अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने चांगली कामगिरी केली आहे आणि सध्या मला साधारण ५ हजार टक्के नफा झाला आहे.”
“मी पुढील काही महिन्यांत हे शेअर्स विकण्याचा विचार करत आहे, कारण सध्याच्या वेगाने होत असलेली एआयची घोडदौड अशीच सुरू राहील याबद्दल माझा आत्मविश्वास कमी होत चालला आहे. मला असे वाटते की पुढील ५-६ महिन्यांत अमेरिकन शेअर बाजारात मोठी घसरण येऊ शकते. माझा मुख्य प्रश्न असा आहे की, एका भारतीय रहिवाशासाठी असा मोठा नफा पदरात पाडून घेण्यासाठी कोणते कायदेशीर आणि कर-कार्यक्षम पर्याय उपलब्ध आहेत?”, असा प्रश्न या युजरने शेवटी विचारला.
अमेरिकी शेअर बाजारातील नफा भारतात आणण्याचा योग्य मार्ग
यानंतर लोकसत्ता ऑनलाइनने अमेरिकी शेअर बाजारातील नफा कायदेशीर मार्गाने भारतात कसा आणायचा याबाबत पुण्यातील कर तज्ज्ञ आणि सीए अनिरुद्ध राठी यांच्याकडून माहिती घेतली.
या प्रकरणाबाबत बोलताना सीए अनिरुद्ध राठी म्हणाले, “अमेरिकन शेअर बाजारात झालेला ५ हजार टक्क्यांचा नफा ऐकायला जितका स्वप्नवत वाटतो, तितकाच तो पैसा भारतात आणताना कायदेशीर आणि करविषयक नियमांचे भान ठेवणे गरजेचे आहे. परदेशी शेअर्स विकून आलेला पैसा भारतात आणणे पूर्णपणे कायदेशीर आहे, यात कोणतीही अडचण नाही. पण इथे गुंतवणूकदाराने घाईघाईत शेअर्स विकून करांमध्ये स्वतःचे नुकसान करून घेऊ नये, असा सल्ला मी देईन.”
राठी यांनी पुढे नमूद केले की, “जर हे शेअर्स खरेदी करून २४ महिने (दोन वर्षे) पूर्ण झाले नसतील, तर हा नफा शॉर्ट टर्म मानला जाईल आणि त्यावर तुमच्या नेहमीच्या प्राप्तिकर स्लॅबनुसार तब्बल ३०% ते ३९% पर्यंत मोठा कर भरावा लागू शकतो. याउलट, जर दोन वर्षे पूर्ण झाल्यावर शेअर्स विकले, तर तो लाँग टर्म नफा ठरतो आणि कराचा दर थेट २०% वर येतो. म्हणजेच, केवळ काही महिने थांबून गुंतवणूकदार आपला लाखो रुपयांचा कर वाचवू शकतो.”
“दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारत आणि अमेरिकेमध्ये दुहेरी कर टाळणी करार (DTAA) आहे. त्यामुळे अमेरिकेत जर काही कर कापला गेला असेल, तर त्याचा फायदा (Foreign Tax Credit) आपल्याला भारतात आयटीआर भरताना मिळतो. फक्त पैसे भारतात आणताना बँकेला योग्य ती कागदपत्रे आणि फॉरेन इनवर्ड रेमिटन्स सर्टिफिकेट देणे आवश्यक आहे. याचबरोबर आपल्या इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये (ITR) ‘Schedule FA’ अंतर्गत या परदेशी मालमत्तेची स्पष्ट नोंद करावी लागते, जेणेकरून भविष्यात कोणतीही नोटीस येणार नाही. सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे, आयटीआर भरताना ‘Schedule FA’ (Foreign Assets) आणि ‘Schedule CG’ (Capital Gains) मध्ये या सर्व शेअर्सची आणि नफ्याची माहिती देणे बंधनकारक आहे. असे न केल्यास ब्लॅक मनी ॲक्ट अंतर्गत मोठी दंडात्मक कारवाई होऊ शकते”, असे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणावर बोलताना राठी शेवटी म्हणाले, “परदेशी शेअर्समधील गुंतवणुकीवर मिळणारा असा अफाट नफा भारतात आणणे पूर्णपणे कायदेशीर आहे, परंतु त्यासाठी FEMA आणि आयकर कायद्याच्या चौकटीत राहून काटेकोर नियोजन करणे आवश्यक आहे. अनेकदा गुंतवणूकदारांना वाटते की अमेरिकेत कर भरला म्हणजे भारतात सूट मिळेल, पण प्रत्यक्षात भारतीय रेसिडेंट म्हणजेच निवासी करदात्यांसाठी जागतिक उत्पन्नावर भारतात संपूर्ण कर भरावा लागतो. योग्य वेळी व्यवहार (Tax Timing) करून आणि दुहेरी कर टाळणी कराराचा (DTAA) लाभ घेऊन गुंतवणूकदार आपला मोठा कर वाचवू शकतात.”
