Vedanta Aluminium Stocks Profit: वेदांताच्या चार वेगळ्या झालेल्या कंपन्यांचे आज शेअर बाजारात पदार्पण झाले. यामध्ये वेदांता ॲल्युमिनियम मेटल लिमिटेडने प्रति शेअर ५२२ रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊन सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. अब्जाधीश अनिल अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील समूहाच्या कमोडिटी व्यवसायातून वेगळ्या करण्यात आलेल्या इतर कंपन्यांच्या तुलनेत ही कामगिरी लक्षणीयरीत्या सरस ठरली.
एनएसईवर वेदांता ऑइल अँड गॅस लिमिटेडचे शेअर्स ३८ रुपये प्रति शेअर या भावाने बाजारात दाखल झाले, तर वेदांत पॉवर लिमिटेड आणि वेदांत आयर्न अँड स्टील लिमिटेडचे शेअर्स अनुक्रमे ४१.८ रुपये आणि २० रुपये या भावाने सूचीबद्ध झाले. विभाजनानंतर अस्तित्वात राहिलेल्या मूळ वेदांत लिमिटेडचे शेअर्स १.६ टक्क्यांच्या वाढीसह ३११.२ रुपयांवर व्यवहार करत आहेत.
वेदांताच्या मूळ कंपनीतून वेगळ्या करण्यात आलेल्या चार नवीन उपकंपन्यांची एकाच वेळी झालेली ‘मेगा लिस्टिंग’ आणि त्यानंतर बाजाराकडून झालेले त्यांचे मोठ्या प्रमाणावरील पुनर्मूल्यांकन यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ६३,५०० कोटी रुपयांची भर पडली आहे.
बाजारातील सुरुवातीचे भाव आणि वेदांता लिमिटेडचे सध्याचे बाजारमूल्य विचारात घेता, या पाचही कंपन्यांचे एकत्रित मूल्य मूळ वेदांताच्या एका शेअरमागे सुमारे ९३३ रुपये इतके भरले. हे मूल्य २९ एप्रिल रोजी वेदांतच्या विभाजनापूर्वीच्या ७७३.६ रुपये या बंद भावापेक्षा सुमारे २०.६ टक्क्यांनी अधिक आहे. यावरून असे दिसून येते की, गुंतवणूकदारांनी वेदांतच्या पूर्वीच्या एकत्रित रचनेपेक्षा या स्वतंत्र व्यवसायांना अधिक एकत्रित मूल्य दिले आहे.
पुनर्रचनेद्वारे निर्माण झालेल्या मूल्याचा मोठा हिस्सा ॲल्युमिनियम व्यवसायातून आला आहे. शेअर बाजारातील सहभागी आणि विश्लेषकांनी लिस्टिंगपूर्वीच ॲल्युमिनियम युनिटला समूहाची सर्वात मौल्यवान मालमत्ता मानले होते. याचे कारण म्हणजे या व्यवसायाचा मोठा विस्तार, कमी खर्चातील कामकाज आणि भविष्यातील वाढीची स्पष्ट शक्यता. ५२२ रुपये असलेली लिस्टिंगची किंमत, प्रति शेअर ४२० ते ४५० रुपये या बाजाराच्या अंदाजापेक्षा अधिक आहे.
या लिस्टिंगमुळे वेदांताच्या बहुप्रतिक्षित व्यवसाय विभाजन पूर्ण झाले आहे. या प्रक्रियेअंतर्गत १ मे या ‘रेकॉर्ड डेट’ला ज्यांच्याकडे वेदांताचा शेअर होता, अशा भागधारकांना वेदांता ॲल्युमिनियम मेटल, वेदांता ऑईल अँड गॅस, वेदांता पॉवर आणि वेदांता आयर्न अँड स्टील या कंपन्यांचा प्रत्येकी एक शेअर मिळाला.
गुंतवणूकदारांसाठी विभाजन का फायद्याचे?
विश्लेषकांनी यापूर्वी असे म्हटले होते की, स्वतंत्र सूचीकरणामुळे (लिस्टिंग) पारदर्शकता वाढू शकते आणि गुंतवणूकदारांना प्रत्येक व्यवसायाचे स्वतंत्रपणे मूल्यमापन करणे शक्य होऊ शकते. सोमवारचे सुरुवातीचा कल असे दर्शवतो की, गुंतवणूकदार ॲल्युमिनियम व्यवसायाला महत्त्वपूर्ण मूल्य देत आहेत. तसेच ते तेल आणि वायू, ऊर्जा आणि लोखंड व पोलाद या व्यवसायांनाही स्वतंत्र मूल्य देत आहेत.
