अमेरिका,इस्रायल आणि इराण दरम्यान सुरू असलेली युद्धामुळे जगभरातील भांडवली बाजारांवर लक्षणीय परिणाम झाला आहे. खनिज तेलाच्या वाढत्या किमती आणि होर्मुज सामुद्रधुनीमधून जाणाऱ्या जहाजांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे आणि अनेक उद्योगांसाठी अत्यावश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या पुरवठ्यात अडथळा निर्माण झाला आहे.
वाढत्या संकटामुळे जगभरातील कंपन्यांच्या कमाईवर परिणाम झाला आहे. यामुळे अनेक कंपन्यांनी प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) योजना पुढे ढकलली आहे. तर काही कंपन्यांनी लाभांशाचे प्रस्ताव मागे घेतले आहेत. यामध्ये फोनपेचा समावेश आहे. रिलायन्स जिओ आणि राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात एनएसईच्या आयपीओला देखील विलंब होण्याची शक्यता आहे. बाजारातील परिस्थिती साधारण होत नाही तोवर आयपीओ योजना स्थगित ठेवले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अमेरिकी कंपनी असलेल्या वॉलमार्टची भारतीय फिनटेक कंपनी फोनपेने, भू-राजकीय तणावामुळे जागतिक भांडवली बाजारात अस्थिरता निर्माण झाल्याने त्यांनी आयपीओची योजना थांबवली आहे. बाजार पुन्हा स्थिर झाल्यावर ही प्रक्रिया पुन्हा सुरू केली जाईल, असे कंपनीने म्हटले आहे. तर ‘गिफ्ट सिटी’तील पहिलावहिली एक्सईडी एक्झिक्युटिव्ह डेव्हलपमेंटचा आयपीओ अखेर गुंडाळावा लागला. यापूर्वी आखातात अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात भडकलेल्या युद्धाच्या वणव्यामुळे प्रस्तावित आयपीओला दोनदा मुदतवाढ द्यावी लागली होती. गुजरातमधील गिफ्ट सिटीच्या आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र अर्थात आयएफएससीमध्ये येणारा पहिला आयपीओ होता. सध्याच्या परिस्थितीत हा आयपीओ प्रस्ताव मागे घेण्याचा निर्णय कंपनीने घेतला असून, भविष्यात योग्य वेळी पुन्हा बाजारात उतरण्याची कंपनीला आशा आहे, असे कंपनीने म्हटले आहे.
डोमेटिक या स्वीडिश आउटडोअर टेक कंपनीने लाभांश वाटपाचा प्रस्ताव मागे घेतला असून, त्याऐवजी २०२५ साठी कोणताही लाभांश न देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने म्हटले आहे. डोमेटिक ही स्वीडनमधील स्टॉकहोम येथे मुख्यालय असलेली एक अग्रगण्य स्वीडिश कंपनी आहे, आणि ती फिरत्या जीवनशैलीसाठी (मनोरंजक वाहने, बोटी, कार) आउटडोअर तंत्रज्ञान, कूलिंग, हवामान नियंत्रण आणि स्वच्छता उपायांमध्ये जागतिक स्तरावर अग्रेसर आहे.
ऑनलाइन ट्रॅव्हल एजंट लव्हहॉलिडेजने १ अब्ज पाउंडचा (१.३अब्ज डॉलर) लंडन शेअर बाजारातील योजना पुढे ढकलण्याची तयारी सुरू केली आहे.
मॅकॉय ग्लोबल या कॅनडाच्या कंपनीने आखाती देशांमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक लवचिकता टिकवून ठेवण्यासाठी तिमाही लाभांश स्थगित केला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या संघर्षामुळे अनिश्चितता निर्माण झाली असून त्याचा परिणाम वाहतूक आणि सेवांवर झाला आहे.
