Crude oil price surge impact on Indian share market: गेल्या काही आठवड्यांपासून अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात लष्करी संघर्ष सुरू आहे. या संघर्षामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. परिणामी कच्च्या तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या किमती वाढल्याने जगभरातील गुंतवणूकदारांच्या भावना कमकुवत झाल्या आहेत. त्यामुळे याचा शेअर बाजारांवरही परिणाम होत आहे.
दुपारी ३:१५ वाजता सेन्सेक्स १,३५२.७४ अंशांच्या घसरणीसह ७७,५६६.१६ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक ४२२.४० अंशांच्या घसरणीसह २४,०२८.०५ वर बंद झाला.
या तीव्र घसरणीमुळे बीएसईवर सूचीबद्ध असलेल्या सर्व कंपन्यांच्या एकूण बाजार भांडवलातून १२.३९ लाख कोटी रुपयांनी घटले आहे. ते आता ४३७ लाख कोटी रुपयांवर आले आहे.
१. कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ:
पश्चिम आशियातील तणाव वाढल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती १०० डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेल्या आहेत. सोमवारी सकाळी फ्युचर्स ट्रेडमध्ये ब्रेंट क्रूड २०% वाढून १०९.११ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला. तर, डब्ल्यूटीआय क्रूड १८% वाढून १०९.१७ डॉलरवर व्यवहार करत आहे.
२. यूएस फ्युचर्स:
तेलाच्या किमती वाढल्यानंतर यूएस फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट्समध्ये घसरण झाली आहे, ज्यामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या मंदीबद्दल चिंता निर्माण झाली आहे. डाऊ जोन्सशी संबंधित फ्युचर्स ८४८ अंकांनी किंवा १.७९% घसरले. एस अँड पी ५०० फ्युचर्स १.७% घसरले आणि नॅस्डॅक १०० फ्युचर्स १.९% घसरले.
३. गोंधळाचे कारण काय:
इराणने म्हटले आहे की ते अमेरिका आणि इस्रायलच्या तळांवर हल्ले सुरूच ठेवतील. इतकेच नाही तर, इराणने प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेचे मित्रराष्ट्र असलेल्या आखाती देशांतील तेल शुद्धीकरण कारखाने आणि कंटेनर्सना लक्ष्य केले आहे. यापूर्वी इराणने हॉर्मुझच्या सामुद्रधुनी येथील मालवाहू जहाजांवरही हल्ले केले होते.
४. विश्लेषक काय म्हणाले?
जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे मुख्य गुंतवणूक धोरणकार व्हीके विजयकुमार म्हणाले की, कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ भारतासारख्या तेल आयात करणाऱ्या अर्थव्यवस्थांवर मोठा परिणाम करू शकते. “ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती ११५ डॉलर्सच्या वर गेल्याने अर्थव्यवस्था आणि शेअर बाजारांना मोठा धक्का बसला आहे. जर पश्चिम आशियाई संघर्ष दीर्घकाळ टिकला आणि कच्च्या तेलाच्या किमती चढ्या राहिल्या तर भारतासारख्या मोठ्या तेल आयातदारांना मोठा फटका बसेल. या तेलाच्या धक्क्याचे आर्थिक परिणाम बाजाराला मोजावे लागतील”, असे ते म्हणाले.
