Options Trading: दरमहा २ लाख रुपये पगार आणि १४ लाख रुपयांची बचत असलेल्या आयटी क्षेत्रातील एका ३५ वर्षीय कर्मचाऱ्याला शेअर बाजार ट्रेडिंगमुळे ३८ लाख रुपयांचा फटका बसला आहे. ऑप्शन्स ट्रेडिंग, कर्ज काढणे आणि झालेले नुकसान भरून काढण्याच्या नादात आणखी पैसे गुंतवणे या चक्रात अडकल्याने या कर्मचाऱ्या हे नुकसान झाले.
हेमदर्पण नवाच्या एक्स युजरने आपल्या एका मित्राचा अनुभव शेअर केला आहे. या युजरच्या पोस्टनुसार, त्याचा मित्र आयटी क्षेत्रात कार्यरत आहे. तो विवाहित असून त्याला एक मूलही आहे.
एक्स युजरच्या दाव्यानुसार, ट्रेडिंगमधील तोट्यामुळे त्यांच्या मित्राची सर्व बचत संपली आहे. यामुळे त्याने खोटे कारण सांगून पर्सनल लोन घेतले आणि अखेरीस कर्ज वसुली करणाऱ्या एजंट्सनी त्यांच्या कामाच्या ठिकाणी व पत्नीशी संपर्क साधण्यास सुरुवात केली.
“आज त्यांचे ३८ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, कर्ज वसुलीसाठी त्यांच्या पगारावर टाच आणली गेली आहे आणि त्यांची पत्नी माहेरी गेली आहे”, असे या युजरने लिहिले आहे.
१८ हजारांचा नफा आणि नंतर लाखोंचे नुकसान
एक्स युजरच्या पोस्टनुसार, एका सहकाऱ्याने दुपारच्या जेवणाच्या वेळी झिरोधाचा डॅशबोर्ड दाखवल्यानंतर त्याच्या मित्राने २०२४ च्या सुरुवातीला ट्रेडिंगला सुरुवात केली. त्या सहकाऱ्याने निफ्टी ऑप्शन्समध्ये ट्रेडिंग करून अवघ्या ४५ मिनिटांत १२,००० रुपये कमावले होते.
एक्स युजरच्या या मित्राने ५० हजार रुपयांपासून ट्रेडिंगला सुरुवात केली. तिसऱ्याच दिवशी, आउट-ऑफ-द-मनी कॉल ऑप्शन्स खरेदी करून त्याने दोन तासांपेक्षा कमी वेळात १८,००० रुपये कमावले. सुरुवातीला मिळालेल्या या नफ्यामुळे मित्राचा त्याच्या नियमित नोकरीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. दिवसाला १०,००० रुपये कमावल्यास महिन्याला २ लाख रुपये कसे मिळू शकतील, याचा हिशोब तो करू लागला. मात्र, या सुरुवातीच्या यशानंतर परिस्थिती अचानक बदलली आणि तोटा होऊ लागला, असे त्याने पुढे नमूद केले आहे.
पत्नी सोडून गेली
२०२५ च्या मध्यापर्यंत, युजरच्या मित्राची १४ लाख रुपयांची संपूर्ण बचत कथितरीत्या संपली होती. गेल्या वर्षाच्या उत्तरार्धात परिस्थिती अत्यंत गंभीर वळणावर पोहोचली. कर्ज वसुली करणारे एजंट्स नोंदणीकृत कार्यालयाच्या क्रमांकावर आणि त्याच्या पत्नीच्या फोनवर संपर्क करू लागले.
यानंतर युजरच्या मित्राला आपल्या कुटुंबासमोर परिस्थितीचे गांभीर्य स्पष्ट करावे लागले. यात बचतीतील गमावलेली रक्कम, २४ लाख रुपयांचे कर्ज आणि मुलाच्या शाळेची फी न भरणे या गोष्टींचा समावेश होता. यामुळे त्याची पत्नी मुलाला घेऊन आपल्या माहेरी निघून गेली, तर आयुष्यभराच्या कष्टाची कमाई गमावल्यामुळे त्याचे आई-वडील पूर्णपणे खचून गेले.
