Jeremy Grantham SpaceX warning comes true as SpaceX share price drop hits Wall Street: एलॉन मस्क यांची स्पेसएक्स कंपनी आता अमेरिकन शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक नॅस्डॅक १०० मध्ये समाविष्ट झाल्यामुळे, या रॉकेट कंपनीचे भवितव्य प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जगभरातील लाखो लोकांच्या गुंतवणूक पोर्टफोलिओचा भाग बनले आहे. मात्र, नॅस्डॅक निर्देशांकात समाविष्ट झाल्यानंतरही टीकाकारांचे समाधान झालेले नाही. या कंपनीच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांबद्दल त्यांच्या मनात अजूनही शंका आहे.

आपल्या आयपीओ पूर्वी जाहीर केलेल्या माहितीपत्रकात स्पेसएक्सने म्हटले होते की, त्यांचे ध्येय “मानवी जीवनाला ‘मल्टीप्लॅनेटरी’ बनवण्यासाठी आवश्यक प्रणाली आणि तंत्रज्ञान विकसित करणे”, हे आहे.

स्पेसएक्सच्या या ध्येयावर प्रतिक्रिया देताना गुंतवणूक क्षेत्रातील दिग्गज कंपनी जीओमओ चे सह-संस्थापक जेरेमी ग्रँथम यांनी, अशी विधाने भविष्यातील गुंतवणूकदारांसाठी हास्यास्पद ठरतील, असे म्हटले आहे.

मॉर्निंगस्टारच्या ‘द लाँग व्ह्यू’ या पॉडकास्टच्या एका भागात बोलताना जेरेमी ग्रँथम म्हणाले, “मानवी इतिहासातील सर्वात विलक्षण IPO खरेदी करण्याचा सल्ला देण्यासाठी सगळेच जण रांगेत उभे आहेत. ५० वर्षांनंतर लोक ‘स्पेसएक्स’ बद्दलच्या गोष्टी सांगतील आणि त्यावर लिखाण करतील. ते तुम्हाला कंपनीच्या माहितीपत्रकातील काही परिच्छेद वाचून दाखवतील आणि तेव्हा तुम्हाला त्या गोष्टींवर हसू येईल.”

‘स्पेसएक्स’चा आयपीओ बाजारात आल्यापासून अत्यंत आशावादी गुंतवणूकदारांनाही कदाचित वास्तवाची जाणीव होत असावी. कारण गेल्या एका महिन्यात ‘स्पेसएक्स’च्या शेअरच्या किमतीत ७ टक्क्यांची घट झाली असून, तो आयपीओच्या किमतीच्या खाली घसरला आहे.

ग्रँथम यांनी पॉडकास्टमध्ये पुढे सांगितले की, वॉल स्ट्रीटवरील बँकांनी आपल्या ग्राहकांना ‘स्पेसएक्स’चे शेअर्स खरेदी करण्याची जी शिफारस केली आहे, त्याबद्दल त्यांना आश्चर्य वाटते. ते म्हणाले, “अखेरीस सत्य समोर येईलच आणि अर्थातच, इतिहासाकडे मागे वळून पाहताना ज्या ऐतिहासिक घटनांना मी अत्यंत महत्त्वाचे मानतो, त्यापैकीच ही एक घटना ठरेल. तसे पाहता, जर ही कंपनी कोसळली नाही तर ती एक विलक्षण गोष्ट ठरेल. कारण यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात इतक्या प्रचंड प्रगतीची आवश्यकता असेल की ज्यामुळे आपले संपूर्ण जीवनच पूर्णपणे बदलून जाईल.”

स्पेसएक्स शेअर आयपीओ किमतीच्या खाली

स्पेसएक्स शेअरने ८ जुलै २०२६ रोजी सर्वकालीन नीचांक गाठला असून तो आता आयपीओ किमतीच्या खाली घसरला आहे. ही घसरण होत असतानाही मॉर्गन स्टॅनलेच्या एडम जोनास यांनी स्पेसएक्सला ‘ओव्हरवेट’ रेटिंग दिले असून हा शेअर ३०० डॉलर्सपर्यंत वाढेल असा अंदाज वर्तवला आहे.