Jeremy Grantham Stock Market Crash Prediction News: जेरेमी ग्रँथम हे शेअर बाजारातील दिग्गज व्यक्तिमत्त्व आणि ‘मार्केट बबल्स’चा अचूक अंदाज लावण्यासाठी प्रसिद्ध आहेत. जीएमओ या मालमत्ता व्यवस्थापन कंपनीचे सह-संस्थापक असलेल्या जेरेमी ग्रँथम यांनी २००० मधील ‘डॉट-कॉम’ क्षेत्रातील घसरण आणि २००८ मधील आर्थिक संकट यांबाबत दिलेला इशारा खरा ठरला होता. आता, शेअर बाजारात आणखी एका मोठ्या पडझडीची किंवा संकटाची चिन्हे दिसत असल्याचे त्यांचे मत आहे.

द डायरी ऑफ अ सीईओ या पॉडकास्टवरील अलीकडील एका मुलाखतीत ग्रँथम यांनी अमेरिकन शेअर बाजाराबाबत स्पष्ट शब्दांत आपले मत मांडले. ते म्हणाले, “मला वाटते की, अमेरिकेच्या इतिहासातील हा गुंतवणुकीचा सर्वात मोठा ‘बबल’ आहे.”

अमेरिकेच्या शेअर बाजारातील ही तेजी एक ताकद आहे. गेल्या पाच वर्षांत प्रमुख निर्देशांक एस अँड पी ५०० मध्ये ७०% पेक्षा जास्त वाढ झाली आहे, तर गुंतवणूकदारांच्या एआयबद्दलच्या उत्साहामुळे अनेक टेक कंपन्यांचे शेअर्स गगनाला भिडले आहेत. परंतु ग्रँथम यांना सर्वाधिक लोकप्रिय कंपन्यांच्या मागे लागण्यात धोका दिसतो.

“ज्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे, विशेषतः एआयशी संबंधित, त्यांच्याबाबत ऐतिहासिकदृष्ट्या अशी अपेक्षा असते की तेच सर्वाधिक खाली येतील. या पातळीवरून त्यात ७०% घसरण होणे ही अनपेक्षित बाब ठरणार नाही”, असे ते म्हणाले.

या मुलाखतीमध्ये जेरेमी ग्रँथम यांनी स्पष्टपणे शेअर्स विकण्याचा सल्ला दिला आहे. “जर तुमची अमेरिकन तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी गुंतवणूक असेल, तर माझा वैयक्तिक सल्ला असेल की ते सर्व विकून टाका”, असे ते म्हणाले.

आपल्या गुंतवणुकीच्या दृष्टिकोनाचा भाग म्हणून, ग्रँथम यांनी अमेरिकन इक्विटीवरील अवलंबित्व कमी करून आंतरराष्ट्रीय बाजारांमधील गुंतवणूक वाढवण्याची शिफारस केली. त्यांनी बॉण्ड्स आणि सोने-चांदीसारख्या मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक करून गुंतवणुकीत वैविध्य आणावे, असे आवाहन सर्वसामान्य गुंतवणूकदारांना केले.

अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात महागडा बाजार

तत्पूर्वी जेरेमी ग्रँथम यांनी सीएनबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत याला “अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात महागडा बाजार” म्हटले. आजच्या बाजाराशी कोणत्या कालावधीची सर्वाधिक तुलना करता येईल, असे विचारल्यावर ते म्हणाले की, २००० सालचा टेक बबल “सर्वात जवळचा” असेल. “बाजार उच्चांक गाठेल आणि पुन्हा कोसळेल. इथून पुन्हा बाजारात तेजी परतण्यासाठी ५०% ऐवजी ७०% घसरण होण्याची शक्यता आहे”, असा इशारा त्यांनी दिला.