Jio Platforms IPO And Meta-Google Returns: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्त्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी असलेल्या जिओ प्लॅटफॉर्म्सचा आयपीओ लवकरच शेअर बाजारात पदार्पण करणार आहे. यासाठी रिलायन्सकडून जोरदार तयारी सुरू असून, या आयपीओमुळे मेटा प्लॅटफॉर्म आणि गुगलसारख्या तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांना ३.१८ लाख कोटी रुपयांचा लाभ होणार आहे.
जिओमधील आघाडीच्या १० नॉन-प्रमोटर गुंतवणूकदारांकडे २,८४,४३,२०,७२० शेअर्स आहेत. ज्यांची किंमत ३.१८ लाख कोटी रुपये आहे. याबाबत बिझनेस टुडेने कंपनीच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसच्या हवाल्याने वृत्त दिले आहे.
मेटा प्लॅटफॉर्म्सची संलग्न कंपनी असलेल्या जादू होल्डिंग्सकडे रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस दाखल केलेल्या तारखेपर्यंत जिओ प्लॅटफॉर्म्समधील ८९,२२,७५,९१३ शेअर्स होते. आयपीओ पूर्वीच्या शेअर भांडवलाच्या ९.९८ टक्के इतके आहेत. १,०६५ ते १,११९ रुपये प्रति इक्विटी शेअर या किमतीच्या पट्ट्यातील उच्च मर्यादेनुसार या हिस्साचे मूल्य ९९,८४५ कोटी रुपये इतके होते.
मेटाने सुरुवातीला ७ जुलै २०२० रोजी ५५,४९,३८,३४० शेअर्स प्रत्येकी ४८८.३४ रुपये दराने खरेदी करून जिओमध्ये गुंतवणूक केली होती. डिसेंबर २०२० पर्यंत, गुगलने खाजगी प्लेसमेंटद्वारे जारी केलेले, प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्य असलेले आपले ‘कम्पल्सोरिली कन्व्हर्टिबल प्रेफरन्स शेअर्स’ रूपांतरित केले होते. आयपीओ किमतीच्या श्रेणीतील उच्च मर्यादेनुसार, त्यांच्या या गुंतवणुकीवर १२९ टक्क्यांचा परतावा मिळणे शक्य आहे.
गुगल इंटरनॅशनल एलएलसीडे जिओचे ६,९०,८५४,७७५ शेअर्स आहेत, ज्याचे मूल्य ७७,३०६ कोटी रुपये आहे. २३ नोव्हेंबर २०२० रोजी गुगलला प्रत्येकी ४८८.३४ रुपये दराने शेअर्स जारी करण्यात आले होते.
सौदी अरेबिया सरकारचा फंड असलेल्या पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंडकडे जिओचे प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्याचे २,०६,९३१,८९९ शेअर्स आहेत. या २.३१ टक्के हिश्शाची किंमत २३,१५५ कोटी रुपये आहे.
जिओ आयपीओचे वैशिष्ठ्य
भारतातील यापूर्वीचे बहुतांश मोठे आयपीओ हे ‘ऑफर फॉर सेल’ (OFS) स्वरूपाचे होते, ज्यामध्ये मूळ प्रवर्तक किंवा भागधारक आपले शेअर्स विकून बाहेर पडत असत आणि कंपनीला कोणताही थेट निधी मिळत नसे. जिओचा हा इश्यू संपूर्णपणे ‘फ्रेश इश्यू’ (नवीन शेअर्सची विक्री) असणार आहे. जिओच्या आयपीओमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज (६६.४३ टक्के हिस्सा), मेटा (९.९८ टक्के हिस्सा) किंवा गूगल (७.७३ टक्के हिस्सा) यांपैकी कोणताही विद्यमान भागधारक आपला हिस्सा विकत नाहीये.
