Jio Platforms Q2 Results : शेअर बाजारात नुकतेच दमदार पदार्पण करणाऱ्या जिओ प्लॅटफॉर्म्सने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत चांगली कामगिरी नोंदवली आहे. जुलै ते सप्टेंबर २०२६ या तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा वार्षिक तुलनेत १३.७ टक्क्यांनी वाढून ८,३८९ कोटी रुपयांवर पोहोचला. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने ७,३७९ कोटी रुपयांचा नफा नोंदवला होता.
कंपनीने शुक्रवारी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, तिमाहीत परिचालनातून मिळणारा एकत्रित महसूल ११.४ टक्क्यांनी वाढून ४०,४७५ कोटी रुपये झाला. मागील वर्षी याच कालावधीत तो ३६,३३८ कोटी रुपये होता. जून तिमाहीच्या तुलनेतही कंपनीच्या नफ्यात आणि महसुलात वाढ झाली आहे. पहिल्या तिमाहीतील ७,७६५ कोटी रुपयांच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीत निव्वळ नफा आठ टक्क्यांनी वाढला. तर परिचालन महसूल ३.३ टक्क्यांनी वाढून ३९,१७३ कोटी रुपयांवरून ४०,४७५ कोटी रुपयांवर पोहोचला.
शेअर बाजारात सूचिबद्ध झाल्यानंतर जिओ प्लॅटफॉर्म्सने जाहीर केलेला हा पहिलाच तिमाही निकाल आहे. कंपनीने बुधवारी शेअर बाजारात दमदार पदार्पण केले होते. १,११९ रुपये इश्यू किंमत असलेला समभाग मुंबई शेअर बाजारात (बीएसई) १,३५८ रुपयांवर सूचिबद्ध झाला. ही इश्यू किमतीच्या तुलनेत २१.३६ टक्के वाढ होती. व्यवहारअखेर समभाग १,४१७.३५ रुपयांवर बंद झाला. म्हणजेच इश्यू किमतीच्या तुलनेत त्यात २६.६६ टक्क्यांची वाढ झाली.
राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) समभाग १,४१७.५० रुपयांवर बंद झाला. या दमदार पदार्पणामुळे बाजारमूल्याच्या दृष्टीने जिओ प्लॅटफॉर्म्स देशातील दुसरी सर्वाधिक मूल्यवान कंपनी ठरली.
