Jio Platforms Share Listing Retail Investors Borrowed 2228 Crores From MTF: रिलायन्स समूहाच्या जिओ प्लॅटफॉर्म्स कपंनीने २८ ऑक्टोबर रोजी शेअर बाजारात दमदार पदार्पण करत इतिहास घडवला आहे. बाजारात सूचिबद्ध होताच, जिओ सर्वाधिक बाजार भांडवल असलेली दुसऱ्या क्रमांकाची कंपनी बनली आहे. दरम्यान जिओ बाजारात सूचिबद्ध झाल्याच्या दिवशी भारतातील किरकोळ गुंतवणूकदारांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यासाठी मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटीच्या माध्यमातून २२२८ कोटी रुपये कर्ज घेतल्याची माहिती समोर आली आहे.

‘मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी’ (MTF) ही शेअर बाजारांची मान्यता असलेली एक सुविधा आहे, ज्याद्वारे ट्रोडर्स आणि गुंतवणूकदार सक्रियपणे व्यवहार होणारे शेअर्स खरेदी करण्यासाठी ब्रोकरकडून व्याजावर पैसे उसने घेऊ शकतात.

नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाने (NSE) जिओ प्लॅटफॉर्म्सला त्याच्या पदार्पणाच्या वेळी ‘ग्रुप १’ सिक्युरिटीजच्या श्रेणीत, तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने (BSE) ‘ग्रुप ए’ श्रेणीत वर्गीकृत केले. यामुळे पहिल्या सत्रापासूनच हा शेअर ‘मार्जिन फंडिंग’ सुविधेसाठी पात्र ठरला.

एनएसई आणि बीएसईकडील २८ ऑक्टोबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार, केवळ एचडीएफसी बँक, जिओची पालक कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज आणि बीएसई लिमिटेड यांच्याकडेच यापेक्षा मोठी ‘मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी’ पोझिशन्स आहेत.

व्याजापेक्षा जास्त परताव्याची अपेक्षा

कोटक निओचे अध्यक्ष आणि डिजिटल बिझनेस हेड, आशिष नंदा यांनी सांगितले की, काही गुंतवणूकदारांना असा विश्वास आहे की, जिओ प्लॅटफॉर्म्समधून मिळणारा परतावा, त्यांना भांडवल उभारण्यासाठी लागणाऱ्या खर्चापेक्षा (व्याजदरापेक्षा) अधिक असू शकतो. भारतामध्ये मार्जिन ट्रेडिंगवर आकारला जाणारा व्याजदर साधारणपणे वार्षिक ९% ते १८% च्या दरम्यान असतो.

एचडीएफसी सिक्युरिटीजचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज रेल्ली यांच्या मते, जरी जिओ प्लॅटफॉर्म्समधील MTF पोझिशन मोठी वाटत असली, तरी ती कंपनीच्या एकूण बाजार भांडवलाच्या केवळ ०.१७% इतकीच आहे.

जिओची बाजारातील कामगिरी

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या या डिजिटल सेवा कंपनीच्या शेअर्सनी बीएसई आणि एनएसई या दोन्ही शेअर बाजारांत २८ ऑक्टोबर रोजी १३५८ रुपयांच्या किमतीवर पदार्पण केले. ही किंमत इश्यू किमतीच्या (१११९ रुपये) तुलनेत २१.३६ टक्क्यांनी अधिक होती. पहिल्या दिवसाच्या अखेरीस बीएसईवर कंपनीचे शेअर्स १४१७.३५ रुपयांवर बंद झाले. जे इश्यू किमतीच्या तुलनेत २६.६६ टक्क्यांनी अधिक होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच २९ ऑक्टोबर रोजीही जिओमध्ये तेजी पाहायला मिळाली. तर आज ३० ऑक्टोबर रोजीही जिओचे शेअर सकारात्मक व्यवहार करत आहेत.