Jio platforms share price surge: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्त्वाखाली रिलायन्स समूहाच्या जिओ प्लॅटफॉर्म्स कंपनीने काल शेअर बाजारात दमदार पदार्पण करत २७ टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवली होती. त्यानंतर या शेअरमध्ये गेल्या दोन दिवसांत मोठी वाढ पाहायला मिळत आहे. त्यामुळे जिओचे गुंतवणूकदार भरघोस नफा कमत आहेत.

२९ ऑक्टोबर रोजी जिओचा शेअर ‘गॅप-अप’सह खुला झाला आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर पाच टक्क्यांहून अधिक वाढीसह १४८९.७० रुपयांची उच्चांकी पातळी गाठली होती. दिवसाच्या उच्चांकी पातळीवर, केवळ दोन ट्रेडिंग सत्रांमध्ये हा शेअर त्याच्या १११९ रुपयांच्या इश्यू किमतीच्या तुलनेत ३३ टक्क्यांहून अधिक वधारला होता.

पुढे ३० ऑक्टोबर रोजी सलग तिसऱ्या दिवशीही जिओ प्लॅटफॉर्म्सच्या शेअरने वाढ नोंदवली होती. जिओ प्लॅटफॉर्म्सचे शेअर काल १,४१०.१० रुपयांवर उघडले होते. त्यांनी १,४३९.९० रुपये हा दिवसातील उच्चांक तर १,३८६.८० रुपये हा निचांक गाठला होता. त्यानंतर ते १.१२ टक्क्यांच्या वाढीसह १,४३७.५० रुपयांवर बंद झाले.

दरम्यान, नोमुरा, मोतीलाल ओसवाल आणि एलारा कॅपिटल या तीन ब्रोकरेज संस्थांनी जिओ प्लॅटफॉर्म्सचे विश्लेषण सुरू केले असून त्यांनी या कंपनीसाठी ‘बाय’ असे रेटिंग दिले आहे.

मोतीलाल ओसवाल: १,६९० रुपयांचे टार्गेट

मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसने जिओच्या विश्लेषणास सुरुवात केली असून, त्यांनी या शेअरसाठी ‘बाय’ (खरेदी करा) असा सल्ला दिला आहे. तसेच, १३५० रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित केली आहे. हे आयपीओची किंमत असलेल्या १११९ रुपयांच्या तुलनेत सुमारे २१% वाढीची शक्यता दर्शवते.

याव्यतिरिक्त, मोतीलाल ओसवालने १६९० रुपयांची सर्वात आशावादी परिस्थितीतील टार्गेट प्राईस निश्चित केली आहे. जी व्यापक बाजारपेठ, संबंधित क्षेत्र आणि कंपनीच्या कामगिरीबाबतच्या सकारात्मक कामगिरीवर आधारित आहे. याउलट नकारात्मक परिस्थितीतील टार्गेट प्राईस १०३५ रुपये इतकी निश्चित केली आहे. थोडक्यात सांगायचे तर अत्यंत अनुकूल परिस्थितीत हा शेअर त्याच्या इश्यू प्राईसच्या तुलनेत ५१% पर्यंत वाढू शकतो.

नोमुरा: १३४० रुपयांचे टार्गेट

नोमुरा ब्रोकरेज फर्मने जिओ प्लॅटफॉर्म्सवर ‘बाय’ रेटिंगसह विश्लेषण सुरू केले असून, प्रति शेअर १३४० रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित केली आहे. ब्रोकरेजच्या मते जिओ दूरसंचार बाजारातील एक महत्त्वाची कंपनी म्हणून उदयास आली असून, आता ती बाजारपेठेतील आघाडीची कंपनी बनली आहे.

एलारा कॅपिटल: १३६७ रुपयांचे टार्गेट

एलारा कॅपिटलने जिओ प्लॅटफॉर्म्सला ‘बाय’ (खरेदी) रेटिंग दिले आहे. ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी १३६७ रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित केली आहे. ही आयपीओ किमतीपेक्षा सुमारे २२% अधिक आहे.

एलारा कॅपिटलच्या मते जिओ केवळ एक टेलिकॉम ऑपरेटर न राहता आता एका डिजिटल प्लॅटफॉर्मच्या दिशेने विकसित होत आहे. कंपनी आपल्या मोठ्या ग्राहक वर्गाचा आणि तांत्रिक पायाभूत सुविधांचा वापर करून आपली कमाई वाढवण्यासाठी नवीन मार्ग शोधू शकते.