Jio Platforms Share Price Today target buy sell hold market trends: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्त्वाखाली रिलायन्स समूहातील कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्सने शेअर बाजारातील पदार्पणानंतर आज सलग तिसऱ्या दिवशी वाढ नोंदवली आहे. जिओ प्लॅटफॉर्म्सचे शेअर आज १,४१०.१० रुपयांवर उघडले होते. त्यांनी आज १,४३९.९० रुपये हा दिवसातील उच्चांक तर १,३८६.८० रुपये हा निचांक गाठला होता. त्यानंतर ते १.१२ टक्क्यांच्या वाढसह १,४३७.५० रुपयांवर बंद झाले.
२८ ऑक्टोबर रोजी १,३५९ रुपयांच्या किमतीवर या कंपनीचे शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. जे आयपीओ किमतीच्या तुलनेत २१.३६ टक्के अधिक होते. या ताज्या वाढीसह, पहिल्या तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये शेअरमध्ये २८ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
बाजारात दणक्यात पदार्पण
जिओ प्लॅटफॉर्म्सने १,३५८ रुपयांच्या किमतीवर सूचीबद्ध होत, बाजार भांडवलाच्या दृष्टीने भारतातील दुसरी सर्वात मोठी सूचीबद्ध कंपनी म्हणून स्थान मिळवले. यामुळे कंपनीचे मूल्य सुमारे १२.५ लाख कोटी रुपये इतके ठरले आणि जिओ स्पर्धक कंपनी भारती एअरटेलच्या पुढे गेली.
या आयपीओसाठी गुंतवणूकदारांकडून जोरदार मागणी पाहायला मिळाली. आयीपीओ सुरू झाल्यानंतर १०० मिनिटांच्या आतच तो पूर्णपणे सबस्क्राईब झाला होता. पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव असलेला ५,५०० कोटी रुपयांचा हिस्सा पहिल्या १० मिनिटांतच सबस्क्राईब झाला. तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस या आयपीओला विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या शेअर्सच्या तुलनेत २२.२ पट अधिक बोली मिळाली होती.
बाजारात सूचिबद्ध झाल्यापासून सतत वाढ नोंदवत असलेल्या जिओ प्लॅटफॉर्म्सच्या शेअरबाबत आता चार ब्रोकरेज संस्थानी ‘बाय’ रेटींग दिले असून, शेअर पुढेही वाढत राहिल असे मत नोंदवले आहे.
नोमुरा
जपानी ब्रोकरेज फर्म नोमुराने सर्वप्रथम या कंपनीचे विश्लेषण सुरू केले. त्यांनी या शेअरला ‘बाय’ रेटिंग दिले आणि आयपीओ किमतीच्या तुलनेत १,३४० रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित केली होती. शेअर ही पातळी आधीच ओलांडून पुढे गेला आहे. विश्लेषकांच्या मते, कंपनीच्या 5G कव्हरेजमुळे, प्रति ग्राहक डेटाचा वापर एअरटेलच्या तुलनेत २७ टक्क्यांनी अधिक आहे.
मोतीलाल ओसवाल
देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने कंपनीला जिओचा ‘डिजिटल इंडियाचे प्रवेशद्वार’ असा उल्लेख करत, ‘बाय’ रेटिंग आणि १,३५० रुपयांच्या टार्गेट प्राईससह विश्लेषण सुरू केले आहे.
दौलत कॅपिटल
दौलत कॅपिटलच्या मते, जिओ प्लॅटफॉर्म्स आता केवळ एक दूरसंचार कंपनी न राहता तिचे त्याहून मोठ्या गोष्टीत रुपांतर होत आहे. दौलत कॅपिटलने ‘अॅक्युम्युलेट’ रेटिंग आणि १,४३५ रुपयांच्या टार्गेट प्राईससह जिओ प्लॅटफॉर्म्सचे कव्हरेज सुरू केले आहे.
एलारा कॅपिटल
परवडणारी किंमत ही जिओची डिजिटल झेप आहे, असे एलारा कॅपिटलचे म्हणणे आहे. या ब्रोकरेज संस्थेने या शेअरला ‘बाय’ रेटिंग दिले आहे.
