KPIT Tech Share Price Drop detail highlight: पुण्यात मुख्यालय असलेल्या आणि ऑटोमोटिव्ह सॉफ्टवेअर क्षेत्रात जागतिक स्तरावर आघाडीच्या केपीआयटी टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीच्या शेअरसाठी सध्याचा काळ अत्यंत आव्हानात्मक ठरत आहे. २०२६ या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत या कंपनीच्या शेअरमध्ये तब्बल ४९ टक्क्यांची घसरण नोंदवली गेली आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
सध्याच्या घसरणीमागे कंपनीच्या कामगिरीपेक्षा जागतिक ऑटोमोबाईल उद्योगातील बदललेली समिकरणे आणि ग्राहकांचे प्राधान्यक्रम जबाबदार असल्याचे समोर येत आहे. अलीकडेच निर्मल बंग इन्स्टिट्यूशनल इक्विटीज या संस्थेने आयोजित केलेल्या गुंतवणूकदार परिषदेत यावर सविस्तर चर्चा झाली. या अहवालानुसार ऑटो क्षेत्रातील काही मोठ्या जागतिक कंपन्यांनी घेतलेल्या निर्णयांचा थेट फटका केपीआयटी टेकच्या व्यवसायाला बसला आहे.
या निर्णयांमध्ये प्रामुख्याने होंडाने आपला अमेरिकेतील थांबवलेला इलेक्ट्रिक वाहन कार्यक्रम, रेनॉल्ट कंपनीने आपल्या सॉफ्टवेअर-डिफाइन्ड व्हेइकलमध्ये केलेले बदल आणि एका प्रमुख जर्मन ऑटोमोबाईल कंपनीने आपल्या गुंतवणुकीला तात्पुरती दिलेली स्थगिती यांचा समावेश आहे.
या कारणांमुळे कंपनीच्या कामगिरीवर परिणाम झाला आहे. तसेच, जागतिक स्तरावर पुरवठा साखळीतील अडचणी आणि चिनी मूळ उपकरण उत्पादक कंपन्यांशी स्पर्धा यामुळेही संपूर्ण क्षेत्र दबावाखाली आहे. कंपनीचा महसूल आणि मार्जिनवरील दबाव कायम राहण्याची शक्यता असून आर्थिक वर्ष २०२८ मध्येच यात पूर्ण सुधारणा दिसून येईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
या सर्व आव्हानांनंतरही कंपनीचे व्यवस्थापन सकारात्मक आहे. डिसेंबर तिमाहीपासून कामगिरीमध्ये सुधारणा होण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ‘निर्मल बंग’ने या शेअरसाठी ६७२ रुपये प्रति शेअर टार्गेट प्राईस निश्चित करून ‘होल्ड’ रेटिंग कायम ठेवले आहे.
बाजारपेठेतील संमिश्र प्रतिक्रिया
ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार या शेअरवर विश्लेषकांचे संमिश्र मत पाहायला मिळत आहे. सध्या या शेअरसाठी १० ‘बाय’, ६ ‘होल्ड’ आणि ८ ‘सेल’ अशा शिफारसी आहेत. या शेअरसाठी १२ महिन्यांची टार्गेट प्राईस ६४२ रुपये असून, त्यावरून भविष्यात सुमारे ८.९ टक्के वाढीची शक्यता वर्तवली जात आहे.
यापूर्वी ब्रोकरेज कंपन्यांनी वेगवेगळे अंदाज व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले आहे. १७ ऑगस्ट रोजी फिलिप कॅपिटलने ८०० रुपयांच्या टार्गेट प्राईससह हा शेअर ‘खरेदी’ करण्याचा सल्ला दिला होता, तर ३६० वन कॅपिटलने ५८० रुपयांच्या टार्गेट प्राईससह ‘होल्ड’ रेटिंग दिले होते. याशिवाय कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज आणि पीएल कॅपिटल यांनी अनुक्रमे ५४० रुपये आणि ४६० रुपये टार्गेट प्राईससह ‘सेल’ रेटिंग दिले आहे.
(शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन असते. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या नोंदणीकृत आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. वरील माहिती केवळ शैक्षणिक आणि विश्लेषणात्मक उद्देशाने दिली आहे.)
