गौरव मुठे
Long Straddle Option Strategy :
शेअर बाजारात कधी तेजीचे वारे वाहतात, तर कधी मंदीच्या भीतीने निर्देशांक गडगडतात. जागतिक घडामोडी, कंपन्यांचे निकाल, मध्यवर्ती बँकांचे व्याजदरविषयक निर्णय किंवा भू-राजकीय तणाव यांमुळे बाजारात मोठे चढ-उतार होऊ शकतात. अशावेळी बाजार वर जाणार की खाली, याचा अचूक अंदाज बांधणे अनेकदा कठीण असते. मात्र, बाजारात मोठी हालचाल होणार असल्याचा अंदाज असेल आणि तिची दिशा निश्चित सांगता येत नसेल, तर पर्यायांच्या व्यवहारांमधील ‘लाँग स्ट्रॅडल’ ही ऑप्शन्स स्ट्रॅटेजी अभ्यासता येऊ शकते.

या स्ट्रॅटेजीचे वैशिष्ट्य म्हणजे बाजारात तेजी आली किंवा मंदी आली, तरीही योग्य प्रमाणात मोठी हालचाल झाल्यास नफ्याची संधी निर्माण होऊ शकते. यासाठी एकाच वेळी कॉल आणि पुट ऑप्शन खरेदी केले जातात. मात्र, बाजारात चढ-उतार होत आहेत म्हणून प्रत्येकवेळी लाँग स्ट्रॅडल फायदेशीर ठरतेच असे नाही. अपेक्षित हालचाल झाली नाही, तर दोन्ही ऑप्शन खरेदी करण्यासाठी दिलेले अधिमूल्य (प्रीमियम) गमावण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे या रणनीतीची गणिते, नफा-तोट्याच्या मर्यादा आणि जोखीम समजून घेणे महत्त्वाचे आहे.

लाँग स्ट्रॅडल म्हणजे काय?

लाँग स्ट्रॅडल किंवा ‘बाय स्ट्रॅडल’ ही ऑप्शन्समधील अशी स्ट्रॅटेजी आहे, ज्यामध्ये एकाच शेअरचा किंवा निर्देशांकाचा समान स्ट्राइक प्राइस आणि समान मुदतपूर्ती असलेला एक कॉल ऑप्शन आणि एक पुट ऑप्शन खरेदी केला जातो. शक्यतो सध्याच्या बाजारभावाच्या जवळचा म्हणजेच ‘अॅट द मनी’ (एटीएम) स्ट्राइक प्राइस निवडला जातो.

कॉल ऑप्शन खरेदी केल्यामुळे संबंधित शेअर किंवा निर्देशांकाची किंमत वाढल्यास फायदा होण्याची शक्यता असते. दुसरीकडे, पुट ऑप्शन खरेदी केल्यामुळे किंमत घसरल्यास फायदा होऊ शकतो. त्यामुळे या रणनीतीत बाजाराची दिशा अचूक ओळखण्यापेक्षा मुदतपूर्तीपर्यंत किंमतीत पुरेशी मोठी हालचाल होईल का, याचा अंदाज महत्त्वाचा असतो.

उदाहरणातून समजून घेऊया रणनीती

समजा, एशियन पेंट्सच्या शेअरमध्ये पुढील काही काळात मोठी हालचाल होण्याची शक्यता आहे. मात्र, शेअरचा भाव वाढेल की घसरेल, याबाबत निश्चित अंदाज नाही. अशा वेळी लाँग स्ट्रॅडलचा विचार करता येऊ शकतो.
या उदाहरणासाठी पुढील गृहीतके धरूया.

  • सध्याचा बाजारभाव : ४४५
  • निवडलेला स्ट्राइक प्राइस : ४५०
  • कॉल ऑप्शनचे अधिमूल्य : १२ रुपये प्रति शेअर
  • पुट ऑप्शनचे अधिमूल्य : ८ रुपये प्रति शेअर
  • गृहीत लॉटचे आकारमान : ५०० शेअर
  • एकूण गुंतवणूक (अधिमूल्य) : १०,०००
  • वरील आकडे केवळ उदाहरणासाठी आहेत. प्रत्यक्ष व्यवहारापूर्वी संबंधित शेअरचा उपलब्ध लॉट आकार, स्ट्राइक प्राइस आणि ऑप्शनचे बाजारातील अधिमूल्य तपासणे आवश्यक आहे.

या स्ट्रॅटेजीमध्ये दोन व्यवहार करावे लागतात.

१. कॉल ऑप्शनची खरेदी : एशियन पेंट्सचा ४५० स्ट्राइक प्राइस असलेला एक कॉल ऑप्शन १२ प्रति शेअर अधिमूल्य देऊन खरेदी केला. लॉट आकार ५०० शेअर गृहीत धरल्यास त्यासाठी १२ × ५०० = ६,००० खर्च येईल.
२. पुट ऑप्शनची खरेदी : त्याच मुदतपूर्तीचा आणि ४५० स्ट्राइक प्राइस असलेला एक पुट ऑप्शन ८ प्रति शेअर अधिमूल्य देऊन खरेदी केला. त्यासाठी ८ × ५०० = ४,००० खर्च येईल. अशा प्रकारे दोन्ही ऑप्शन खरेदी करण्यासाठी एकूण १०,००० अधिमूल्य द्यावे लागेल. हाच या व्यवहारातील कमाल संभाव्य तोटा असेल, असे मुदतपूर्तीच्या दिवशीचे गणित गृहीत धरते. प्रत्यक्ष व्यवहारातील शुल्क आणि कर यांचा यात समावेश नाही.

शेअरचा भाव बदलल्यास नफा-तोटा किती?

मुदतपूर्तीच्या दिवशी एशियन पेंट्सच्या शेअरचा भाव वेगवेगळ्या पातळ्यांवर राहिल्यास या रणनीतीत काय परिणाम होईल, ते पाहूया.
एशियन पेन्ट्सच्या शेअरची किंमत ४५० रुपयांचा पुट ऑप्शन खरेदी (लाँग पुट) ४५० रुपयांचा कॉल ऑप्शन खरेदी (लाँग कॉल) नफा-नुकसान
४१० १६,००० -६,००० १०,००० नफा
४२० १७,००० -६,००० ५,००० नफा
४३० ६,००० -६,००० ० — ना नफा, ना तोटा
४४० १,००० -६,००० -५,०००
४४२ ० -६,००० -६,०००
४५० -४,००० -६,००० -१०,००० नुकसान
४६० -४,००० -१,००० -५,०००
४६२ -४,००० ० -४,०००
४७० -४,००० ४,००० ० — ना नफा, ना तोटा
४८० -४,००० ९,००० ५,००० नफा
४९० -४,००० १४,००० १०,००० नफा

एशियन पेन्ट्सच्या शेअरची किंमत४५० रुपयांचा पुट ऑप्शन खरेदी (लाँग पुट)४५० रुपयांचा कॉल ऑप्शन खरेदी (लाँग कॉल)नफा-नुकसान
४१०१६,०००-६,०००१०,००० नफा
४२०१७,०००-६,०००५,००० नफा
४३०६,०००-६,०००० — ना नफा, ना तोटा
४४०१,०००-६,०००-५,०००
४४२०-६,०००-६,०००
४५०-४,०००-६,०००-१०,००० नुकसान
४६०-४,०००-१,०००-५,०००
४६२-४,००००-४,०००
४७०-४,०००४,०००० — ना नफा, ना तोटा
४८०-४,०००९,०००५,००० नफा
४९०-४,०००१४,०००१०,००० नफा

तीन शक्यतांमधून समजून घेऊया

१. शेअरचा भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यास

समजा, मुदतपूर्तीच्या दिवशी एशियन पेंट्सचा भाव ४८० झाला. आपण ४५० स्ट्राइक प्राइसचा कॉल ऑप्शन खरेदी केल्यामुळे प्रति शेअर ३० इतका नफा मिळेल.

  • कॉलमधील अंतर्गत फायदा : (४८० − ४५०) × ५०० = १५,०००
  • कॉलसाठी दिलेले अधिमूल्य : ६,०००
  • पुटसाठी दिलेले अधिमूल्य : ४,०००
  • एकूण निव्वळ नफा : १५,००० − ६,००० − ४,००० = ५,०००
    शेअरचा भाव ४९० झाल्यास निव्वळ नफा १०,००० होईल. भाव जितका अधिक वाढेल, तितका कॉलमधील फायदा वाढण्याची शक्यता असते. मात्र, प्रत्यक्ष नफा व्यवहारातील शुल्क आणि करांमुळे काही प्रमाणात कमी होऊ शकतो.

२. शेअरचा भाव मोठ्या प्रमाणात घसरल्यास

समजा, मुदतपूर्तीच्या दिवशी एशियन पेंट्सचा भाव ४२० झाला. अशा वेळी कॉल ऑप्शनचे मूल्य संपुष्टात येईल; मात्र पुट ऑप्शनमधून फायदा मिळेल.

  • पुटमधील अंतर्गत फायदा : (४५० − ४२०) × ५०० = १५,०००
  • पुटसाठी दिलेले अधिमूल्य : ४,०००
  • कॉलसाठी दिलेले अधिमूल्य : ६,०००
  • एकूण निव्वळ नफा : १५,००० − ४,००० − ६००० = ५,०००
    भाव ४१० पर्यंत घसरल्यास निव्वळ नफा १०,००० होईल. म्हणजेच, बाजारात मोठी घसरण झाली तरी पुट ऑप्शनमुळे नफ्याची संधी निर्माण होऊ शकते.

३. शेअरचा भाव फारसा बदलला नाही तर

लॉँग स्ट्रॅडलमधील सर्वांत महत्त्वाची जोखीम या परिस्थितीत दिसते. समजा, मुदतपूर्तीच्या दिवशी शेअरचा भाव ४५० वरच राहिला. अशा वेळी कॉल आणि पुट या दोन्ही ऑप्शनचे अंतर्गत मूल्य शून्य असेल. त्यामुळे कॉलसाठी दिलेले ६,००० आणि पुटसाठी दिलेले ४,००० असे एकूण १०,००० अधिमूल्य गमवावे लागू शकते. हा या उदाहरणातील कमाल संभाव्य तोटा आहे.
शेअरचा भाव ४३० ते ४७० या दोन बिंदूंच्या दरम्यान राहिल्यास, मुदतपूर्तीच्या दिवशी व्यवहारात तोटा होईल. नेमके ४३० किंवा ४७० या भावांवर, शुल्क आणि कर वगळता, ना नफा ना तोटा अशी स्थिती येईल.

सारांश

  • लाँग स्ट्रॅडल ही बाजाराची दिशा निश्चित सांगता येत नसली, तरी मोठी हालचाल होण्याची शक्यता वाटत असताना वापरता येणारी ऑप्शन्स रणनीती आहे. मात्र, अस्थिरता वाढली आहे म्हणून लगेच हा व्यवहार करणे योग्य ठरेलच असे नाही. संभाव्य हालचालीची व्याप्ती, ऑप्शनचे अधिमूल्य आणि मुदतपूर्तीपर्यंत शिल्लक असलेला कालावधी यांचा एकत्रित विचार करणे आवश्यक आहे.
  • थोडक्यात, लाँग स्ट्रॅडलमध्ये तेजी किंवा मंदी यापैकी कोणती दिशा निवडण्याची गरज नसली, तरी मोठ्या हालचालीचा अंदाज अचूक असणे महत्त्वाचे आहे. अपेक्षित हालचाल झाली नाही, तर दोन्ही ऑप्शन खरेदी करण्यासाठी दिलेले संपूर्ण अधिमूल्य गमावण्याची जोखीम असते. त्यामुळे ही रणनीती समजून घेऊन, जोखीम पेलण्याची क्षमता तपासूनच व्यवहार करावा.