LTCG Tax Cut : शेअर बाजारातील करव्यवस्थेत सुसूत्रता आणण्यासाठी दीर्घकालीन भांडवली नफा करात (एलटीसीजी) सर्व गुंतवणूकदारांसाठी कपात, परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांसाठी (एफपीआय) स्वतंत्र करदर किंवा डॉलरच्या आधारे भांडवली नफ्याची गणना करण्यासारख्या पर्यायांचा सरकार विचार करू शकते, असा अंदाज गुंतवणूक बँकिंग क्षेत्रातील जेफरीज या संस्थेने व्यक्त केला आहे. तसेच अधिक परकीय भांडवल आकर्षित करण्यासाठी, उद्योग संघटना ‘पीएचडीसीसीआय’ने प्राप्तिकर विभागाला पत्र लिहून दीर्घकालीन भांडवली नफा कर (एलटीसीजी) पूर्णपणे रद्द करण्याची आणि समभागांवरील अल्पकालीन भांडवली नफा कर (एसटीसीजी) व भांडवली रोखे कर अर्थात एसटीटी दरांचे सुलभीकरण करण्याची शिफारस केली आहे.
उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमधील अनेक देशांत परकीय गुंतवणूकदारांना समभागांवरील दीर्घकालीन भांडवली नफ्यावर करसवलत दिली जाते. त्यामुळे भारतातही एफपीआयंसाठी स्वतंत्र करव्यवस्था लागू करण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे जेफरीजने आपल्या भारतीय शेअर बाजारविषयक धोरणात्मक अहवालात म्हटले आहे.
दीर्घकालीन भांडवली नफा कर पूर्णपणे रद्द करण्याची शिफारस करतानाच, या संघटनेने ‘दीर्घकालीन गुंतवणूक’ मानण्यासाठी आवश्यक असलेला कालावधी १२ महिन्यांवरून वाढवून १८ ते २४ महिने करण्याचा प्रस्तावही मांडला आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडे (सीबीडीटी) सादर केलेल्या या शिफारशीनुसार, असे केल्यास केवळ खऱ्या गुंतवणूकदारांनाच कर सवलतीचा लाभ मिळेल. शेअर बाजारातील गुंतवणुकीवर एसटीटी आणि भांडवली नफा कर अशा दोन्ही करांमुळे ‘दुहेरी कर आकारणी होत असल्याचे नमूद करत, पीएचडीसीसीआयने म्हटले आहे की, करांच्या रचनेत सुधारणा केल्यास ही समस्या कमी होण्यास मदत होईल.
उद्योग संघटनेने अल्पकालीन भांडवली नफा कराचा दर २० टक्क्यांवरून १० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा किंवा एसटीटी दर कमी करण्याचा पर्याय सुचवला आहे. करांच्या दरांचे सुलभीकरण (इतर उपाययोजनांसह) केल्यास भारतात परकीय भांडवल टिकवून ठेवण्यास, भांडवलाचा ओघ बाहेर जाण्यापासून रोखण्यास आणि नवीन गुंतवणूक आकर्षित करण्यास मदत होईल.
सध्या, सूचिबद्ध कंपन्यांचे समभाग किंवा इक्विटी म्युच्युअल फंड्समधून मिळणाऱ्या दीर्घकालीन भांडवली नफ्यावर, जर नफा १.२५ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर १२.५ टक्के कर, अधिक अधिभार आणि उपकर आकारला जातो. तसेच, अशा गुंतवणुकीला ‘दीर्घकालीन भांडवली मालमत्ता’ मानण्यासाठी ती खरेदी केल्याच्या तारखेपासून किमान १२ महिने स्वतःकडे ठेवणे आवश्यक असते. मात्र, जर अशी मालमत्ता खरेदी केल्यापासून १२ महिन्यांच्या आत विकली गेली, तर त्यावर मिळणाऱ्या अल्पकालीन भांडवली नफ्यावर २० टक्के कर आकारला जातो.
एकाच आर्थिक व्यवहारावर अनेक प्रकारचे कर आकारल्यामुळे गुंतवणूक आणि संपत्ती निर्मितीला खीळ बसू शकते. अधिक संतुलित कर प्रणाली गुंतवणुकीला प्रोत्साहन देऊ शकते, कुटुंबांची संपत्ती आणि खर्च करण्याची क्षमता वाढवू शकते, आर्थिक हालचालींना चालना देऊ शकते आणि जीएसटी व इतर अप्रत्यक्ष करांच्या माध्यमातून अतिरिक्त महसूल मिळवून देऊ शकते.
३.०८ लाख कोटी माघारी
जेफरीजच्या आकडेवारीनुसार, २०२४-२५ या आर्थिक वर्षात समभागांवरील दीर्घकालीन भांडवली नफा करातून सरकारला १.३ लाख कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. चालू आर्थिक वर्षात सरकारने एसटीटीद्वारे ७३,७०० कोटी रुपये गोळा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, जे मागील आर्थिक वर्षातील ५७,५२२ कोटी रुपयांच्या वसुलीपेक्षा अधिक आहे. चालू आर्थिक वर्षात १ एप्रिल ते १४ ऑक्टोबर दरम्यान, एसटीटीद्वारे मिळणारा महसूल सुमारे ५२ टक्क्यांनी वाढून ४६,८४० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी भारतीय इक्विटी बाजारातून विक्रमी ३.०८ लाख कोटी रुपयांचा (३२.७३ अब्ज अमेरिकन डॉलर्स) निधी माघारी नेला आहे. ही रक्कम संपूर्ण २०२५ या कॅलेंडर वर्षात काढून घेतलेल्या १.६६ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे.
पीएचडीसीसीआयच्या मते, या कर दरांचे सुलभीकरण किंवा तर्कसंगतीकरण केल्यास भारताचे गुंतवणुकीसाठीचे आकर्षण वाढू शकते. विविध उद्योग संघटना सध्या इक्विटी बाजार कररचनेबाबत शिफारसी अर्थ मंत्रालयाकडे पाठवण्याच्या प्रक्रियेत आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या महिन्याच्या सुरुवातीला सांगितले होते की, गुंतवणूकदारांकडून अनेक मते येत आहेत आणि दीर्घकालीन भांडवली नफा कर तसेच एसटीटीवर चर्चा सुरू आहे.
जेफरीजचे करकपातीचे तीन पर्याय
- सर्व गुंतवणूकदारांसाठी दीर्घकालीन आणि अल्पकालीन भांडवली नफा कराचे दर कमी करणे
- केवळ एफपीआयसाठी दीर्घकालीन भांडवली नफा कराचा दर कमी करणे
- एफपीआयच्या नफ्याची गणना डॉलरच्या आधारे करणे
अन्य देशांतील करव्यवस्था
तैवान, अमेरिका, इंडोनेशिया आणि हाँगकाँग यांसारख्या बाजारपेठांमध्ये परकीय गुंतवणूकदारांना समभागांवरील दीर्घकालीन भांडवली नफ्यावर करसवलत आहे. ब्राझीलमध्येही कमी कर आकारणी असलेल्या देशांमधून होणाऱ्या गुंतवणुकीचा अपवाद वगळता अशी सूट उपलब्ध आहे. जपानमध्ये जमीन-मालमत्ता मोठ्या प्रमाणात असलेल्या कंपन्यांमधील किंवा लक्षणीय मालकीहक्काच्या काही गुंतवणुकींचे अपवाद वगळता परकीय गुंतवणूकदारांना दीर्घकालीन भांडवली नफा करातून सूट आहे.
दक्षिण कोरियामध्ये विक्री मूल्याच्या ११ टक्के किंवा निव्वळ नफ्याच्या २२ टक्के दराने कर आकारला जातो. चीनमध्ये काही समभागांवरील नफा करमुक्त आहे, तर इतर काही गुंतवणुकींवर १० टक्के कर आकारला जातो.
