मुंबई : अग्रगण्य बिगर-बँकिंग वित्तीय कंपनी (एनबीएफसी) असलेल्या मनप्पुरम फायनान्स लिमिटेडने मार्च अखेर सरलेल्या तिमाहीचे (Q4 FY26) आर्थिक निकाल जाहीर केले आहे. या आघाडीच्या एनबीएफसीने एकत्रित कर-पश्चात नफ्यामध्ये २९९ टक्क्यांची दमदार वार्षिक वाढ नोंदवली आहे. तर चौथ्या तिमाहीत, कंपनीच्या व्यवस्थापनाधीन मालमत्तेमध्ये (एयूएम) २२.४ टक्के वाढ होऊन ती ६३,७९८ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

चौथ्या तिमाहीत, कंपनीच्या सुवर्ण कर्जांतर्गत व्यवस्थापित मालमत्तेचे (एज्युएम) मूल्य ५०,९५३ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. यामध्ये वार्षिक आधारावर ९९.१ टक्के वाढ नोंदवली गेली. संपूर्ण आर्थिक वर्षासाठी कंपनीची एकूण एयूएम ६३,७९८ कोटी रुपये इतकी होती, जी आर्थिक वर्ष २०२५ मध्ये नोंदवल्या गेलेल्या ४३,०३४ कोटी रुपयांच्या तुलनेत ४८.३ टक्क्यांची वाढ दर्शवते. एकूण एयूएममध्ये सुवर्ण कर्जे वगळता इतर व्यवसायांचा वाटा २०.१ टक्के इतका होता. ‘आशीर्वाद मायक्रोफायनान्स’ व्यवसायाने या तिमाहीत १३ कोटी रुपयांचा नफा नोंदवला.

एनबीएफसीच्या कामकाजातून मिळणाऱ्या उत्पन्नात १०.७ टक्के (वार्षिक आधारावर) वाढ होऊन ते २,६१४ कोटी रुपयांवर पोहोचले; तर मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत हे उत्पन्न २,३६१ कोटी रुपये होते. कर-पश्चात नफा (पॅट) (ओसीआय आणि अल्पसंख्याक भागधारकांच्या आधी) ४०५ कोटी रुपये राहिला; याउलट मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत २०३ कोटी रुपयांचा तोटा नोंदवला गेला होता. चौथ्या तिमाहीत शाखांची संख्या वाढून ५,३४० झाली, तर कर्मचाऱ्यांची संख्या ४२,१०० इतकी होती.

“आर्थिक वर्ष २०२६ च्या चौथ्या तिमाहीत, विविध देशांतर्गत तसेच बाह्य आव्हानांना तोंड देत कंपनीने चांगली कामगिरी केली आहे. या तिमाही सोन्याच्या वाढलेल्या किमती, भू-राजकीय तणाव, पुरवठा साखळीतील व्यत्यय, मंदावलेली आर्थिक वाढ आणि अस्थिर शेअर बाजार यांसारख्या घटकांनी गाजली. असे असूनही, कंपनीने या कालावधीत उल्लेखनीय वाढ नोंदवली आहे, जी व्यवस्थापनाखालील मालमत्तेच्या वाढीमध्ये स्पष्टपणे दिसून येते. गोल्ड लोनच्या मुख्य व्यवसायात चांगली वाढ झाली, ज्याला प्रामुख्याने वाढती कर्जाची मागणी आणि सोन्याच्या वाढलेल्या किमतींचा आधार मिळाला. मालमत्तेच्या गुणवत्तेतही लक्षणीय सुधारणा झाली असून, एनपीए गुणोत्तरात मोठी घट दिसून येत आहे ”, असे मनप्पुरम फायनान्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, व्ही. पी. नंदकुमार म्हणाले.