Meesho Co-Founder Vidit Atre Becomes Billionaire: मीशो या क्विक कॉमर्स कंपनीने शेअर बाजारातील आपल्या दमदार पदार्पणाने केवळ गुंतवणूकदारांनाच श्रीमंत केले नाही, तर कंपनीच्या सह-संस्थापकालाही अब्जाधीश बनवले आहे. आज शेअर बाजार उघडताच कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत मोठी वाढ झाली आणि त्यांनी ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला. यामुळे मीशो लिमिटेडचे सह-संस्थापक विदित आत्रे यांचा अब्जाधीशांच्या यादीत समावेश झाला आहे.

मंगळवारी मीशोच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी दिसून येत आहे. बातमी लिहिपर्यंत, मीशोच्या शेअर्समध्ये १३ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली असून तो इंट्राडे उच्चांक १९३.५० रुपयांवर पोहोचला आहे. काल बाजार बंद झाला तेव्हा मीशोचे शेअर्स १७०.७५ रुपयांवर व्यवहार करत होते. त्यानंतर आज उसळी घेत उच्चांक नोंदवला.

या शेअरने आता त्याच्या १११ रुपयांच्या इश्यू किमतीपासून जवळपास ७५ टक्के वाढ नोंदवली आहे. मीशोच्या आयपीओनेही बाजारात दमदार पदार्पण केले होते, जो इश्यू किमतीपेक्षा सुमारे ४६ टक्के प्रीमियमवर सूचीबद्ध झाला होता. तेव्हापासून गुंतवणूकदार यात रस दाखवत असल्याने त्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. शेअरच्या किमतीतील या वाढीमुळे मीशोचे सह-संस्थापक विदित आत्रे यांचा अब्जाधीशांच्या यादीत समावेश झाला आहे.

विदित आत्रेंकडील शेअर्सचे मूल्य सुमारे ९,१२८ कोटी रुपये

आत्रे यांच्याकडे कंपनीचे सुमारे ४७.२५ कोटी शेअर्स आहेत, जे ११.१ टक्की हिस्सेदारीच्या बरोबरीचे आहेत. दिवसाच्या उच्चांकी किमतीनुसार त्यांच्याकडील शेअर्सचे मूल्य सुमारे ९,१२८ कोटी रुपये (सुमारे १ अब्ज डॉलर्स) आहे. याचबरोबर, दुसरे सह-संस्थापक संजीव बर्णवाल यांच्याकडे सुमारे ३१.६ कोटी शेअर्स आहेत, ज्यांच्याकडील हिस्सेदारीचे मूल्य आता सुमारे ६,०९९ कोटी रुपये झाले आहे.

लिंस्टिंगपासून तेजी कायम

मीशोच्या आयपीओने त्याच्या दमदार लिस्टिंग नफ्यामुळे आधीच बाजाराचे लक्ष वेधून घेतले होते. कंपनीचे शेअर्स सुमारे ४६ टक्के जास्त प्रीमियमवर सूचीबद्ध झाले होते. त्यानंतरही यात तेजी कायम राहिली आहे. या ताज्या तेजीमुळे शेअरने वार्षिक उच्चांक गाठला आहे, ज्यामुळे आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्या किंवा लिस्टिंगनंतर शेअर्स खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांना चांगला फायदा झाला आहे.

मीशो कंपनीविषयी

विदित आत्रे आणि संजीव बर्नवाल यांनी २०१५ मध्ये स्थापन केलेली मीशो ही कंपनी भारतातील अग्रगण्य क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मपैकी एक बनली आहे. ही कंपनी वैयक्तिक आणि लहान व्यावसायिकांना सोशल मीडिया आणि मेसेजिंग प्लॅटफॉर्मद्वारे उत्पादने विकण्याची सुविधा उपलब्ध करून देते.