Mukesh Ambani net worth Loss 2026: भारतातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) साठी हा आठवडा अत्यंत निर्णायक ठरणार आहे. कंपनी आपल्या चौथ्या तिमाहीचे (Q4) आर्थिक निकाल जाहीर करण्याच्या तयारीत असतानाच, त्यांचे शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकावरून १५ टक्क्यांनी घसरले आहेत.
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अंबानींची घसरण
विक्रीच्या या तीव्र लाटेमुळे कंपनीच्या बाजार भांडवलातून ३.३७ लाख कोटी रुपयांची घट झाली असून, अब्जाधीश मुकेश अंबानी यांना ‘आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती’ हा मानही गमवावा लागला आहे. दरम्यान, बाजारातील ही घसरण रोखण्यासाठी एखाद्या सकारात्मक संकेताची सध्या प्रतीक्षा केली जात आहे.
गौतम अदाणींनी कशी घेतली आघाडी?
भारतातील सर्वात मोठ्या सूचीबद्ध कंपनीचे शेअर्स, ५ जानेवारी २०२६ रोजी गाठलेल्या १,६११ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकावरून १५ टक्के घसरले आहेत. त्यामुळे कंपनीचे बाजार भांडवल १८.४ लाख कोटी रुपयांवर आले आहे. ‘ब्लूमबर्ग बिलिनियर्स इंडेक्स’मध्येही हीच परिस्थिती आहे. शेअर्समधील घसरणीमुळे मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती घसरून ९१ अब्ज डॉलर्सवर आली असून, २०२६ मध्ये १६.७ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाल्यामुळे ते आता गौतम अदानी यांच्या ९५.४ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीच्या मागे पडले आहेत.
शुक्रवारी चौथ्या तिमाहीचे निकाल
शुक्रवारी (२४ एप्रिल २०२६) बाजार बंद झाल्यानंतर कंपनी आपली त्रैमासिक कमाई जाहीर करणार असून, लाभांशाची (डिव्हिडंडची) शिफारस करणार असल्याने बाजाराचे लक्ष आता कंपनीचा नफा आणि अंबानींच्या महत्त्वाकांक्षी कॉर्पोरेट वाटचालीबाबत अधिक स्पष्टता मिळण्याकडे लागले आहे.
रिलायन्सच्या शेअर्समध्ये का होत आहे विक्री?
विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (FIIs) झालेली सातत्यपूर्ण विक्री हे रिलायन्सच्या शेअर्सच्या घसरणीचे मुख्य कारण असल्याचे जेएम फायनान्शिएलने नमूद केले आहे. रिलायन्समध्ये विदेशी गुंतवणूकदारांची हिस्सेदारी मार्च २०२१ मधील २८.३% च्या उच्चांकावरून मोठ्या प्रमाणात घसरून, मार्च २०२६ मध्ये १८.६७% पर्यंत खाली आली आहे.
विश्लेषक काय म्हणाले?
जेपी मॉर्गनचे संजय मुकीम यांच्या मते, बाजारपेठ O2C परिस्थितीचे चुकीचे मूल्यांकन करत आहे. “नजीकच्या काळातील O2C मार्जिनशी संबंधित अनिश्चिततेमुळे रिलायन्सच्या शेअर्समध्ये अलीकडे घसरण झाली आहे”, असे त्यांनी सांगितले, पण त्यांनी पुढे म्हटले की, “पुरवठा साखळी सामान्य झाली तरी, रिलायन्सचे रिफायनिंग आणि पेट्रोकेमिकल मार्जिन पूर्वीच्या अंदाजापेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.”
