Share Market Investors Loss: सोमवार, १८ मे रोजीच्या व्यवहारात, जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात सर्वच क्षेत्रांमध्ये जोरदार विक्री झाल्याचे दिसून आले. यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी ५० या प्रमुख निर्देशांकांमध्ये प्रत्येकी १ टक्क्यांहून अधिक घसरण झाली.

कच्च्या तेलाच्या किमतींनी जागतिक स्तरावर ११० डॉलर्सचा टप्पा ओलांडल्यामुळे, सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी ५० आणि बीएसई सेन्सेक्स या प्रमुख निर्देशांकांमध्ये मध्ये मोठी घसरण झाली. सकाळी ९:१५ वाजता, निफ्टी ५० निर्देशांक २३,३९६.४५ अंशांवर व्यवहार करत होता. यात २४७ अंशांची म्हणजेच १.०४ टक्क्यांची घट झाली होती. तर बीएसई सेन्सेक्स ७४,४३०.३५ अंशांवर होता. यात ८०८ अंशांची म्हणजेच १.०७ टक्क्यांची घसरण नोंदवली गेली.

शेअर बाजारातील तीव्र घसरणीमुळे, बीएसई वर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल मागील सत्रातील सुमारे ४६१ लाख कोटी रुपयांवरून खाली येत ४५४ लाख कोटी रुपयांच्याही खाली घसरले. यामुळे गुंतवणूकदारांचे ७ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.

दुपारी १२:०० वाजता, सेन्सेक्स ३११.५९ अंशांच्या किंवा ०.४१ टक्क्यांच्या घसरणीसह ७४,९२६.४० वर व्यवहार करत होता, तर निफ्टी १०९.७० अंशांच्या किंवा ०.४६ टक्क्यांच्या घसरणीसह २३,५३३.८० वर व्यवहार करत होता. पण, बाजाराची व्याप्ती कमकुवतच आहे. यामध्ये ८५७ शेअर्समध्ये वाढ झाली, तर २,९०१ शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

…नाहीतर त्यांचे काहीही शिल्लक राहणार नाही

रविवारी संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) बरका अणुऊर्जा प्रकल्पावर झालेल्या ड्रोन हल्ल्यामुळे मध्य पूर्वेतील धुमसत असलेल्या तणावात आणखी भर पडली, ज्यामुळे जागतिक स्तरावर गुंतवणूकदारांच्या भावनांना फटका बसला. अनेक प्रयत्नांनंतरही दोन्ही बाजू आपला संघर्ष मिटवू शकलेल्या नाहीत, त्यामुळे अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधी आधीच अनिश्चिततेच्या गर्तेत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला तातडीने कारवाई करण्याचा किंवा परिणामांना सामोरे जाण्यास तयार राहण्याचा नवा इशारा दिला आहे. “इराणसाठी वेळ निघून जात आहे, आणि त्यांनी लवकरात लवकर हालचाल केली पाहिजे, नाहीतर त्यांचे काहीही शिल्लक राहणार नाही. वेळ अत्यंत महत्त्वाची आहे,” असे ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर लिहिले.

कच्च्या तेलाच्या किमती उसळल्या

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा बेंचमार्क असलेल्या ब्रेंट क्रूडच्या किमतीत २% वाढ होऊन ती प्रति बॅरल १११ डॉलरच्या पातळीवर पोहोचली, ज्यामुळे महागाईची भीती वाढली आहे. संयुक्त अरब अमिरातीमधील (UAE) अणुऊर्जा प्रकल्पाजवळ झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर मध्य-पूर्वेत नवीन संघर्षाच्या वाढत्या भीतीमुळे तेलाच्या किमती वाढल्या.

तेलाच्या वाढलेल्या किमती भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक मोठा नकारात्मक घटक आहेत, कारण त्यामुळे देशाची व्यापार तूट वाढते, रुपया कमकुवत होतो, महागाई वाढते, सरकारी तिजोरीवर ताण येतो आणि कंपन्यांच्या नफ्यात घट होते.