National Stock Exchange NSE Working : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी. या आर्थिक राजधानीच्या अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी असलेल्या संस्थांपैकी एक म्हणजे नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई). रोज लाखो व्यवहारांची नोंद, हजारो कंपन्यांचे समभाग व्यवहार, देशाच्या कानाकोपऱ्यातील गुंतवणूकदारांचा सहभाग आणि क्षणार्धात होणारी समभागांची खरेदी-विक्री. या सगळ्यामागे नेमकी यंत्रणा कशी काम करते? एनएसईच्या इमारतीत प्रत्यक्ष जाऊन पाहिल्यास या आधुनिक शेअर बाजाराचे स्वरूप उलगडते.

आज मोबाईलवरून काही सेकंदांत शेअर खरेदी किंवा विक्री करण्याची सुविधा सहज उपलब्ध आहे. मात्र, ही सुविधा नेहमीच अशी नव्हती. एनएसईच्या स्थापनेपूर्वी शेअर बाजारातील व्यवहारांची पद्धत पूर्णपणे वेगळी होती. दलाल प्रत्यक्ष एक्स्चेंजमध्ये जाऊन खरेदी-विक्रीच्या ऑर्डर देत आणि व्यवहार पूर्ण होण्यासाठी दिवसच नव्हे तर अनेकदा आठवडे लागत. एनएसईने या व्यवस्थेत मोठा बदल घडवून आणला. पारदर्शकता, तंत्रज्ञान आणि देशाच्या कानाकोपऱ्यातील गुंतवणूकदारांपर्यंत पोहोच या तीन बाबींवर आधारित आधुनिक शेअर बाजाराची पायाभरणी करण्यात आली.

कागदाच्या चिठ्ठ्यांपासून इलेक्ट्रॉनिक व्यवहारांपर्यंत

एकेकाळी शेअर बाजारात व्यवहार प्रत्यक्ष पद्धतीने होत. दलाल खरेदीदार आणि विक्रेत्यांच्या ऑर्डर घेऊन त्या एक्स्चेंजमध्ये मांडत. व्यवहार पूर्ण झाल्यानंतर त्याची प्रक्रिया आणि सेटलमेंट होण्यासाठी मोठा कालावधी लागत असे.

एनएसईच्या स्थापनेनंतर इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंगला चालना मिळाली. खरेदीदार आणि विक्रेत्यांच्या ऑर्डर संगणकीय प्रणालीद्वारे जुळवल्या जाऊ लागल्या. आज ही संपूर्ण प्रक्रिया इलेक्ट्रॉनिक आहे. एखाद्या समभागाची खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदाराने आपल्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर ऑर्डर दिल्यानंतर ती ऑर्डर एनएसईच्या प्रणालीपर्यंत पोहोचते आणि उपलब्ध विक्री ऑर्डरशी तिची जुळवणी झाल्यास व्यवहार पूर्ण होतो. म्हणजेच, गुंतवणूकदाराच्या मोबाईलवरील एका क्लिकमागे अत्यंत वेगवान इलेक्ट्रॉनिक यंत्रणा कार्यरत असते.

‘एनएसई’ची संकल्पना कशी आकाराला आली?

एनएसईच्या निर्मितीमागे डॉक्टर आर. एच. पाटील यांचे महत्त्वाचे योगदान होते. १९९०च्या दशकाच्या सुरुवातीला भारत आर्थिक सुधारणांच्या दिशेने वाटचाल करत असताना भांडवली बाजारातही मोठ्या बदलांची गरज निर्माण झाली होती. त्या काळात शेअर बाजाराबाबत सर्वसामान्य गुंतवणूकदारांमध्ये विश्वासाचा अभाव होता. व्यवहाराची पारदर्शकता आणि देशभरातील गुंतवणूकदारांपर्यंत पोहोच यांचा अभाव होता. या पार्श्वभूमीवर देशभरातील दलालांना एका इलेक्ट्रॉनिक नेटवर्कद्वारे जोडून कुठूनही व्यवहार करता येईल अशी व्यवस्था उभारण्याची कल्पना पुढे आली. विशेष म्हणजे त्या काळात आजच्यासारखे इंटरनेट, स्मार्टफोन किंवा ऑनलाइन ट्रेडिंग अस्तित्वात नव्हते. तरीही देशभरातील दलालांना एका नेटवर्कखाली आणण्याची आणि गुंतवणूकदाराला समभागाचा भाव पारदर्शकपणे उपलब्ध करून देण्याची यंत्रणा उभारण्यात आली. या प्रक्रियेत पुढे एनएसईचे सध्याचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष कुमार चव्हाण यांचाही तंत्रज्ञानाच्या दृष्टीने महत्त्वाचा सहभाग राहिला.

‘निफ्टी ५०’ म्हणजे नेमके काय?

एनएसईचा उल्लेख झाला की ‘निफ्टी ५०’ हा शब्द अपरिहार्यपणे समोर येतो. निफ्टी ५० हा एनएसईचा प्रमुख निर्देशांक आहे. त्यामध्ये बाजारातील आघाडीच्या ५० कंपन्यांचा समावेश असतो. एनएसईच्या सुरुवातीच्या काळात या निर्देशांकाला ‘एनएसई ५०’ असे संबोधले जात होते. मात्र, हे नाव उच्चारायला तुलनेने कठीण असल्याने पुढे ‘निफ्टी’ हे नाव रूढ झाले. आज ‘निफ्टी ५०’ हा केवळ एका निर्देशांकाचे नाव राहिलेले नाही, तर भारतीय भांडवली बाजाराच्या स्थितीचे प्रतिनिधित्व करणारा महत्त्वाचा मापक बनला आहे.

दुर्गम भागातील गुंतवणूकदारही एनएसईशी जोडले

एनएसईच्या कामाचा परिणाम केवळ मुंबई किंवा मोठ्या शहरांपुरता मर्यादित राहिलेला नाही. डिजिटल तंत्रज्ञान आणि ऑनलाइन ट्रेडिंगमुळे देशातील दुर्गम भागातील गुंतवणूकदारही शेअर बाजाराशी जोडले गेले आहेत. महाराष्ट्रातील नंदुरबार, गडचिरोलीसारख्या तुलनेने दुर्गम जिल्ह्यांमध्येही मोठ्या संख्येने डीमॅट खाती असल्याचे मुलाखतीत नमूद करण्यात आले. विशेषतः करोना काळानंतर ऑनलाइन माध्यमातून डीमॅट खाती उघडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले. महाराष्ट्रातच आज दोन कोटींपेक्षा अधिक डीमॅट खाती असल्याचे मुलाखतीत सांगण्यात आले. यावरून शेअर बाजाराची पोहोच आता केवळ मोठ्या शहरांपुरती राहिलेली नसल्याचे दिसते.

व्यवहारांच्या वेगात आमूलाग्र बदल

पूर्वी शेअर विकल्यानंतर त्याचे प्रमाणपत्र, पैसे आणि सेटलमेंटची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी मोठा कालावधी लागत असे. एनएसईच्या इलेक्ट्रॉनिक प्रणालीमुळे हा कालावधी सातत्याने कमी झाला. ‘टी+३’पासून ‘टी+२’ आणि पुढे ‘टी+१’पर्यंत सेटलमेंटचा प्रवास झाला. त्यामुळे गुंतवणूकदारांना व्यवहाराचा अंतिम निपटारा पूर्वीपेक्षा कितीतरी वेगाने मिळू लागला आहे. आज शेअरचा भाव, खरेदी-विक्रीच्या ऑर्डर्स आणि बाजारातील परिस्थिती गुंतवणूकदाराला जवळपास थेट पाहता येते. त्यासाठी दलालाच्या कार्यालयात जाण्याचीही आवश्यकता नाही.

छोट्या कंपन्यांनाही भांडवल उभारणीची संधी

एनएसईची भूमिका केवळ मोठ्या कंपन्यांच्या समभागांच्या व्यवहारांपुरती मर्यादित नाही. उदयोन्मुख आणि छोट्या कंपन्यांसाठी ‘एनएसई इमर्ज’ सारख्या व्यासपीठामुळे भांडवली बाजारात प्रवेशाचा मार्ग उपलब्ध झाला आहे. एखाद्या छोट्या किंवा मध्यम आकाराच्या कंपनीला व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी भांडवलाची गरज असते. पारंपरिक पद्धतीने भांडवल उभारण्याच्या तुलनेत भांडवली बाजारातून निधी उभारण्याचा मार्ग या कंपन्यांसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. एनएसईच्या अशा व्यासपीठामुळे लहान आणि उदयोन्मुख कंपन्यांनाही बाजारात सूचीबद्ध होण्याची संधी मिळते.

प्रवेशद्वार सर्वांसाठी खुले

एनएसईच्या इमारतीतील बैल आणि त्याच्या शेजारी असलेल्या विविध व्यक्तींच्या आकृत्यांमागेही एक संदेश आहे. शेअर बाजार हा केवळ श्रीमंत किंवा विशिष्ट वर्गापुरता मर्यादित राहू नये, तर समाजातील विविध घटकांना त्यात सहभागी होता यावे, ही संकल्पना त्यातून मांडली जाते. एकेकाळी ‘शेअर बाजार हा आपल्यासाठी नाही’ अशी सर्वसामान्यांची भावना होती. मात्र, डीमॅट खाती, ऑनलाइन ट्रेडिंग आणि माहितीची उपलब्धता यामुळे ही मानसिकता बदलली आहे.

‘लिस्टिंग बेल’चा वेगळा अर्थ

एनएसईच्या परिसरातील ‘लिस्टिंग बेल’ ही आधुनिक इलेक्ट्रॉनिक शेअर बाजाराच्या काळातही जपलेली परंपरा आहे. एखाद्या कंपनीची एनएसईवर सूचीबद्धता झाल्यानंतर तिच्या प्रतिनिधींकडून ही घंटा वाजविली जाते. कंपनीसाठी हा केवळ औपचारिक क्षण नसतो. अनेक वर्षांच्या व्यवसायानंतर कंपनी भांडवली बाजारात प्रवेश करत असल्याचे ते प्रतीक असते. त्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही ही घंटा उद्योजकांसाठी महत्त्वाची भावनिक खूण ठरते.

माहिती आणि गुंतवणूकदार शिक्षणावरही भर

एनएसईचे काम केवळ व्यवहार घडवून आणणे एवढ्यापुरते मर्यादित नाही. गुंतवणूकदारांना बाजाराविषयी माहिती मिळावी यासाठी एनएसईच्या संकेतस्थळावर मोठ्या प्रमाणावर माहिती उपलब्ध करून दिली जाते. बाजारातील आकडेवारी, अहवाल आणि विविध शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना बाजार समजून घेण्याची संधी दिली जाते. एनएसई आणि ‘सेबी’च्या माध्यमातून गुंतवणूकदार शिक्षणासाठी विविध अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत.

एका क्लिकमागे उभी असलेली मोठी यंत्रणा

आज गुंतवणूकदार मोबाईलवरून एखाद्या कंपनीचा समभाग खरेदी करतो. काही क्षणांत व्यवहार पूर्ण झाल्याचे त्याला दिसते. त्यामुळे ही प्रक्रिया अत्यंत साधी वाटते. मात्र, त्या एका क्लिकमागे एक्स्चेंजची इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग प्रणाली, ऑर्डर मॅचिंग, बाजारातील माहितीचे प्रसारण आणि व्यवहाराच्या सेटलमेंटची मोठी यंत्रणा कार्यरत असते. कागदावरील ऑर्डरपासून इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंगपर्यंत, दलालांच्या कार्यालयापासून मोबाईलच्या स्क्रीनपर्यंत आणि मोजक्या गुंतवणूकदारांपासून देशभरातील कोट्यवधी डीमॅट खात्यांपर्यंतचा हा प्रवास म्हणजे एनएसईच्या तीन दशकांच्या वाटचालीचे चित्र आहे.