NCC Limited Share Price : गेल्या दोन वर्षातील शेअर बाजारातील स्थिती पाहिली तर अनेक दिग्गज कंपन्यांचे शेअर्स भुईसपाट झाले आहेत. लार्ज कॅप आणि मिड कॅपमधील अनेक कंपन्यांनी गुंतवणूकदारांना निराशी केलं. अशा परिस्थितीत ‘छोटा पॅक बडा धमाका’ करत एका स्मालकॅप समभागाने गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिलाय. आम्ही कन्स्ट्रक्शन क्षेत्रातील स्मॉलकॅप कंपनी ‘एनसीसी लिमिटेड’बाबत बोलतोय. कंपनीच्या शेअरमध्ये आज ६ टक्क्यांहून अधिक जोरदार तेजी पाहायला मिळाली. दिग्गज गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांची या कंपनीत मोठी हिस्सेदारी आहे.

तेलंगणातून मिळाले १,२८६ कोटींचे कंत्राट

या तेजीमागे ‘एनसीसी लिमिटेड’ला मिळालेली मोठी ऑर्डर आहे. कंपनीला हैदराबाद ग्रोथ कॉरिडोर लिमिटेडकडून तेलंगणात रस्ते बांधणीच्या एका मोठ्या प्रकल्पासाठी ‘लेटर ऑफ इंटेंट’ मिळाले आहे. या प्रकल्पाचे एकूण मूल्य १,२८६.०३ कोटी रुपये इतके आहे. या प्रकल्पांतर्गत तेलंगणात रेडियल रोड-२ चे बांधकाम केले जाणार आहे. हा नवीन रस्ता आउटर रिंग रोडजवळ असलेल्या बुडवेलपासून सुरू होऊन राष्ट्रीय महामार्ग १६७एन वरील नाचारमपर्यंत जाणार आहे. या भव्य प्रकल्पाचा पहिला टप्पा बुडवेल ते शाबाद परिसराचा भागाला जोडेल. कंपनीला हा संपूर्ण प्रकल्प १८ महिन्यांच्या आत पूर्ण करायचा आहे.

कमाईतही घसघशीत वाढ

केवळ नवीन ऑर्डरच नाही, तर कंपनीचे आर्थिक निकालही चांगले राहिले आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत एनसीसीचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर १२.६ टक्क्यांनी वाढून २१६.४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो मागील वर्षी याच तिमाहीत १९२.१४ कोटी रुपये होता. याशिवाय, कंपनीचा महसूल देखील १२.२ टक्क्यांनी झपाट्याने वाढून ५,१७९ कोटी रुपयांवरून ५,८१२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

दिग्गज गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांची मोठी गुंतवणूक

ट्रेंडलाइनच्या आकडेवारीनुसार, शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांची या कंपनीत मोठी गुंतवणूक आहे. जून २०२६ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, त्यांच्याकडे कंपनीची १०.६३ टक्के हिस्सेदारी आहे. त्यांच्याकडे कंपनीचे ६ कोटींहून अधिक शेअर्स आहेत.

शेअरची कामगिरी कशी आहे?

एनएसईवरील आकडेवारीनुसार, गेल्या एका महिन्यात हा शेअर जवळपास १५ टक्क्यांपर्यंत घसरला होता. तसेच यावर्षी आतापर्यंत स्टॉकमध्ये २३ टक्क्यांहून अधिक आणि गेल्या एका वर्षात ४१ टक्क्यांची घसरण नोंदवली गेली आहे. मात्र, दीर्घकालीन प्रवासात या शेअरने गुंतवणूकादारांना श्रीमंत केलंय. गेल्या ५ वर्षांत या स्टॉकने ४८ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.