NCDEX RainChennai Weather Derivatives : देशातील प्रमुख कृषी व वस्तू एक्स्चेंज असलेल्या ‘नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह्ज एक्स्चेंज लि.’ने (NCDEX) हवामानावर आधारित आणखी एका वेदर डेरिव्हेटिव्ह्जची घोषणा केली आहे. NCDEX ने आज रेनमुंबई’च्या धर्तीवर ‘रेनचेन्नई’ या चेन्नईतील पावसावर आधारित नवीन एक्सचेंज-ट्रेडेड वेदर डेरिव्हेटिव्ह्ज फ्युचर्स कॉन्ट्रॅक्टची अधिकृत घोषणा केली. देशातील अनिश्चित पावसाचे जोखीम व्यवस्थापन करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे.

आयआयटी बॉम्बेच्या तांत्रिक मदत

दक्षिण भारतात, विशेषतः चेन्नईमध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान पडणारा ईशान्य मान्सून (परतीचा पाऊस) अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. चेन्नईच्या एकूण वार्षिक पावसापैकी तब्बल ७० टक्के पाऊस याच काळात पडतो. या काळात अतिवृष्टी किंवा पावसाच्या तुटवड्यामुळे निर्माण होणारा मोठा आर्थिक धोका कमी करण्यासाठी हे ‘रेनचेन्नई’ फ्युचर्स डिझाइन करण्यात आले आहे. आयआयटी बॉम्बेच्या तांत्रिक सहयोगाने आणि भारतीय हवामान विभागाच्या अधिकृत आकडेवारीवर आधारित हे कॉन्ट्रॅक्ट तयार करण्यात आले आहे. हे पारदर्शक, मानक आणि कॅश-सेटल (रोखीने निपटारा होणारे) फ्युचर्स पद्धतीद्वारे काम करेल.

‘रेनचेन्नई’ – प्रमुख उत्पादन तपशील

घटक / निकषतपशील
कॉन्ट्रॅक्टचा प्रकारफ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट (Futures Contract)
टिकर सिम्बॉलRAINCHNNAI
अंडरलाइंग (आधारभूत)एलपीएपासून क्युम्युलेटिव्ह डेव्हिएशन रेनफॉल (CDR)
कॉन्ट्रॅक्ट महिनेसप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर
टिक साईझ व लॉट मल्टिप्लायर१ मिमी
कमाल ऑर्डर साईझ५० लॉट्स
किमान सुरुवातीची मार्जिन१० टक्के
डेटा स्रोतमीनमबाक्कम आणि नुंगमबाक्कम (IMD केंद्रे)
ट्रेडिंगची वेळसोमवार ते शुक्रवार: सकाळी १०:०० ते रात्री ११:५५
दैनिक किंमत मर्यादा (DPL)सुरुवातीचा स्लॅब: ६%
निपटारा (Settlement)कॅश-सेटल (रोखीने निपटारा)

भारतातील मान्सून चक्राचे संपूर्ण संरक्षण

यापूर्वी लाँच करण्यात आलेले ‘रेनमुंबई’ हे जून ते सप्टेंबर दरम्यानच्या नैऋत्य मान्सूनच्या अनिश्चिततेवर केंद्रित होते, तर ‘रेनचेन्नई’ सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीतील ईशान्य मान्सूनचे व्यवस्थापन करेल. या दोन्ही उत्पादनांमुळे आता जून ते डिसेंबर या संपूर्ण ७ महिन्यांच्या मान्सून चक्रात हवामानाशी संबंधित आर्थिक धोक्यांवर प्रभावी उपाय उपलब्ध झाला आहे.

“रेनमुंबईच्या माध्यमातून आम्ही भारताला नैऋत्य मान्सूनच्या अनिश्चिततेचे व्यवस्थापन करण्यासाठी पहिले नियमन केलेले साधन दिले होते. रेनचेन्नईमुळे आता हाच फ्रेमवर्क परतीच्या ईशान्य मान्सूनपर्यंत विस्तारित झाला आहे. हे कॉन्ट्रॅक्ट आयएमडीच्या अनेक दशकांच्या डेटावर आधारित असून चेन्नईच्या मीनमबाक्कम आणि नुंगमबाक्कम केंद्रांमधील प्रत्यक्ष पावसाची लाँग पीरियड अॅव्हरेज (LPA) मधील तफावत अचूकपणे नोंदवते,” अशी माहिती NCDEX चे चीफ बिझनेस ऑफिसर केदार देशपांडे यांनी दिली.

उद्योग आणि बाजारासाठी का महत्त्वाचे?

हवामानातील अनिश्चिततेचा मोठा फटका कृषी क्षेत्रासोबतच विमा कंपन्या, बांधकाम, लॉजिस्टिक, रिटेल, पर्यटन आणि ऊर्जा क्षेत्राला बसतो. अशा वेळी पारदर्शक आणि रोखीने निपटारा होणाऱ्या या वेदर डेरिव्हेटिव्ह्जमुळे व्यापारी आणि संस्थात्मक घटकांना मान्सूनमुळे होणारे आर्थिक नुकसान कमी करता येणार आहे. NCDEX च्या या उपक्रमामुळे भारतातील फायनान्शियल डेरिव्हेटिव्ह्ज बाजारात हवामान जोखीम व्यवस्थापनाची एक नवी दिशा उघडली आहे.