nikhil kamath portfolio investment indian stock market : गेल्या २ वर्षात भारतीय शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता पाहायला मिळत असून, सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये कमालाची घसरण झाली आहे. परतावा कमी झाल्याने परदेशी गुंतवणूकदारांनी बाजाराकडे पाठ फिरवली आहे. असे असतानाही देशातील सर्वात मोठी ब्रोकरेज कंपनी झिरोधाचे सह-संस्थापक निखिल कामथ यांनी भारतीय बाजारावर मोठा विश्वास व्यक्त केला आहे. “भारतीय कंपन्यांचे व्हॅल्युएशन आता अत्यंत आकर्षक पातळीवर आले आहे. म्हणूनच, मी माझ्या वैयक्तिक पोर्टफोलिओतील तब्बल ९० टक्के रक्कम भारतीय शेअर्समध्ये गुंतवली आहे,” असं कामथ म्हणाले. ‘ब्लूमबर्ग’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली.

गुंतवणूकदार अस्वस्थ, पण परतावा नक्की मिळणार!

गेल्या वर्षभरापासून निर्देशांक एकाच पातळीवर रेंगाळत आहेत. यावर कामत म्हणाले, “पोर्टफोलिओमध्ये फारशी वाढ न झाल्यामुळे सध्या गुंतवणूकदार नक्कीच अस्वस्थ होत आहेत, पण इक्विटी मार्केटचा हा स्वभावच आहे. जर तुम्ही १० ते २० वर्षांचा दीर्घकालीन विचार केला, तर भारतीय बाजारपेठेने नेहमीच १२ ते १४ टक्के चक्रवाढ परतावा दिला आहे. गेल्या दोन वर्षांत कामगिरी सुस्त असली, तरी बाजार नक्कीच उसळी घेईल.” असा विश्वास कामथ यांनी व्यक्त केला.

निखिल कामथ यांची सर्वाधिक गुंतवणूक कुठे?

आयटी क्षेत्रात सातत्याने घसरण होत असताना निखिल कामत यांनी मात्र यावरच मोठा डाव लावला आहे. ते सध्या अशा आयटी सेवा कंपन्यांची खरेदी करत आहेत ज्यांचा ‘फॉर्वर्ड पीई’ अवघा १३ ते १४ च्या आसपास असून त्या स्वस्त व्हॅल्युएशनवर उपलब्ध आहेत. याशिवाय, त्यांचा सर्वाधिक भर ‘एनर्जी ट्रान्झिशन’ या थीमवर असून इलेक्ट्रिक व्हेईकल्स आणि बॅटरी निर्मिती करणाऱ्या कंपन्यांमध्ये ते गुंतवणूक वाढवत आहेत. औषध निर्माण, हॉस्पिटल्स आणि पर्यटन या क्षेत्रांतील कंपन्यांबाबतही ते सकारात्मक आहेत.

भारताच्या ‘ग्रोथ स्टोरी’वर ९५% विश्वास

कामत यांनी सांगितले की, त्यांच्या एकूण गुंतवणुकीचा ९५% भाग हा भारताच्या दीर्घकालीन विकास दरावर आधारित आहे. देशांतर्गत बाजारात सध्या कामगिरी संथ असली, तरी भारताइतकी मोठी संधी इतर कोणत्याही उदयोन्मुख बाजारपेठेत उपलब्ध नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बाजारासाठी सट्टेबाज गरजेचे : कामथ

फ्युचर्स अँड ऑप्शन्स ट्रेडिंगवर सेबीने नुकत्याच केलेल्या कडक कारवाईवर कामथ यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले. ते म्हणाले, भांडवली बाजाराच्या आरोग्यासाठी सट्टेबाजी किंवा अंदाज बांधणे हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. हे ‘ब्लॅक अँड व्हाईट’ असू शकत नाही. जर बाजारातून एका रात्रीत सर्व सट्टेबाज गायब झाले, तर मार्केट खूप उथळ होईल आणि बाजारातील तरलता संपून जाईल. यासाठी त्यांनी एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीचे उदाहरण दिले. कारण, अंदाज आणि सट्टेबाजीमुळे स्पेसएक्स कंपनीच्या शेअरला चांगला भाव मिळाला.

शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन असते. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या नोंदणीकृत आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. वरील माहिती केवळ शैक्षणिक आणि विश्लेषणात्मक उद्देशाने दिली आहे.