NITHIN KAMATH INVESTMENT STRATEGY FOR VOLATILE MARKETS 2026: झिरोधाचे सह-संस्थापक नितीन कामत यांनी नुकतेच सांगितले की, कोणता मालमत्ता वर्ग (Asset Class) सर्वोत्तम कामगिरी करेल, याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करणे हे बहुतांशी व्यर्थ आहे. सध्या बाजारात प्रचंड अस्थिरता दिसून येत असताना, त्यांनी बहुतांश गुंतवणूकदारांना त्याऐवजी गुंतवणुकीचे वैविध्यीकरण करण्यावर आणि दीर्घकालीन शिस्त पाळण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला.
“कोणता मालमत्ता वर्ग चांगली कामगिरी करेल, याचा अंदाज कोणीही वर्तवू शकत नाही. ९९ टक्के लोकांसाठी सर्वात उत्तम गोष्ट म्हणजे गुंतवणुकीचे वैविध्यीकरण करणे आणि बाजारातील चांगल्या व वाईट अशा दोन्ही काळात आपली गुंतवणूक कायम ठेवणे”, असे नितीन कामत यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
बाजारातील तीव्र मंदी आणि वाढती अनिश्चितता या पार्श्वभूमीवर त्यांनी ही पोस्ट केली आहे. पश्चिम आशियातील भू-राजकीय तणावाचा बाजारातील परिस्थितीवर सतत दबाव येत असल्याने, निफ्टीने आपल्या अलीकडील घसरणीचा कल कायम राखत, काही महत्त्वाच्या ‘मानसिक पातळ्यां’च्या (Psychological Levels) खाली वाटचाल केली आहे. गेल्या आठवड्यात हा निर्देशांक २३,००० च्या खाली बंद झाला होता. त्यानंतरही त्याची घसरण सुरूच राहिली आणि सोमवारी ४८८ अंशांनी (किंवा २.१४ टक्क्यांनी) घसरून तो २२,३३१ अंशांवर बंद झाला होता.
विदेशी गुंतवणूकदार सातत्त्याने गुंतवणूक कमी करत असल्याने दबावात भर पडली आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, रुपयाचे अवमूल्यन आणि जागतिक स्तरावर जोखीम टाळण्याच्या वृत्तीमुळे उदयोन्मुख बाजारपेठांपासून दूर जाण्यास चालना मिळाल्याने, विदेशी गुंतवणूकदारांनी मार्च महिन्यात भारतीय शेअर बाजारातून १.१४ लाख कोटी रुपये काढून घेतले, जी आतापर्यंतची भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठी विक्री ठरली आहे.
नितीन कामत यांनी आपल्या पोस्टसोबतच विविध पोर्टफोलिओमधील मागील दोन वर्षांच्या एसआयपी (SIP) परताव्याची आकडेवारीही सादर केली आहे. या तुलनेमध्ये प्युअर इक्विटी निर्देशांक आणि इक्विटी, डेट व सोने यांचा समावेश असलेल्या मिश्र पोर्टफोलिओंचा समावेश होता.
या निष्कर्षांवरून असे दिसून येते की, जेव्हा बाजार अस्थिर होतो, तेव्हा प्युअर इक्विटी आणि डेट व सोन्याचा समावेश असलेल्या मिश्र पोर्टफोलिओमधील दरमहा १०,००० रुपयांची सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) परताव्याचे संरक्षण करण्यास कशी मदत करू शकते.
त्यांनी पोस्टमध्ये शेअर केलेल्या माहितीनुसार, इक्विटी, डेट आणि सोने यांमध्ये समान वाटप असलेल्या पोर्टफोलिओने सर्वाधिक दमदार कामगिरी केली असून, त्यातून सुमारे १८.१ टक्के परतावा मिळाला आहे. बाजारात अलीकडे झालेल्या घसरणीनंतरही, हे पोर्टफोलिओ सकारात्मक स्थितीत कायम राहिले.
