NITO Founder Abhijeet Rege Investment Journey Stock Market Investment: गेल्या काही महिन्यांपासून भारतीय शेअर बाजारामध्ये सातात्याने घसरण होत आहे. या घसरणीमुळे असंख्य गुंतवणूकदारांनी लाखो कोटी रुपये गमावले आहेत. याचबरोबर फ्युचर्स आणि ऑप्शन्ससारख्या ट्रेडिंग प्रकारामध्ये तरुण गुंतवणूकदारांना खोट तोटा होत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर निटो (NITO) कंपनीचे संस्थापक अभिजीत रेगे यांनी लिंक्डइनवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांचा गुंतवणूक प्रवास सांगितला आहे. यामध्ये सुरुवातीला झालेला तोटा ते गुंतवणुकीतून मिळवलेले आर्थिक स्वातंत्र्य यांचा समावेश आहे. याचबरोबर त्यांनी तरुण गुंतवणूकदारांना सल्लाही दिला आहे.
सन २००० मध्ये १५ हजार बुडाले
आपल्या पोस्टच्या सुरुवातीलाच अभिजीत रेगे यांनी त्यांच्या गुंतवणूक प्रवासाचा वाईट अनुभव सांगितला. ते म्हणाले, “आयआयएम लखनौमध्ये असताना, मी माझ्या काही मित्रांसोबत मिळून १५,००० रुपये जमा केले आणि ‘टिप्स’च्या आधारे शेअर्समध्ये गुंतवणूक केली. तो काळ साधारणपणे २००० सालचा होता. ‘डॉट-कॉम’ क्षेत्रातील घसरणीत आमचे सर्व पैसे बुडाले. गुंतवणुकीच्या जगाशी झालेली ती माझी पहिली ओळख होती. पण त्या नुकसानीतून मला गुंतवणूक कशी करू नये ही महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळाली.”
“एका वर्षानंतर मी अमेरिकेला गेलो आणि तिथे मी वाचन सुरू केले. वॉरन बफे यांच्यासारख्या व्यक्तींबद्दल वाचले, ज्यांनी अनेक दशकांत प्रचंड संपत्ती निर्माण केली आणि सातत्याने बाजारापेक्षा चांगली कामगिरी केली. पीटर लिंच यांच्याबद्दल वाचले. त्यांच्या ‘वन अप ऑन वॉल स्ट्रीट’ या पुस्तकाने उत्कृष्ट कंपन्या शोधण्याबाबतचा माझा दृष्टिकोनच बदलून टाकला. मला एक गोष्ट स्पष्ट झाली. हे लोक केवळ नशिबाच्या जोरावर यशस्वी झाले नव्हते. ते एका विशिष्ट पद्धतीचा अवलंब करत होते. ती पद्धत म्हणजे, स्पर्धात्मक फायदा असलेल्या व्यवसायांचा शोध घेणे आणि गुंतवणुकीचे मूल्य अनेक पटींनी वाढेपर्यंत त्या शेअर्सना दीर्घकाळ आपल्याकडे ठेवणे”, असे त्यांनी पुढे सांगितले.
शेअर बाजाराच्या अभ्यासाचे महत्त्व अधोरेखित करताना ते म्हणाले, “मला ‘रँडम वॉक थिअरी’ बद्दलही समजले. ही संकल्पना सांगते की बाजार कार्यक्षम असतात आणि कोणीही सातत्याने बाजारापेक्षा चांगली कामगिरी करू शकत नाही. बऱ्याचदा हे खरे ठरते, पण नेहमीच नाही. आणि त्या फरकामध्येच संयमी गुंतवणूकदार आपली संधी शोधतो. म्हणून मी माझी स्वतःची पद्धत विकसित केली आणि तिचा वापर करण्यास सुरुवात केली.”
गुंतवणूक प्रवास
“पुढील दोन दशकांत, त्या पद्धतीमुळे मला माझ्या आयुष्यातील काही अत्यंत फायदेशीर गुंतवणुकी करता आल्या. यामध्ये २००२ मध्ये नेटफ्लिक्स आणि कॉग्निझंट, २००५ मध्ये अमेरिकन एक्सप्रेस आणि गुगल, २०१० मध्ये व्हिसा आणि मास्टरकार्ड, २०११ मध्ये ॲपल आणि २०१६ मध्ये मर्कॅडो लिब्रे व शॉपिफाय यांचा समावेश आहे. अर्थात, डोराल फायनान्शियल आणि द कंटेनर स्टोअर सारख्या काही चुकाही झाल्या”, असेही रेगे यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे.

यश केवळ नशिबामुळे नाही
“पण मला तुम्हाला एक गोष्ट समजून सांगायची आहे. इथे मुख्य मुद्दा केवळ विशिष्ट शेअर्सचा नाही. मला खात्री आहे की यात नशिबाचाही काहीसा वाटा होता, कारण २००८-०९ च्या आर्थिक संकटाचा काळ वगळता, गेल्या दोन दशकांचा काळ गुंतवणुकीसाठी बऱ्यापैकी अनुकूल होता. तरीही, हे यश केवळ नशिबामुळे मिळाले नाही. तर ते वाचन, सतत शिकणे, एक कार्यपद्धती विकसित करणे आणि बाजार कोसळत असताना, त्यात चढ-उतार होत असताना किंवा मनात शंका निर्माण होत असतानाही त्या पद्धतीचे शिस्तबद्ध पालन करणे, याचे फळ होते”, असे अभिजीत रेगेंनी म्हटले आहे.
गुंतवणुकीतून आर्थिक स्वातंत्र्य
गुंतवणूक करणे ही जन्मापासून मिळणारी नैसर्गिक देणगी नाही, तर ते एक असे कौशल्य आहे जे तुम्ही स्वतः विकसित करता. ज्यांना खऱ्या अर्थाने आर्थिक स्वातंत्र्य हवे आहे, त्यांच्यासाठी हे एक अत्यंत प्रभावी साधन आहे. याच आर्थिक स्वातंत्र्यामुळे मला एका फायदेशीर नोकरीतून बाहेर पडून ‘NITO’ उभारण्याचे स्वातंत्र्य मिळाल्याचे अभिजीत रेगे यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे.
तरुण गुंतवणूकदारांना सल्ला
तरुण गुंतवणूकदारांना सल्ला देताना ते म्हणाले, “तरुणांच्या एका पिढीला ही गोष्ट लवकरात लवकर समजावी, अशी माझी इच्छा आहे. सुरुवात करण्यासाठी तुम्हाला खूप मोठ्या रकमेची गरज नसते. त्यासाठी आवश्यक असते ते म्हणजे योग्य ज्ञान, योग्य पद्धत आणि ती पद्धत परिणामकारक ठरेपर्यंत संयम राखण्याची वृत्ती. हा माझा गुंतवणुकीचा वैयक्तिक प्रवास आहे, कोणताही गुंतवणुकीचा सल्ला नाही.”
