मुंबई : गेल्या दशकाहून अधिक काळ विविध नियामक अडचणींमुळे रखडलेला राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात एनएसईच्या प्रारंभिक समभाग विक्रीवर शिक्कामोर्तब झाले आहे. एनएसईने मुसुदा प्रस्ताव दाखल केला असून त्यामाध्यमातून विद्यमान भागधारक आंशिक समभाग विक्रीच्या माध्यमातून हिस्सा विक्री करणार आहे.
आयपीओ दिवाळीच्या मुहूर्तावर बाजारात येण्यासाठी सज्ज होत असून या ऐतिहासिक महा-आयपीओच्या माध्यमातून सुरुवातीच्या काळातील संस्थात्मक गुंतवणूकदारांना प्रचंड मोठा नफा कमावण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. यामध्ये देशातील सर्वात मोठी बँक ‘स्टेट बँक आणि आघाडीच्या विमा कंपन्यांचा समावेश असून, हे गुंतवणूकदार तब्बल ३०,६०० कोटी रुपये पदरात पाडून घेत अंशतः किंवा पूर्णपणे बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. आयपीओच्या माध्यमातून विद्यमान भागधारकांकडून सुमारे ६ टक्के हिस्सा विक्रीसाठी आणला जाणार असून, त्यातून तब्बल ३०,६०० कोटी रुपये मूल्याचे समभाग विकले जाऊ शकतात.
या विक्रीत स्टेट बँक, भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी), एसबीआय कॅपिटल मार्केट्स, बँक ऑफ बडोदा तसेच काही विमा कंपन्या आणि परदेशी गुंतवणूकदार आघाडीवर असतील. स्टेट बँक हा सर्वात मोठा विक्रेता ठरू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, स्टेट बँक आणि काही इतर संस्थांनी अनेक वर्षांपूर्वी एनएसईमधील समभाग अत्यल्प किमतीत खरेदी केले होते. आज एनएसईचे मूल्यांकन सुमारे ५ लाख कोटी रुपयांच्या आसपास पोहोचल्याने या गुंतवणुकींवर प्रचंड परतावा मिळणार आहे.
एनएसईने बुधवारी सेबीकडे मसुदा प्रस्ताव दाखल करून आयपीओ प्रक्रियेला अधिकृत सुरुवात केली. भारतीय भांडवली बाजाराच्या इतिहासातील मोठ्या आयपीओंपैकी एक मानला जात आहे. सुमारे नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर एनएसईला सूचिबद्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. को-लोकेशन प्रकरणामुळे रखडलेली प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून, आयपीओनंतर देशातील सर्वात महत्त्वाच्या बाजारमंचामध्ये सामान्य गुंतवणूकदारांना गुंतवणूक करणे शक्य होणार आहे.
