मुंबई : नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या (एनएसई) बहुप्रतीक्षित महा-आयपीओची जोरदार चर्चा सध्या दलाल स्ट्रीटवर सुरू आहे. पण या आयपीओमध्ये खरी ‘लॉटरी’ लागली आहे ती देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक आणि इतर सुरुवातीच्या गुंतवणूकदारांना. एनएसईने सेबीकडे दाखल केलेल्या प्राथमिक कागदपत्रांमधून समोर आलेल्या माहितीनुसार, स्टेट बँकेने अनेक वर्षांपूर्वी लावलेली अवघ्या २ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती, तिचे मूल्य आता थेट ५,००० कोटी रुपयांच्या घरात पोहोचले आहे!
अवघ्या ८० पैशांचा शेअर आता ₹२,००० वर!
एनएसईच्या सुरुवातीच्या काळात, म्हणजेच जवळपास तीन दशकांपूर्वी, स्टेट बँकेसह काही बँकांनी या एक्स्चेंजमध्ये भांडवल गुंतवले होते. अनेक बक्षीस समभाग (बोनस शेअर) आणि कॅपिटल रीस्ट्रक्चरिंगनंतर एसबीआयसाठी एनएसईच्या एका शेअरची सरासरी खरेदी किंमत अवघी ८० पैसे प्रति शेअर इतकी बसते. अनधिकृत किंवा ग्रे-मार्केटमधील अंदाज पाहता, आयपीओमध्ये एका शेअरची किंमत २,००० रुपये असू शकते.
स्टेट बँकेचे या आयपीओमध्ये २.४७ कोटी शेअर विकण्याची शक्यता आहे. ज्या गुंतवणुकीची मूळ किंमत अवघी १.९८ कोटी रुपये होती, त्याचे मूल्य आता तब्बल ४,९५० कोटी रुपयांच्या वर गेले आहे. म्हणजेच बँकेला जवळपास ४,९४८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळणार आहे
आयपीओ दिवाळीच्या मुहूर्तावर बाजारात येण्यासाठी सज्ज होत असून या ऐतिहासिक महा-आयपीओच्या माध्यमातून सुरुवातीच्या काळातील संस्थात्मक गुंतवणूकदारांना प्रचंड मोठा नफा कमावण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. यामध्ये देशातील सर्वात मोठी बँक ‘स्टेट बँक आणि आघाडीच्या विमा कंपन्यांचा समावेश असून, हे गुंतवणूकदार तब्बल ३०,६०० कोटी रुपये पदरात पाडून घेत अंशतः किंवा पूर्णपणे बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. आयपीओच्या माध्यमातून विद्यमान भागधारकांकडून सुमारे ६ टक्के हिस्सा विक्रीसाठी आणला जाणार असून, त्यातून तब्बल ३०,६०० कोटी रुपये मूल्याचे समभाग विकले जाऊ शकतात.
या विक्रीत स्टेट बँक, भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी), एसबीआय कॅपिटल मार्केट्स, बँक ऑफ बडोदा तसेच काही विमा कंपन्या आणि परदेशी गुंतवणूकदार आघाडीवर असतील. स्टेट बँक हा सर्वात मोठा विक्रेता ठरू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, स्टेट बँक आणि काही इतर संस्थांनी अनेक वर्षांपूर्वी एनएसईमधील समभाग अत्यल्प किमतीत खरेदी केले होते. आज एनएसईचे मूल्यांकन सुमारे ५ लाख कोटी रुपयांच्या आसपास पोहोचल्याने या गुंतवणुकींवर प्रचंड परतावा मिळणार आहे.
