मुंबई : राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात ‘एनएसई’च्या प्रस्तावित प्रारंभिक समभाग विक्रीचे (आयपीओ) आकारमान कमी होण्याची शक्यता आहे. काही भागधारकांनी आयपीओदरम्यान समभाग विक्रीतून माघार घेतल्याने आंशिक समभाग विक्रीचे प्रमाण (ऑफर फॉर सेल -ओएफएस) आधीच्या नियोजित ६ टक्क्यांवरून ५.२ ते ५.५ टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एनएसईच्या आयपीओचा एकूण आकारमान २५ ते २७ हजार कोटी रुपयांपर्यंत कमी होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी बुधवारी सांगितले.

यापूर्वी एनएसईच्या आयपीओचे आकारमान सुमारे ३० हजार कोटी रुपयांचे असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, नव्या आकारामुळे एनएसईला भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ ठरण्याची संधी गमावण्याची शक्यता आहे. सध्या २७,८७० कोटी रुपयांच्या आयपीओसह ह्युंदाई मोटर इंडियाच्या नावावर हा विक्रम आहे.

अधिक मूल्यांकनाची भागधारकांना अपेक्षा

काही भागधारकांनी सध्याच्या आयपीओत समभाग विकण्याऐवजी भविष्यात अधिक मूल्यांकन मिळू शकते, या अपेक्षेने विक्री पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्यामुळे ओएफएसचा आकार कमी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, किरकोळ गुंतवणूकदारांचा सहभाग वाढविण्यासाठी एनएसईच्या आयपीओचे मूल्य आकर्षक ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आयपीओसाठी १,७०० ते १,७८५ रुपये प्रति समभाग किंमतपट्टा अपेक्षित असून, यापूर्वी सुमारे २,००० रुपयांचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. एनएसईचा आयपीओ १८ सप्टेंबरला खुला होऊन २२ सप्टेंबरला बंद होण्याची शक्यता आहे. समभागांची बाजारात २५ सप्टेंबरला सूचिबद्ध होण्याचे संकेत आहेत.


दशकभरानंतर आयपीओचा मार्ग मोकळा

गेल्या आठवड्यात बाजार नियामक सेबीने एनएसईला आयपीओ आणण्यास मंजुरी दिली. त्यामुळे जवळपास दशकभरापासून रखडलेल्या एनएसईच्या सूचिबद्धतेचा मार्ग मोकळा झाला आहे. सहस्थान (को-लोकेशन) प्रकरणासह विविध नियामक अडचणींमुळे एनएसईची सूचिबद्धता लांबणीवर पडली होती.

एनएसईने जूनमध्ये सेबीकडे आयपीओसाठी मसुदा प्रस्ताव दाखल केला होता. मसुद्यानुसार एनएसईचा प्रस्ताव पूर्णपणे ओएफएस स्वरूपाचा असून, १४.८९ कोटी समभागांची विक्री प्रस्तावित होती. हे एनएसईच्या भागभांडवलाच्या सुमारे ६ टक्के आहे. ओएफएस असल्याने आयपीओतून मिळणारी संपूर्ण निधी भागधारकांना मिळणार आहे.

भागधारकांमध्ये कोणाचा सहभाग

एनएसईच्या प्रमुख विक्री भागधारकांमध्ये समावेश असलेली स्टेट बँक २.४८ कोटींपर्यंत समभाग विकणार आहे. त्यानंतर एमएस स्ट्रॅटेजिक (मॉरिशस) लिमिटेड १.६० कोटी समभाग विकणार आहे. याशिवाय कॅनडा पेन्शन प्लॅन इन्व्हेस्टमेंट बोर्ड, अरांडा इन्व्हेस्टमेंट्स (मॉरिशस), बँक ऑफ बडोदा, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, द न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी, नॅशनल इन्शुरन्स कंपनी आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी यांचाही विक्री भागधारकांमध्ये समावेश आहे.