Orient Cables Share Price Lower Circuit IPO Listing Profit Booking: ओरिएंट केबल्सच्या शेअरने काल ५ ऑक्टोंबर रोजी बाजारात ६५ टक्के इतक्या दमदार प्रीमियमसह पदार्पण केले होते. पण, बाजारात सूचीबद्ध झाल्यानंतर अवघ्या एका दिवसातच, म्हणजेच मंगळवार, ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ओरिएंट केबल्सच्या शेअरच्या किमतीत १० टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे.

ओरिएंट केबल्सच्या शेअरच्या घसरणीमागे मुख्य कारण म्हणजे गुंतवणूकदारांनी केलेली नफावसुली. ओरिएंट केबल्सचे शेअर कालचा बंद भाव असलेल्या ४०३.३० रुपयांच्या तुलनेत आज ३८० रुपयांवर उघडले आणि त्यानंतर ते १० टक्क्यांनी घसरून ३६३ रुपये या ‘लोअर सर्किट’ पातळीवर आले. ही या शेअरची आतापर्यंतची नीचांकी पातळी ठरली आहे. तरीही, या घसरलेल्या किमतीवरही हा शेअर त्याच्या २७२ या आयपीओ किमतीच्या तुलनेत ३३ टक्के वरच आहे. सोमवारी, ५ ऑक्टोबर हा शेअर बीएसईवर ६५ टक्के प्रीमियमसह ४४८ रुपयांवर सूचीबद्ध झाला होता.

तज्ज्ञांच्या मते, आयपीओ सूचिबद्ध झाल्यानंतरचा नफा खिशात घालण्यासाठी गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीमुळे शेअरमध्ये मोठी घसरण झाली असावी. येत्या काही महिन्यांत गुंतवणूकदारांचे लक्ष तिमाही महसूल वाढ, नफाक्षमता, ऑर्डरची पूर्तता आणि ऑपरेटिंग कॅश फ्लो यांवर असेल.

ओरिएंट केबल्सची आर्थिक कामगिरी

गेल्या काही वर्षांत कंपनीच्या कामकाजातून मिळणारे उत्पन्न आणि नफा यामध्ये सातत्यपूर्ण वाढ दिसून आली आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपनीचे उत्पन्न ६५७.७७ कोटी रुपये होते. त्यात वाढ होऊन ते आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ८२४.९६ कोटी रुपये आणि आर्थिक वर्ष २०२६ मध्ये १,१७१.६५ कोटी रुपये झाले. आर्थिक वर्ष २०२४ मधील नफा ४०.१ कोटी रुपये होता, जो आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ५३.३ कोटी रुपये आणि आर्थिक वर्ष २०२६ मध्ये ५३.५६ कोटी रुपयांपर्यंत वाढला.

विश्लेषक काय म्हणाले?

मास्टर कॅपिटल सर्व्हिसेसचे मुख्य संशोधन अधिकारी रवी सिंग यांनी या गोष्टीवर भर दिला की, जरी भारतीय नेटवर्किंग केबल्स आणि फायबर-ऑप्टिक केबल्सच्या बाजारपेठेत वाढीच्या प्रचंड संधी असल्या, तरी कंपनी आपला महसुलातील वाढीचा वेग टिकवून ठेवू शकते का, तसेच खेळते भांडवल आणि रोख प्रवाहाची स्थिती उत्तम राखून नफा वाढवणे व विस्ताराच्या योजनांची अंमलबजावणी करणे या गोष्टींवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे ठरेल.

“डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधांच्या वाढत्या मागणीमुळे, दीर्घकालीन गुंतवणूकदार कंपनीच्या नेटवर्किंग केबल आणि पॅसिव्ह नेटवर्किंग उपकरणांच्या व्यवसायावर लक्ष ठेवू शकतात. केवळ आजच्या लिस्टिंगच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, गुंतवणूकदार त्रैमासिक महसुलातील वाढ, ऑर्डर्सची पूर्तता, EBITDA मार्जिन, क्षमतेचा वापर आणि ऑपरेटिंग कॅश फ्लो यांसारख्या बाबींवर लक्ष ठेवू शकतात”, असे सिंग म्हणाले.