Pakistan stock market surge after Iran US ceasefire impact KSE 100 index rally: इराणविरुद्ध सुरू असलेल्या अमेरिका-इस्रायल युद्धाला विराम मिळाल्यानंतर, बुधवारी पाकिस्तान स्टॉक एक्स्चेंजमध्ये १२,००० हून अधिक अंशांची मोठी उसळी पाहायला मिळाली. प्रमुख निर्देशांक केएसई-१०० मध्ये १३,४४५.८१ अंशांची (किंवा ८.१५%) वाढ होऊन, तो मागील सत्रातील १५१,६७३.४५ अंशांच्या पातळीवरून १६५,११९.२६ अंशांवर उघडला. या प्रचंड तेजीमुळे बाजार सुरू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच व्यवहार थांबवण्यात आले होते. त्यानंतर सकाळी १०:४२ वाजता पुन्हा व्यवहारांना सुरुवात झाली.
पाकिस्तानी वृत्तपत्र ‘डॉन’च्या वृत्तानुसार केएसई-१०० निर्देशांकाच्या इतिहासात एकाच दिवशी झालेली ही सर्वात मोठी वाढ ठरली आहे.
अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांच्या तात्पुरत्या युद्धविरामाला दुजोरा मिळाल्यानंतर ही वाढ दिसून आली. या करारानुसार, जागतिक सागरी वाहतुकीचा एक महत्त्वाचा मार्ग असलेल्या ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ची वाहतूक पुन्हा सुरू करण्याच्या बदल्यात, अमेरिकेने आपल्या लष्करी कारवाया स्थगित करण्यास सहमती दर्शवली होती.
“पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि फिल्ड मार्शल असीम मुनीर यांच्याशी झालेल्या सविस्तर चर्चेनंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे”, असे ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
“इराणने ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ तात्काळ पूर्णपणे आणि सुरक्षितपणे व्यापारासाठी खुली ठेवण्याचे मान्य केल्यास, अमेरिका पुढील दोन आठवड्यांसाठी इराणवरील संभाव्य बॉम्बहल्ला आणि लष्करी कारवाई थांबविण्यास तयार आहे”, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
७ एप्रिल रोजी केएसई-१०० निर्देशांक चढ-उतारांनंतर अखेरीस ४६५.६४ अंशांनी वधारून बंद झाला होता. अमेरिकेच्या मागण्यांना प्रतिसाद देण्यासाठी अमेरिकेने इराणला दिलेल्या मुदतीपूर्वी निर्माण झालेल्या अनिश्चिततेवर गुंतवणूकदारांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे ही हालचाल दिसून आली.
या संघर्षाच्या सुरुवातीच्या टप्प्यात शेअर बाजाराला मोठ्या नुकसानाचाही सामना करावा लागला होता. २ मार्च रोजी, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या कथित हत्येच्या वृत्तामुळे केएसई-१०० निर्देशांक १६,०८९ अंशांनी (किंवा ९.५७ टक्क्यांनी) कोसळला होता. ही निर्देशांकाची एकाच दिवसातील सर्वात मोठी घसरण ठरली होती.
