parle products ipo news marathi : तुमच्या आमच्या लहानपणीची आणि आताही कधीही आठवण झाली तर चहासोबत हवा बसणारे पार्ले-जी बिस्किटला आता एक नवी ओळख मिळणार आहे. पार्ले-जी बिस्किट, मँगो बाईट आणि मेलडी यांसारखे लोकप्रिय ब्रँड्स घराघरांत पोहोचवणारी देशातील अग्रगण्य बिस्किट आणि खाद्यपदार्थ कंपनी ‘पार्ले प्रॉडक्ट्स लिमिटेड’ लवकरच शेअर बाजारात पदार्पण करण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पीएम जॉर्ज मेलोनी यांच्या भेटीनंतर पार्ले कंपनीची ‘मेलडी’ टॉफी ट्रेंडींगमध्ये आली होती.
तब्बल १ अब्ज डॉलरपेक्षा जास्तीचा आयपीओ
मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार, कंपनी पुढील वर्षी म्हणजेच २०२७ मध्ये तब्बल १ अब्ज डॉलरपेक्षा (सुमारे ९,५३० कोटी रुपये) अधिक आकाराचा मेगा आयपीओ आणण्याच्या तयारीत असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सध्या ही प्रक्रिया प्राथमिक टप्प्यात असून, बाजारपेठेतील परिस्थितीनुसार आयपीओचा आकार आणि मूल्यांकन यामध्ये बदल होऊ शकतो, असेही सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
कोटक, ॲक्सिस आणि एचएसबीसी मुख्य सल्लागार
या महाकाय आयपीओच्या पूर्वतयारीसाठी पार्ले प्रॉडक्ट्सने एप्रिल महिन्यातच ‘रिक्वेस्ट फॉर प्रपोजल’ जारी केले होते. कंपनीने कोटक महिंद्रा कॅपिटल, ॲक्सिस कॅपिटल आणि एचएसबीसी सिक्युरिटीज यांची सल्लागार म्हणून निवड केली आहे. या समूहात लवकरच चौथ्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट बँकेचा समावेश होण्याची शक्यता असून, त्याबाबत चर्चा अंतिम टप्प्यात आहे.
या संदर्भात पार्ले प्रॉडक्ट्सचे मुख्य विपणन अधिकारी मयांक शाह म्हणाले, की, “आम्ही बाजारातील अशा चर्चांवर भाष्य करत नाही. सध्या आमचे पूर्ण लक्ष व्यवसायाच्या वाढीवर आहे. आमच्या आकाराची कोणतीही कंपनी वाढीचे वेगवेगळे पर्याय पडताळून पाहत असते, आम्हीही तेच करत आहोत.”
पार्ले प्रॉडक्ट्स आणि पार्ले ॲग्रो वेगवेगळ्या कंपन्या
चौहान कुटुंबात व्यवसायाचे विभाजन झालेले असून विजय चव्हाण यांच्याकडे ‘पार्ले प्रॉडक्ट्स’चे (बिस्किट्स आणि चॉकलेट्स) नेतृत्व आहे. तर फ्रुटी, अप्पी फिझ, बेली वॉटर सारखे ब्रँड तयार करणाऱ्या ‘पार्ले ॲग्रो’ची मालकी जयंतीलाल, शौना आणि नादिया चौहान यांच्याकडे आहे. कौटुंबिक विभाजनानंतर दोन्ही कंपन्या एकमेकांपासून स्वतंत्रपणे आपला व्यवसाय चालवतात.
बाजारातील स्थान आणि आर्थिक स्थिती
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘२०२५ बर्गंडी प्रायव्हेट हुरुन इंडिया ५००’ अहवालानुसार, पार्ले प्रॉडक्ट्स ही ७५,४२० कोटी रुपयांच्या मूल्यांकनासह भारतातील सातवी सर्वात मौल्यवान अनलिस्टेड कंपनी आहे. शेअर बाजारात पार्लेची थेट स्पर्धा ‘ब्रिटानिया इंडस्ट्रीज’ (गुड डे, टायगर) आणि ‘आयटीसी’ (सनफीस्ट) यांच्याशी असेल.
पार्ले कंपनी कधी सुरू झाली?
मुंबईत १९२९ साली विलेपार्ले येथे या कंपनीची सुरुवात झाली. विलेपार्ले या नावावरुनच कंपनीला पार्ले हे नाव देण्यात आले होते. ही कंपनी आज केवळ बिस्किट्सच नाही तर केक, रस्क, आटा आणि तृणधान्ये क्षेत्रातही कार्यरत आहे. पार्लेचे उत्पादन फक्त भारतातच नव्हे, तर नायजेरिया, कॅमेरून, घाना, इथिओपिया, केनिया, नेपाळ आणि मेक्सिको यांसारख्या देशांतील प्लांटमध्ये होते. तसेच अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडामध्ये त्यांचे प्रॉडक्ट्स मोठ्या प्रमाणावर निर्यात केले जातात.
