PB Fintech share price crash Policybazaar : ऑनलाईन विमा विकणाऱ्या ‘पॉलिसीबाजार’ची मूळ कंपनी असलेल्या ‘पी.बी. फिनटेक’च्या शेअर्समधील घसरण थांबायचं नाव घेताना दिसत नाही. विमा नियमन करणाऱ्या ‘इर्डा’ने एक प्रसिद्धीपत्रक जारी केले. प्रस्तावित नियमानुसार विमा एजंटच्या कमिशनमध्ये घट होऊ शकते. या बातमीनंतर ‘पी.बी. फिनटेक’च्या शेअरमध्ये सलग चौथ्या सत्रातही घसरण कायम आहे. मंगळवारी सकाळच्या सत्रात कंपनीचा शेअर घसरून १,०८१ रुपयांच्या आसपास पोहोचला, ज्यामुळे मिड कॅप क्षेत्रात हा सर्वाधिक घसरलेला शेअर ठरला. आतापर्यंत पीबी फिनटेकच्या शेअर्समध्ये तब्बल ४३ टक्क्यांपर्यंतची घसरण नोंदवली गेली आहे. अशा परिस्थिती गुंतवणूकदारांनी शेअर विकावा की अजून वाट पाहावी?

बाजारातील व्यापक मंदी आणि कंपनीवरील ताण

केवळ इर्डाचे प्रस्तावित नियमच नव्हे, तर भारतीय शेअर बाजारातील बिकट परिस्थितीचाही या पडझडीला फटका बसला आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती आणि अमेरिकन ट्रेझरी यील्डमधील तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या भावनांवर दबाव वाढला आहे. या चालू वर्षात (२०२६ मध्ये) पीबी फिनटेकचा शेअर जवळपास ४० टक्क्यांनी खाली आला असून, कंपनीचे बाजार भांडवल घसरून ५०,१०० कोटी रुपयांच्या खाली गेले आहे.

‘इर्डा’च्या नवीन प्रस्तावामुळे खळबळ का उडाली?

  • विमा क्षेत्राचे नियमन करणाऱ्या ‘इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया’ने विमा वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी आणि कमिशन रचनेत बदल करण्यासाठी एक पत्रक जारी केलं आहे.
  • यामध्ये आरोग्य, वाहन आणि जीवन विमा या सर्वच क्षेत्रांत वितरकांना मिळणाऱ्या कमिशनच्या मर्यादा निश्चित करण्याचे प्रस्ताव यामध्ये आहेत. या प्रस्तावित बदलांमुळे विमा एजंट कंपन्यांच्या महसुलावर आणि नफ्यावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कंपनीच्या महसूलावर परिणाम होणार?

पीबी फिनटेकच्या व्यवस्थापनाच्या मते, हे प्रस्ताव सध्याच्या स्वरूपात लागू झाल्यास मूळ महसुलावर अंदाजे ३० टक्क्यांपर्यंतचा परिणाम होऊ शकतो, ज्याचा सर्वाधिक फटका जनरल इन्शुरन्स व्यवसायाला बसू शकतो. यातून मार्ग काढण्यासाठी कंपनीने भरती प्रक्रिया थांबवली असून मार्केटिंगवरील खर्च कपात आणि इतर खर्च कमी करण्याचे प्रयत्न करत आहे.

शेअर विकावा का?

  • या नव्या नियमांमुळे वॉल स्ट्रीट आणि देशांतर्गत ब्रोकरेज कंपन्यांनी पीबी फिनटेकच्या कमाईवर नवीन अंदाज व्यक्त केले आहे. मागील आठवड्यात एचएसबीसीने या स्टॉकचे रेटिंग डाऊनग्रेड करून ‘होल्ड’ केले आणि लक्ष्य किंमत २,१०० रुपयांवरून थेट १,१५० रुपयांवर आणली.
  • मोतीलाल ओसवाल या फर्मने ‘न्यूट्रल’ रेटिंग कायम ठेवत १,१५० रुपये टार्गेट दिले.
  • दुसरीकडे, या नव्या नियमांमुळे कंपनीच्या विमा टेक रेटमध्ये सुमारे ४० टक्के घट होऊ शकते आणि २०२८ च्या नफ्यात ३४ टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते, असा अंदाज बांधूनही बर्नस्टाईनने आपले ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग कायम ठेवत २,३१० रुपये टार्गेट प्राइस कायम ठेवली आहे.

सध्या हे सर्व नियम केवळ प्रस्तावित आहेत. यावर अभिप्राय देण्याची अंतिम मुदत २५ ऑक्टोबरपर्यंत खुली आहे.