persistent systems stock crash nagarro acquisition : मराठमोळे उद्योगपती आनंद देशपांडे यांची देशातील आघाडीची आयटी कंपनी ‘पर्सिस्टंट’ला आज मोठा धक्का बसला. पर्सिस्टंट सिस्टीम्सच्या शेअर्समध्ये आज (२९ जून २०२६) मोठी घसरण पाहायला मिळाली. कंपनीने जर्मनीतील ‘डिजिटल इंजिनिअरिंग’ क्षेत्रातील दिग्गज फर्म ‘नागारो एसई’ला तब्बल १.४ अब्ज युरो (सुमारे १.३ अब्ज डॉलर) मध्ये खरेदी करण्याची घोषणा केली आहे. ही बातमी प्रसिद्ध होताच गुंतवणूकदारांनी शेअर्स विक्रीसाठी रांगा लावल्या.

शेअर बाजारात मोठी पडझड

सोमवारी व्यवहार सुरू होताच पर्सिस्टंट सिस्टीम्सचा शेअर ९.८ टक्क्यांनी घसरून ४,३६५.५ रुपयांवर आला. या घसरणीमुळे हा शेअर ‘बीएसई मिडकॅप’ इंडेक्समध्ये आजचा सर्वात मोठा लुझर ठरला. आजच्या घसरणीमुळे या शेअरची एका वर्षातील घसरण आता २७.७ टक्क्यांवर पोहोचली आहे. या तुलनेत ‘निफ्टी ५०’ मध्ये गेल्या वर्षभरात केवळ ५.६ टक्क्यांची घसरण झाली आहे, म्हणजेच पर्सिस्टंटने बाजाराच्या तुलनेत खूप खराब कामगिरी केली आहे.

जर्मनीची ‘नागारो एसई’ कंपनीची खरेदी

शनिवारी २७ जून रोजी पर्सिस्टंट सिस्टीम्सची उपकंपनी ‘गॅलेक्सी जर्मनी होल्डिंग’ आणि नागारो एसई या कंपन्यादरम्यान हा करार झाला. नागारो एसईचे सर्व शेअर्स खरेदी करण्यासाठी गॅलेक्सी जर्मनी होल्डिंग प्रति शेअर ८१ युरो रोख मोजणार आहे. ही ऑफर नागारोच्या २५ जूनच्या बंद भाव लक्षात घेता तब्बल १४० टक्के अधिक किंमत देऊन केली जात आहे. पर्सिस्टंटने आधीच नागारोच्या सर्वात मोठ्या शेअरहोल्डरकडून २१ टक्के हिस्सा खरेदी करण्याचा करार केला आहे. नागारोची १०० टक्के मालकी मिळवून तिला जर्मनीच्या फ्रँकफर्ट स्टॉक एक्सचेंजमधून डिलिस्ट करण्याचा आहे. नागारो ही कंपनी ४० पेक्षा जास्त देशांमध्ये कार्यरत असून तिचे १८,५०० कर्मचारी आहेत. त्यांच्या एकूण महसुलात उत्तर अमेरिकेचा वाटा ३५ टक्के आहे.

ब्रोकरेज संस्थांचे मत काय?

  • या व्यवहारानंतर दिग्गज जागतिक ब्रोकरेज हाऊसेसनी पर्सिस्टंट सिस्टीम्सबाबत वेगवेगळी मते मांडली आहेत. सिटीने पर्सिस्टंटवर आपले ‘विक्री’ रेटिंग कायम ठेवले असून शेअर १५ टक्के आणखी घसरू शकतो, असा अंदाज वर्तवला आहे. हा व्यवहार खूप महागडा असल्याचे ब्रोकरेजचे म्हणणे आहे.
  • जपानी ब्रोकरेज फर्म नोमुराने या शेअरवर ‘तटस्थ’ भूमिका घेतली आहे. त्यांनी नागारोच्या ४० देशांतील नेटवर्कचे आणि १४ टक्के एबिटडा मार्जिनचे कौतुक केले आहे, परंतु सध्यातरी शेअरमध्ये मोठी तेजी येण्याची शक्यता नाकारली आहे.
  • सीएलएसए या डीलबाबत अत्यंत उत्साही असून त्यांनी थेट ३५ टक्के वाढीचा अंदाज वर्तवला आहे.
  • गुंतवणूकदारांनी विचार करुनच निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.

शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन असते. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या नोंदणीकृत आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. वरील माहिती केवळ शैक्षणिक आणि विश्लेषणात्मक उद्देशाने दिली आहे.