Pete Hegseth investment allegations related to BlackRock and Morgan Stanley: अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांच्या एका दलालाने (ब्रोकर) इराणवरील अमेरिका-इस्रायल हल्ल्याच्या काही आठवड्यांपूर्वी प्रमुख संरक्षण कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक करण्याचा प्रयत्न केला होता, असे वृत्त फायनान्शिअल टाइम्सने काल (सोमवारी) या प्रकरणाशी संबंधित तीन व्यक्तींच्या हवाल्याने दिले आहे.

अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे मुख्य प्रवक्ते शॉन पार्नेल यांनी एक्सवर सांगितले की, हे वृत्त “पूर्णपणे खोटे आणि बनावट” असून ते मागे घेण्याची मागणी केली आहे.

फायनान्शिअल टाईम्सच्या वृत्तानुसार, अमेरिकेने इराणविरुद्ध लष्करी कारवाई सुरू करण्याच्या काही काळ आधी, फेब्रुवारी महिन्यात हेगसेथ यांचे मॉर्गन स्टॅनलीतील ब्रोकरने, ब्लॅकरॉकच्या ‘डिफेन्स इंडस्ट्रियल्स ॲक्टिव्ह ETF’ मध्ये कोट्यवधी डॉलर्सची गुंतवणूक करण्याबाबत ब्लॅकरॉकशी संपर्क साधला होता.

हेगसेथ यांच्या ब्रोकरने ज्या गुंतवणुकीबाबत चर्चा केली होती, ती अखेर प्रत्यक्षात आली नाही, कारण गेल्या वर्षी मे महिन्यात सुरू झालेला तो फंड ‘मॉर्गन स्टॅनली’च्या ग्राहकांसाठी खरेदीकरिता अद्याप उपलब्ध झाला नव्हता, असे फायनान्शिअल टाईम्सच्या वृत्तात म्हटले आहे.

हेगसेथ यांच्या वतीने गुंतवणूक करण्याबाबत त्या ब्रोकरला किती प्रमाणात स्वेच्छाधिकार होते, किंवा तो ब्रोकर नक्की काय करत आहे याची हेगसेथ यांना कल्पना होती की नाही, याविषयी फायनान्शिअल टाईम्सच्या वृत्तात काहीही नमूद करण्यात आलेले नाही.

“संरक्षण सचिव पीट हेगसेथ किंवा त्यांच्या कोणत्याही प्रतिनिधीने अशा कोणत्याही गुंतवणुकीबाबत ब्लॅकरॉकशी संपर्क साधला नाही”, असे पार्नेल म्हणाले.

ब्लॅकरॉकने या वृत्तावर भाष्य करण्यास नकार दिला, तर मॉर्गन स्टॅनलीने रॉयटर्सच्या प्रतिक्रियेच्या विनंतीला प्रतिसाद दिला नाही.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या महत्त्वाच्या धोरणात्मक निर्णयांपूर्वी, आर्थिक आणि भाकीत बाजारांमध्ये (Prediction Markets) केल्या गेलेल्या व्यवहारांची सध्या व्यापक स्तरावर चौकशी सुरू असतानाच, गुंतवणुकीच्या या प्रयत्नाबाबतचे वृत्त समोर आला आहे.

यापैकी काही निर्णयांच्या आधीच अत्यंत अचूक वेळी लावल्या गेलेल्या ‘बाजी’मुळे (Bets), काही तज्ज्ञांनी असा प्रश्न उपस्थित केला आहे की, संबंधित माहिती कदाचित आधीच कोणत्यातरी मार्गाने फुटली होती की काय.