PM Modi Appeal on fuel and travel impacts tourism and hospitality stocks significantly: मध्य-पूर्वेतील संकटामुळे निर्माण झालेल्या वाढत्या आर्थिक जोखमींच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना इंधनाचा वापर कमी करण्याचे, अत्यावश्यक नसलेला परदेश प्रवास पुढे ढकलण्याचे आणि अधिक काटकसरीच्या जीवनशैलीचा अवलंब करण्याचे आवाहन केल्यानंतर, सोमवारी प्रमुख प्रवास, पर्यटन आणि आदरातिथ्य (Hospitality) क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सवर विक्रीचा दबाव दिसून आला.
मोदींच्या भाषणाचा कोणत्या शेअर्सवर परिणाम?
सर्वाधिक घसरण झालेल्या शेअर्समध्ये यात्रा ऑनलाईन ५.३२ टक्क्यांनी घसरून १०२.४० रुपयांवर पोहोचला, तर थॉमस कूक इंडिया ४.१४ टक्क्यांनी घसरून ९२.७७ रुपयांवर आला. इझी ट्रीप प्लॅनर्सचे शेअर्स ३.०२ टक्क्यांनी घसरून ७.७२ रुपयांवर आले, तर Le Travenues Technology मध्ये २.३२ टक्क्यांची घसरण होऊन तो १६४.४७ रुपयांवर पोहोचला.
दुसरीकडे आदरातिथ्य (Hospitality) क्षेत्रात, आयटीसी हॉटेल्स २.१४ टक्क्यांनी घसरून १६०.९८ रुपयांवर आला, इंडियन हॉटेल्स कंपनी १.७९ टक्क्यांनी घसरून ६६१.०० रुपयांवर पोहोचला आणि लेमन ट्री हॉटेल्स १.६९ टक्क्यांनी घसरून ११८.३८ रुपयांवर आला.
काल (रविवारी) हैदराबाद येथे एका जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी नागरिकांना अशा जीवनशैलीचा अवलंब करण्याचे आवाहन केले, ज्याचे वर्णन त्यांनी ‘राष्ट्रीयदृष्ट्या जबाबदार’ असे केले. वाढती जागतिक अनिश्चितता आणि पुरवठा साखळीतील व्यत्ययांचा सामना करण्यास भारताला मदत करणे हा यामागील उद्देश होता.
‘वर्क-फ्रॉम-होम’वर महत्त्वाचे भाष्य
“आपल्याला पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करावा लागेल. ज्या शहरांमध्ये मेट्रो सेवा उपलब्ध आहे, तिथे आपण मेट्रोने प्रवास करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर आपल्याला कारचा वापर करणे अपरिहार्यच असेल, तर आपण ‘कार पूल’ (एकाच गाडीतून एकत्रित प्रवास) करण्याचा प्रयत्न केला पाहिजे”, असे पंतप्रधान म्हणाले होते.
कोविड काळात मोठ्या प्रमाणावर प्रचलित झालेल्या ‘वर्क-फ्रॉम-होम’ (घरून काम करण्याच्या) पद्धतींना पुन्हा चालना देण्याचा सल्लाही मोदी यांनी दिला होता.
“कोरोना विषाणूच्या काळात, आप ‘वर्क-फ्रॉम-होम’, ऑनलाइन बैठका आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अशा कामाच्या अनेक पद्धती विकसित केल्या. इतकेच नव्हे, तर आपल्याला त्याची सवयही झाली”, असे ते म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी असेही नमूद केले की, या पद्धती पुन्हा सुरू करणे हे “राष्ट्रीय हिताचे” आणि “काळाची गरज” आहे.
परदेश प्रवास टाळण्याचे आवाहन
भारताच्या परकीय चलन साठ्यावरील ताण कमी करण्यासाठी, नागरिकांनी परदेशातील ‘डेस्टिनेशन वेडिंग्ज’सह (विवाहासाठी परदेशात जाणे) इतर अनावश्यक परदेश प्रवास पुढे ढकलावेत आणि किमान एक वर्षासाठी सोन्याची ऐच्छिक खरेदी टाळावी, असे आवाहन मोदींनी पुढे केले होते.
