Jewelry Sector Down : सरकारने सोन्या-चांदीवरील आयात शुल्कात केलेली वाढ आणि ग्राहकांना सोने खरेदी टाळण्याचे आवाहन, या दुहेरी धक्क्यामुळे संपूर्ण ज्वेलरी क्षेत्रात घबराट पसरली आहे. आठवड्याभरात ज्वेलरी शेअर्स १५ ते २० टक्केपर्यंत घसरले असून बाजारात विक्रीचा दबाव तयार झाला आहे. देशातील अत्यंत जुन्या सराफा ब्रँड्सपैकी एक असलेल्या पी एन गाडगीळ ज्वेलर्स लि. या कंपनीच्या शेअर्समध्ये १५ मे रोजी मोठी घसरण पाहायला मिळाली.

एकाच दिवसात ‘लोअर सर्किट’चा फटका

शुक्रवारी बाजार उघडताच पी एन गाडगीळ ज्वेलर्सचा शेअर ६३७.६५ रुपयांच्या आदल्या बंद भावाच्या तुलनेत घसरुन ६०६.१० रुपयांवर उघडला. गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावल्याने काही वेळातच शेअर ५७३.९० रुपयांवर जाऊन ‘लोअर सर्किट’मध्ये अडकला. गेल्या अवघ्या एका आठवड्यात या शेअरमध्ये सुमारे २१ टक्क्यांची घसरण झाली आहे. या कंपनीचा ‘ऑल टाइम हाय’ ८४८ रुपये तर ‘ऑल टाइम लो’ ४७३.८० रुपये राहिला आहे.

ज्वेलरी शेअर्सवर दुहेरी दबाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परकीय चलन वाचवण्यासाठी नागरिकांना सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केल्यामुळे बाजारातील सेंटिमेंट बिघडले आहेत. दुसरीकडे सोन्या-चांदीवरील आयात शुल्क वाढल्यामुळे कंपन्यांसाठी कच्चा माल महागणार आहे. कंपन्यांना हा तोटा भरुन काढण्यासाठी दागिने महाग करावे लागतील, ज्याचा थेट परिणाम मागणीवर होईल. या नकारात्मक संकेतांमुळे केवळ पी एन गाडगीळच नव्हे, तर टायटन, कल्याण ज्वेलर्स, सेन्को गोल्ड आणि स्काय गोल्ड यांसारख्या दिग्गज ज्वेलरी शेअर्समध्येही मोठी विक्री पाहायला मिळाली.

कंपनीचा पाया भक्कम

सुमारे ७,७०० कोटी रुपयांचे बाजार भांडवल असलेल्या या कंपनीत प्रमोटर्सची (चालक) हिस्सेदारी तब्बल ८१ टक्के आहे, तर सर्वसामान्यांची भागीदारी १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे कंपनीचा पाया भक्कम समजला जातो. असे असताना जागतिक अनिश्चितता आणि बदललेली धोरणे यामुळे शेअर्सवर दबाव पाहायला मिळत आहे.

सकारात्मक निकालानंतरही घसरण

गेल्या वर्षभरातील सोन्यातील तेजीने ज्वेलरी कंपन्या मालामाल झाल्या आहेत. टायटन आणि कल्याण ज्वेलर्स यांसारख्या कंपन्यांनी चौथ्या तिमाहीचे अत्यंत सकारात्मक निकाल जाहीर केले आहे. टायटन कंपनीचा निव्वळ नफा ३५.४ टक्क्यांनी वाढून १,१७९ कोटी रुपये झाला आहे, तर महसूल ७७.६ टक्क्यांनी वाढून २३,९३४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. टायटनने प्रति शेअर १५ रुपये लाभांश जाहीर केला आहे. तर कल्याण ज्वेलर्स कंपनीच्या निव्वळ नफ्यात ११८.२ टक्क्यांची प्रचंड वाढ झाली असून तो ४०९.५ कोटी रुपये झाला आहे. कंपनीने प्रति शेअर २.५ रुपये लाभांश जाहीर केला आहे.